कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026
चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास घराजवळील शेडमध्ये घुसलेल्या बिबट्याने दोन गाभण शेळ्यांची शिकार केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.
ही घटना शेतकरी शिवाजी केशव मोरे यांच्या घराजवळील शेडमध्ये रात्री घडली. नेहमीप्रमाणे शेळ्या शेडमध्ये बांधून शिवाजी मोरे झोपले होते. पहाटे उठून पाहिले असता शेडमध्ये रक्ताचा सडा आणि दोन गाभण शेळ्या मृतावस्थेत आढळल्या. बिबट्याने शेळ्यांच्या गळ्यावर आणि पोटावर हल्ला करून त्यांचा खात्मा केला.
घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनोहर यादव यांनी भोसगावचे वनपाल रमेश कुंभार आणि कुंभारगावचे वनरक्षक शरद ताले यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत शेळ्यांचे फोटो आणि पुरावे गोळा करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. वनविभागाकडून नुकसान भरपाईचे आश्वासन देण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पाटण तालुक्यातील या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जनावरे चारण्यासाठी बाहेर पडण्यास महिला-शेतकरी घाबरत आहेत.
घटनास्थळी आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या भागात वरचेवर या घटना घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा