ढेबेवाडी प्रतिनिधी , दि. ५ ऑक्टोबर : ढेबेवाडी पोलिसांनी बेकायदेशीररीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत सुमारे २ लाख ७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत विदेशी दारूचा साठा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी कार जप्त करण्यात आली असून दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी बाजारपेठ व परिसरात नियमित पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी राऊ चौक परिसरात एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी वाहनाला थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर वाहनाची तपासणी करण्यात आली.
वाहनचालकाकडे मालाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची कसून झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली व डिकीत विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. चालकाकडे दारू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत वाहनचालकाचे नाव अक्षय सुनील कोथमिरे (रा. मंगळवार पेठ, कराड) तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीचे नाव रवींद्र संजय पवार (रा. गुरुवार पेठ, कराड) असल्याचे समोर आले.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५७ हजार ७६० रुपये किमतीची विदेशी दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी झेन एलएक्सआय ही अंदाजे ५० हजार रुपये किमतीची कार असा एकूण २ लाख ७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (अ) व ८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदाम पांचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, पो. हवालदार धिरजकुमार मुुळे, पो. हवालदार प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कांबळे आणि उज्ज्वल कदम यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धिरजकुमार मुुळे करीत आहेत.