दिल्लीच्या निजामुद्दीन भागातून कोरोनाबद्दल एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या धार्मिक कार्यक्रमासाठी २०० हून अधिक लोक उपस्थित होते आणि कोणत्याही परवानगीशिवाय हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नंतर त्यांच्यात कोव्हिड-१९ ची लक्षणे दिसू लागली. सध्या १४०० संशयितांना तेथून हलविण्यात आले आहे आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, लॉकडाउन असून देखील इतका मोठा कार्यक्रम आयोजित झालाच कसा आणि एकाच ठिकाणी एवढी लोकं जमा झाली कशी? कार्यक्रमानंतर, जेव्हा सुमारे ३०० लोकांना सारखीच लक्षणे दिसू लागली, तेव्हा प्रशासनाने त्वरित कारवाई करत या लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवलं. या सर्वांची तपासणी केली जाणार असून जर हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल आणि उर्वरित लोकांना पुढील काही दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल.
ही बातमी समोर येताच निजामुद्दीनमध्ये जोरदार बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. निजामुद्दीन दर्ग्याच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात पॅरामिलिटरी आणि दिल्ली पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागामार्फत निजामुद्दीन येथे आरोग्य शिबिरही उभारले गेले आहे. निजामुद्दीनमधील एका इमारतीत बरेच परदेशी विद्वानही राहतात. त्यांना तिथेच राहण्यास सांगण्यात आले आहे.अशी माहिती मिळाली आहे की, हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्याचवेळी तेलंगणात कोरोना संक्रमणामुळे ६ लोकांचा मृत्यू झाला आणि हे सहाही जण निजामुद्दीन औलियातील तबलीगी जमात सहभागी होते. या गोष्टीची जेव्हा खात्री झाली तेव्हा सर्वच राज्यातील प्रशासनाला मोठा धक्का बसला.
या बातमीनंतर वेगवेगळ्या राज्य सरकारांनी तात्काळ पावलं उचलली आहेत, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये १२०० लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर यूपी पोलिस मुख्यालयाने १८ जिल्ह्यांसाठी विशेष निर्देश दिले आहेत की, त्या लोकांवर लक्ष ठेवावे किंवा त्या लोकांना शोधून काढावे जे या तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झाले होते. सोमवारी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिवांनी सांगितले की, देशात कोरोना सध्या लोकल ट्रान्समिशनच्या टप्प्यात आहे. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा