जयपूर, 16 मार्च : केरळनंतर (Kerala) आता राजस्थानमधील (Rajasthan) डॉक्टरांनाही कोरोनाव्हायरसवरील (Coronavirus) उपचाराचा लढा जिंकला आहे. जयपूरमधील (Jaipur) कोरोनाव्हायरसचे 3 रुग्ण आता बरे झालेत. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research - ICMR) मार्गदर्शनानुसार सवाई मानसिंग रुग्णालयातील (SMS hospital) डॉक्टरांनी यशस्वी उपचार केलेत.
जगभरात कोरोनाव्हायरसची भीती आहे, मात्र भारतीयांसाठी ही दिलासादायक अशी बातमी आहे. जयपूरमधील COVID-19 चे 4 पैकी 3 रुग्ण बरे झालेत. याबाबत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून डॉक्टरांचं कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "एसएमस रुग्णालयातील 3 कोरोना रुग्ण बरं झालेत, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. या तिघांचेही रिपोर्ट नेगेटिव्ह आलेत. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सर्वस्व पणाला लावलं, त्याचं मी मनापासून कौतुक करतो"
हे 'कोरोना'शी लढ्याचं 'केरळ मॉडेल', भारतातील पहिले 3 रुग्ण असे झाले व्हायरसमुक्त
जयपूरमधील डॉक्टरांनी इंडियन मेडिकल काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चशी सल्लामसलत करून उपचार केले. या रुग्णांना मलेरिया, स्वाइन फ्लू, एचआयव्ही औषधं देण्यात येणारी Lopinavir/Ritonavir ही औषधं देण्यात आली.
राजस्थानच्या आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंग यांनी इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना सांगितलं की, "SMS hospital आणि मेडिकल कॉलेजचे प्राचार्य सुधीर भंडारी यांच्या मार्गदर्शनाता आणि ICMR च्या देखरेखीत मलेरिया, स्वाईन फ्लू आणि एचआयव्हीची दोन औषधं वापरू पाहिली आणि हा उपचार यशस्वी ठरत असल्याचं दिसलं"
इटलीहून आलेल्या 2 पर्यटकांची टेस्ट नगेटिव्ह आली आहे. शिवाय दुबईहून राजस्थानमध्ये आलेल्या रुग्णाची टेस्टही नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह टेस्ट आलेल्या या रुग्णांना आता राजस्थान हेल्थ सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये (RUHS Hospital) शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.. या 3 रुग्णांव्यतिरिक्त स्पेनहून आलेल्या एका नागरिकालाही कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत.