मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जन कार्यक्रमात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी

 मंद्रूळकोळे हादरले! रक्षा विसर्जनात मधमाश्यांचा भीषण हल्ला; १०-१२ जखमी, स्मशानभूमीत एकच खळबळ.


कुमजाई पर्व न्यूज ढेबेवाडी | प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील मंद्रूळकोळे येथे रविवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमावेळी मधमाश्यांच्या मोहोळाने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शांततेत पार पडणारा धार्मिक विधी काही क्षणांतच गोंधळात बदलला आणि सुमारे १० ते १२ जण जखमी झाले.

मंद्रूळकोळे येथील रहिवासी यांच्या निधनानंतर रविवार, दि. २६ रोजी सकाळी वांग नदीकाठी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विधीपूर्व तयारीसाठी १५ ते २० ग्रामस्थ स्मशानभूमी परिसरात उपस्थित होते.

तयारी सुरू असतानाच झाडावरील मधमाश्यांचे मोठे मोहोळ अचानक भडकले आणि त्यांनी उपस्थितांवर तुफानी हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे स्मशानभूमीत एकच धावपळ उडाली. स्वतःचा बचाव करण्यासाठी लोकांनी पळापळ केली. या घटनेत सुमारे १० ते १२ जणांना मधमाश्यांनी दंश केला.

जखमींना तातडीने ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच काही खाजगी दवाखान्यांमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार केल्याने सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, मूळ विसर्जन स्थळी धोका कायम असल्याचे लक्षात येताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तत्परता दाखवली. पुढील अनर्थ टाळण्यासाठी रक्षा अन्यत्र ढेबेवाडी वांग नदीकाठी नेऊन विसर्जन विधी शांततेत पार पाडण्यात आला.

गुरुवार, २३ एप्रिल, २०२६

*“छत्रपती महाराजस्व अभियानाचा धडाका — हजारो महसूल तक्रारींचा झटपट निपटारा”*

सणबुर प्रतिनिधी – महेश जाधव
सणबुर : सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित महसूल प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “छत्रपती महाराजस्व व समाधान अभियान” या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महसूल प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकारामुळे हजारो प्रकरणांचा अल्पावधीत निपटारा होत असून नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
या अभियानाअंतर्गत फेरफार नोंदी, डिजिटल सातबारा आणि ८-अ उतारे यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रे थेट नागरिकांच्या हाती देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली असून, पारदर्शक व जलद सेवा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न यशस्वी ठरत आहे.
👉 महत्त्वाची आकडेवारी :
▪️ फेरफार नोंदी : १,३२५ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
▪️ डिजिटल सातबारा उतारे : १३,२६५ नागरिकांना वितरण
▪️ डिजिटल ८-अ उतारे : १,८७० लाभार्थ्यांना प्रदान
▪️ शासकीय प्रमाणपत्रे : ४३४ प्रमाणपत्रांचे वितरण
या उपक्रमामुळे जमीन नोंदी, वारस हक्क, तसेच तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली अनेक कामे मार्गी लागली आहेत. प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचल्याने वेळ व पैशाची बचत होत असून, नागरिकांच्या समाधानातही वाढ झाली आहे.
📣 नागरिकांची प्रतिक्रिया :
“सरकारी काम म्हणजे दीर्घ प्रतीक्षा, ही प्रतिमा आता बदलत आहे. एकाच ठिकाणी सातबारा, फेरफार यांसारखी कामे पूर्ण होत असल्याने मोठा दिलासा मिळाला,” अशी भावना एका लाभार्थ्याने व्यक्त केली.

डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा व ८-अ उताऱ्यांमुळे बँकिंग तसेच इतर कायदेशीर प्रक्रियांसाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज उरलेली नाही. यामुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे.
या अभियानाच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे (पाटण) आणि तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले की, उर्वरित प्रलंबित प्रकरणेही अशाच मोहिमांद्वारे लवकरच निकाली काढली जातील.
ज्या शेतकरी खातेदारांच्या वारस नोंदी अद्याप प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसील कार्यालय, पाटण येथे संपर्क साधावा. नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून संबंधित ७/१२ व ८-अ उतारे घरपोच देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे तहसीलदार अनंत गुरव यांनी सांगितले आहे.
एकूणच, “छत्रपती महाराजस्व अभियान” हे महसूल प्रशासन आणि जनतेमधील दुवा मजबूत करत असून, कार्यक्षम व पारदर्शक प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

“निर्णय बदलायला लावणारा माझा एकमेव मार्गदर्शक हरपला” — स्व. डॉ. दिलीपराव चव्हाणांना ना. शंभूराज देसाईंची भावपूर्ण श्रद्धांजली


कुंभारगाव (दि. २२ एप्रिल २०२६) : कुंभारगावचे सुपुत्र, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक स्वर्गीय डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या निधनाने संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या रक्षाविसर्जन कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भावनिक वातावरण निर्माण झाले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की. “स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ नेते नव्हते, तर आमचे मार्गदर्शक, आधारवड होते,” असे म्हणत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.

