रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईहून कायमचे गावी परतलेले बाळू बाबू डाकवे यांनी उदरनिर्वाहासाठी मोठ्या उमेदीने शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला होता. घरात पत्नी इंदूबाई आणि २३ वर्षांची मूकबधिर मुलगी असा परिवार असलेल्या बाळू डाकवे यांच्या कुटुंबाचा गाडा याच शेळ्यांवर अवलंबून होता. मात्र, बिबट्याच्या या हल्ल्यामुळे या गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन एका रात्रीत हिरावून घेतले गेले असून, केवळ पंचनामे न करता प्रशासनाने त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

            रात्रीच्या वेळी बिबट्याने शेडमध्ये प्रवेश करून अक्षरशः धुमाकूळ घातला. या भीषण हल्ल्यात डाकवे यांच्या तीन गाभण शेळ्या आणि एक बोकड फस्त करण्यात आला. दोन शेळ्या अद्याप बेपत्ता असून, सुदैवाने केवळ एकच शेळी जिवंत बचावली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, एका गाभण शेळीच्या पोटातील पिल्लेही बिबट्याने खाल्ल्याने घटनास्थळी अत्यंत विदारक आणि थरारक दृश्य पाहायला मिळाले. मूकबधिर मुलीचे पालनपोषण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या डाकवे कुटुंबावर या घटनेने मोठा आर्थिक आघात केला आहे.

            घटनेची माहिती मिळताच काळगावचे वनअधिकारी प्रशांत लवटे, भोसगावचे वनपाल रमेश कुंभार आणि पोलीस पाटील गणेश डाकवे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. मात्र, प्रशासनाने नियमांवर बोट न ठेवता या गरीब कुटुंबाची परिस्थिती पाहून त्यांना तातडीने आणि जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. एरवी जंगलात चरायला गेलेल्या जनावरांवर होणारे बिबट्याचे हल्ले आता थेट मानवी वस्तीत आणि घराच्या गोठ्यापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण गावात घबराट निर्माण झाली आहे.

        मानवी वस्तीनजीक बिबट्याचा वाढलेला हा वावर नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. अनेक गावांत बिबट्याची डरकाळी नित्याची झाली असून शेतकऱ्यांचे पशुधन मोठ्या प्रमाणावर नष्ट होत आहे. "वनविभागाने केवळ पंचनामे न करता, या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा आणि उदरनिर्वाह उद्ध्वस्त झालेल्या आमच्या कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळावी," अशी आर्त हाक नुकसानग्रस्त बाळू डाकवे यांनी दिली आहे. वनविभागाने या घटनांकडे वेळीच गांभीर्याने न पाहिल्यास भविष्यात मानवी जिवावर बेतून मोठा अनर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त करत तातडीने व्यापक उपाययोजना आणि पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत. 

रविवार, १६ ऑगस्ट, २०२६

*जीवावर बेतलं पण शेपटावर निभावलं! मोरेवाडीच्या डोंगरात म्हशीने बिबट्याला दिली जोरदार लाथ, शेतकऱ्यांत भीतीचं वातावरण*



*पाटण, चिखलेवाडी:*  
मोरेवाडीच्या डोंगरात दिवसाढवल्या बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोरेवाडीतील शेतकरी श्री. अशोक बाळकृष्ण मोरे यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हशीने प्रसंगावधान राखून बिबट्याला जोरदार लाथ मारल्याने तिचा जीव वाचला. या झटापटीत मात्र मैशीची शेपटी तुटून ती गंभीर जखमी झाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की नेहमीप्रमाणे  मोरे यांनी आपली जानावरे मोरेवाडीचा दारा परिसरातील नवाच्या डोंगरात चरण्यासाठी नेली होती. डोंगरातील एका वगळात बिबट्या आधीच दाबा धरून बसला होता. म्हशी जवळ येताच त्याने अचानक झडप मारली. यावेळी म्हशीने
 जोरात मागचा पाय उगारून बिबट्याला लाथ मारली. त्यात बिबट्याने पलटवार करत मैशीची शेपटी तोंडात पकडली. 

शेपटी तुटल्याने म्हश रक्तबंबाळ झाली आणि मोठ्या आवाजात ओरडू लागली. हा आवाज ऐकून आजूबाजूचे इतर शेतकरी धावून आले आणि बिबट्या जंगलात पळून गेला.
ही घटना घडलेल्या मोरेवाडीचा दारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिवसाढवल्याच दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाळीव जनावरे दिसताच तो त्यांच्यावर हल्ला करत असल्याने शेतकरी आपली जनावरे डोंगरात नेण्यास घाबरत आहेत. 

"जीवावर आलेलं पण शेपटावर गेलं असं म्हणावं लागेल. जर मैशीने लाथ मारली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती," अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली.
या घटनेनंतर मोरेवाडी, चिखलेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा आणि परिसरात जनजागृती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आपली शेती आणि जनावरे कशी सांभाळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

जखमी म्हशीवर स्थानिक पशुवैद्यकाकडून उपचार सुरू आहेत.

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२६

*पाटण तालुक्यातील कुंभारगाव ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय* *जि.प. शाळेत पहिलीत प्रवेश घ्या, 1 वर्ष घरफळा व पाणीपट्टी माफ*


 "कुंभारगांव ग्रामपंचायत". ता, पाटण येथे ८० वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत १५ ऑगस्ट २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय आवारात मा.उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांचे हस्ते राष्ट्रध्वजारोहण करून राष्ट्रगीत पार पडले यावेळी सातारा जि,प,माजी,शिक्षण,अर्थ, सभापती संजय देसाई  ग्रामसेवक संतोष घोडे,तलाठी बाळासाहेब गायकवाड(महसूल),
माजी उपसरपंच,राजेंद्र पाटील,
राजेंद्र देसाई,युवराज चव्हाण,
विविध सोसायटीचे चेअरमन,संचालक,ग्रामस्थ,
पोलिस पाटील,प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर,सिस्टर,मदतनीस, अंगणवाडी सेविका,युवक वर्ग, हायस्कूल,प्राथमिक शाळा,इंग्लिश मिडीयम स्कूल चे विद्यार्थी,विद्यार्थिनी,शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष,सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक,शिक्षिका ,कर्मचारी आदी यांचे उपस्थितीत ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने सर्व महिलांना समानतेने,आदराने, आणि संवेदनशीलतेने वागण्याची शपथ देण्यात आली ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गात (पहिली) जे विद्यार्थी  प्रवेश घेणाऱ त्या कुटुंबाला प्रोत्साहन पर अनुदान देण्याबाबतची सूचना उपसरपंच राजेंद्र चव्हाण यांनी मांडली याबाबत ग्रामसभेत चर्चा झाली या सूचनेला  सातारा जि,प,माजी,शिक्षण,अर्थ, सभापती संजय देसाई यांनी अनुमोदन दिले त्यामुळे ठराव सर्वानुमते मजूर झाला.

शिक्षणाला चालना देण्यासाठी कुंभारगाव ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा नंबर 1 कुंभारगाव येथे इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या कुंभारगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा 1 वर्षाचा घरफळा व पाणीपट्टी माफ करण्यात येणार आहे.या निर्णयामुळे गावातील पालकांना आर्थिक दिलासा मिळणार असून जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे गावातून सर्वत्र कौतुक होत आहे.

मानेगावच्या सुपुत्राच्या शिरपेचात राष्ट्रीय सन्मानाचा तुरा!ACB मधील उल्लेखनीय सेवेसाठी श्री. संभाजी रामचंद्र साळुंखे यांना ‘अतिउत्कृष्ट सेवापदक’


मानेगाव | १५ ऑगस्ट २०२६ :
स्वातंत्र्यदिनाच्या अभिमानाच्या पर्वावर मानेगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मानेगाव, ता. पाटण, जि. सातारा येथील सुपुत्र श्री. संभाजी रामचंद्र साळुंखे यांना त्यांच्या उल्लेखनीय शासकीय सेवेसाठी ‘अतिउत्कृष्ट सेवापदक’ प्रदान करण्यात आले.

श्री. साळुंखे हे Anti-Corruption Bureau (ACB), मुंबई येथे Assistant Sub Inspector म्हणून कार्यरत आहेत. कर्तव्य बजावताना दाखवलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट कामगिरी याची दखल घेत भारत सरकारच्या गृह मंत्रालयातर्फे त्यांचा या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरव करण्यात आला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मिळालेला हा सन्मान विशेष ठरला आहे. एका छोट्याशा गावातून पुढे येत शासकीय सेवेत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या मानेगावच्या या सुपुत्राच्या यशाने गावकऱ्यांच्या आनंदात आणि अभिमानात भर पडली आहे.
गावच्या मातीत रुजलेली मूल्ये आणि सेवेतून मिळवलेला राष्ट्रीय सन्मान—हीच मानेगावच्या सुपुत्राच्या कर्तृत्वाची खरी ओळख!

श्री. संभाजी रामचंद्र साळुंखे यांच्या या गौरवास्पद कामगिरीबद्दल मानेगावकरांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२६

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठापना आणि कलश रोहन समारंभ तसेच सभामंडप असा संयुक्त लोकार्पण सोहळा रविवार १६/१७ ऑगस्ट २०२६ या दोन दिवशी रोजी संपन्न होत आहे,                         १६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ते ४ या वेळेत कुंभारगाव येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवी मंदिर येथून शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, या मूर्ती कलश भव्य मिरवणूक तुतारीच्या निनादात, टाळ टाळ, मृदंगाच्या तालावर विठुरायाचा देव देवतांचा गजर करत हा सोहळा पार पडणार आहे यावेळी श्रीराम वारकरी शिक्षण संस्था आरेवाडी यांचा सहभाग असणार आहे सायंकाळी ६ ते ७ वाजता जला धीवास, धान्य निवास, शयना धीवास विधि  होणार आहे ,                          ७ ते ९ वाजता झी, टॉकीज फेम, ह,भ,प, श्री सागर पवार यांची कीर्तन सेवा होणार आहे यानंतर स्नेह भोजनाचे करण्यात आले आहे,                                        सोमवार १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी गणेश पूजन, पुण्याहवाचन, होम हवन, अभिषेक यानंतर ११ ते १२  वाजता श्री,ष,ब्र,प्र.१०८ ज्ञानराज पद्म भास्कर राष्ट्रसंत डॉ, निळकंठ शिवाचार्य धारेश्वर (महास्वामीजी) यांचे हस्ते शिवलिंग, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कलश रोहन आणि महाआरती होणार आहे,                           दुपारी १२ ते १२,३० माहेर वाशिन ओटी भरणे, सत्कार समारंभ झाल्यानंतर महाप्रसाद याचे आयोजन केले आहे,         दुपारी एक वाजता शिवशंभो सभामंडपाचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांचे शुभ हस्ते आहे या पवित्र व मंगल सोहळ्या निमित्त आपण उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणीत करावा असे आव्हान शिवशक्ती गणेश मंडळ व ग्रामस्थ मंडळ माटेकरवाडी तालुका पाटण यांनी केले आहे.

कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...