देसाई म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच पुण्यातील रुग्णालयात भेट झाली होती. “अर्धा तास त्यांनी माझ्याशी अगदी आत्मीयतेने संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी आशा होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला,” असे सांगताना त्यांचा आवाज भरून आला.

राजकीय जीवनातील सुरुवातीपासूनच डॉ. दिलीपराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले, असे सांगत देसाई पुढे म्हणाले, “माझे निर्णय बदलायला लावणारे जर कोणी असतील तर ते फक्त स्व. डॉ. दिलीपराव चव्हाण होते. त्यांनी नेहमीच विचारपूर्वक मार्गदर्शन केले आणि गटाच्या हिताचा विचार केला.”

पडत्या काळात खंबीरपणे सोबत उभे राहणारा नेता म्हणून त्यांनी डॉ. चव्हाण यांचे वर्णन केले. “चढत्या काळात अनेक जण सोबत असतात, पण पडत्या काळात खरे सहकारी ओळखू येतात — आणि डॉ. दिलीपराव चव्हाण हे असेच निष्ठावंत सहकारी होते,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.

देसाई गटाच्या राजकीय वाटचालीत ढेबेवाडी व कुंभारगाव परिसराची जबाबदारी त्यांनी एकहाती सांभाळली, याची आठवण करून देताना देसाई म्हणाले, “ते म्हणायचे ‘डोंगराच्या अलीकडची काळजी करू नका’, त्यामुळे मी निर्धास्त असायचो. आज तो आधार हरपला आहे.”

या प्रसंगी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजित पाटील चिखलीकर, हिंदुराव पाटील, अॅड. डी.पी. जाधव, कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग नलावडे, विश्वनाथ पानसकर, विजय पवार, चंद्रकांत चाळके, दत्तात्रय चोरगे, संजय देसाई, संतोष मोरे, आनंदराव चव्हाण, राजेंद्र देसाई, देवबा वायचळ, अॅड. जनार्दन बोत्रे, विजय शिबे, विनायक सुतार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वांनी स्व. डॉ. चव्हाण यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी देसाई यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व “या दुःखद प्रसंगी शासन व समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” असा विश्वास दिला.

एक निष्ठावंत नेता, मार्गदर्शक आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा व्यक्तिमत्त्व हरपल्याची खंत प्रत्येकाच्या मनात होती — आणि अश्रूंतूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

*🚩 मानखुर्दमध्ये २६ एप्रिलला विराट हिंदू संमेलन; एकतेचा एल्गार, हिंदू शक्तीचा प्रचंड जागर 🚩*


मुंबई (मानखुर्द) : हिंदू समाजाने आता संघटित होण्याची वेळ आली आहे, असा ठाम आणि आक्रमक संदेश देत महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे सकल हिंदू समाज आयोजन समितीच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकात्मता या त्रिसूत्रीवर आधारित हे संमेलन २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

महाराष्ट्र नगर परिसरातील महात्मा फुले सोसायटी जवळील न्यू इंग्लिश पब्लिक स्कूल शेजारील मैदानावर होणाऱ्या या संमेलनासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू असून परिसरात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी याला “हिंदू एकतेचा शक्तीप्रदर्शन सोहळा” असे स्वरूप दिले आहे.

संमेलनाच्या माध्यमातून हिंदू समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, संस्कृतीचे जतन आणि धर्मरक्षण याबाबत जागृती केली जाणार आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत हिंदू समाजाने संघटित राहणे का गरजेचे आहे, यावरही या संमेलनात ठोस मार्गदर्शन होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

विशेष म्हणजे, या संमेलनासाठी परिसरातील नागरिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “प्रत्येक हिंदू कुटुंबाने या संमेलनात सहभागी होणे ही काळाची गरज आहे,” असा ठाम आग्रह आयोजक समितीने व्यक्त केला आहे.

संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मानखुर्द परिसरात बॅनर, पोस्टर आणि प्रचार फलकांद्वारे वातावरण तापले असून, हा कार्यक्रम केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक शक्ती एकवटण्याचा एक मोठा प्रयत्न ठरणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

“एकत्र या, संघटित व्हा आणि हिंदू शक्तीचा जागर” — या घोषवाक्यासह होणारे हे संमेलन आगामी काळात मोठा सामाजिक संदेश देणार, यात शंका नाही.

सोमवार, २० एप्रिल, २०२६

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.


कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव चव्हाण यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटण तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

आज सोमवार दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री , शंभूराजे देसाई साहेब ,यशराज (दादा) देसाई, रविराज देसाई, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

कै. डॉ. दिलीपराव चव्हाण हे केवळ एक राजकीय कार्यकर्ते नव्हते, तर देसाई गटाचे खंबीर आधारस्तंभ होते. गट अडचणीत असताना त्यांनी नेहमीच धीर देत योग्य मार्गदर्शन केले.पाटण तालुक्यातील  कुंभारगाव–ढेबेवाडी परिसरात त्यांनी तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत साहेबांचा विचार पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे केले.

यावेळी पालकमंत्री यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की,
"डॉ. चव्हाण हे दिलेल्या शब्दाचे पक्के होते. त्यांचा शब्द म्हणजे अंतिम निर्णय असायचा. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याची त्यांना अचूक माहिती होती. ते फक्त सहकारी नव्हते, तर माझे डोळे आणि कान होते."

त्यांनी पुढे सांगितले की, राजकीय आयुष्यातील अनेक चढ-उतारांत डॉ. चव्हाण यांनी तानाजी मालुसरे यांच्या ढालीप्रमाणे निष्ठेने साथ दिली. त्यांच्या जाण्याने देसाई गटाच्या निष्ठावंत फौजेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

संयमी, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाची ओळख असलेले डॉ. चव्हाण यांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या अचानक झालेल्या एक्झिटने संपूर्ण तालुका हळहळ व्यक्त करत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण, भावजय, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

📍 बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कुंभारगाव येथील वैकुंठधाम येथे त्यांचे रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.


कु.मृणाल पाटील यांची महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड; मंद्रुळकोळे गटात उत्साहाचे वातावरण.


सातारा : मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या कु. मृणाल महेश पाटील यांची सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यांच्या निवडीबद्दल सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. शंभूराज देसाई साहेब, युवा नेते रविराज देसाई (दादा) तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज दादा देसाई यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कु. मृणाल पाटील या तरुण, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या निवडीमुळे महिला व बाल कल्याण क्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या आरोग्य, शिक्षण व स्वावलंबनासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील महिलांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी भक्कम आवाज मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. महिलांच्या सबलीकरणासाठी नवीन उपक्रम राबवून विकासाला चालना देण्याचा निर्धारही मृणाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील महिला व बाल कल्याण क्षेत्राला नवसंजीवनी मिळणार असून त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६

भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यात ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड; भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात उपक्रम”


पाटण : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.अतुल भोसले साहेब यांच्या नेतृत्वात तसेच पाटण तालुक्याचे नेते व राज्य परिषदेचे सदस्य मा.श्री.सत्यजित सिंहपाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुक्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व होते. कृष्णा हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी पाटण तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमांतर्गत तब्बल ४६ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा कार्डचे वितरण करण्यात आले. या योजनेमुळे गरजू नागरिकांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी पाटण दक्षिणचे अध्यक्ष गणेश यादव, साईकडे गावच्या सरपंच सौ. सुवर्णाताई मोरे यांच्यासह स्थानिक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा सामाजिक कार्यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

या उपक्रमामुळे पाटण तालुक्यातील गरजू कुटुंबांना आरोग्य सुरक्षा कवच मिळाल्याने भारतीय जनता पार्टीच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

*मंद्रूळकोळे खुर्द येथे बैलगाडी स्पर्धा उत्साहात.* *संपन्न.गावाने चांगले मैदान घेतल्याबद्दल स्पर्धक व शौकिनांनी धन्यवाद व्यक्त केले.*

ढेबेवाडी प्रतिनिधी 
         मंद्रूळकोळे खुर्द येथे श्री. जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कर्नाटक आदी ठिकाणहून 150 गाड्यांची नोंद करण्यात आली होती यामध्ये तळमावले ता.पाटण येथील इशारा व चॉपर या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळविला. येथील शर्यती उत्साहात संपन्न झाल्या या विभागात मंद्रूळकोळे खुर्द गावाने बैलगाडा स्पर्धकाना मैदान उपलब्ध करून देऊन चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल बैलगाडा स्पर्धकांनी व शौकिनांनी गावचे धन्यवाद व्यक्त केले.
         मंद्रूळकोळे खुर्द गावाने जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले होते. शर्यतीचे नेटके नियोजन ग्रामस्थ आणि यात्रा कमिटी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लांबून आलेल्या स्पर्धकांची गावच्या वतीने चांगली सोय करण्यात आली. या स्पर्धेस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अशोकराव पाटील, व्हा. चेअरमन पांडुरंग नलवडे, माजी शेती सभापती हिंदुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, उद्योजक महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य मृणाल पाटील, पंचायत समिती सदस्य नितीन काळे दादा, पंचायत समिती सदस्या सौ.संपदाताई जाधव, माजी उपसभापती रघुनाथ जाधव, लोकनेते कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर, आनंदराव पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत पाटील, युवा नेते नितीन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पाटील, माजी सरपंच सचिन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
         या स्पर्धेत प्रथम क्रमाकांचे बक्षिस शंकरराव पाटील माजी मुख्याध्यापक यांच्याकडून 51000 रुपयांचे ठेवण्यात आले होते, तळमावले येथील फॅन्स क्लब सागर पवार यांचा इशारा व भागवत पाटील डॉ. गौरव कदम ईश्वरपूर यांचा चॉपर या बैलजोडीने मिळविले, द्वितीय क्रमांकाचे 41000 हजार रुपयांचे बक्षीस पंचायत समिती सदस्य नितीन काळे व सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या कडून तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस युवा नेते नितीन पाटील यांच्याकडून 31000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते संयुक्त रित्या कु.वैभवी प्रकाश पवार दाढोली यांचा लक्ष्या, पै. राणा देशमुख वाई व प्रदीप नाना कापूसखेड यांचा मुत्या तसेच सावता माळी बनवडी यांचा सुर्या व श्रीकांत पाटील आसिफ भैय्या काले यांचा सर्जा या बैलजोडीनी पटकावले आहे. चौथ्या क्रमांकाचे बक्षिस जिल्हा परिषद सदस्य कु. मृणाल महेश पाटील यांच्याकडून 21000 रुपयांचे ठेवण्यात आले होते हे बक्षिस येरळवेकरांचा आयफोन तानाजी पाटील जिंती यांचा सुंदर यांनी प्राप्त केला. युवा नेते रणजित पाटील यांच्याकडून पाचव्या क्रमांकाचे 11000 बक्षिस ठेवण्यात आले होते ते आनंदराव भिसे तारुख यांचा सरदार व मानेगावचा सरदार यांनी प्राप्त केले. सहाव्या क्रमांकाचे बक्षिस तंटामुक्ती अध्यक्ष अमर पाटील यांच्याकडून सात हजार रुपये ठेवण्यात आले होते ते वेदिका संकेत यादव साईकडे यांचा पक्षा, निनाम यांचा बल्ली तसेच संकेत शेठ सुतार सुसगाव साईकडे गुरुकृपा मित्र परिवार कराड यांचा वश्या, महेश जाधव कुरळप यांचा गज्या यांनी प्राप्त केले. यावेळी विजेत्यांनी जल्लोष केला. दरम्यान क्वार्टर सेमी फायनलला प्रथम आलेल्या रमेश भिंगारदेवे, अर्जुन भिंगारदेवे काळगावकर यांच्यासह इतर सेमी धारकांनी गुलाल उधळण करीत जल्लोष केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी उपसरपंच संजय लोहार यांनी सर्वांचे स्वागत केले. अमित कापसे यांनी आभार मानले.
    
 चौकट   
    उपसरपंच संजय लोहार यांच्याकडून प्रथम आलेल्या सहा क्रमांकास ढाली देण्यात आल्या तर कॉटर सेमी फायनल मध्ये आलेल्या प्रथम सहा क्रमांकास ॲड ए. पी. पाटील यांच्याकडून 2000 बक्षिस व सन्मान चिन्ह शिवमुद्राचे अध्यक्ष प्रकाश उर्फ बबलू पाटील यांच्याकडून देण्यात आले.
      शर्यती यशस्वी करण्यासाठी अमित कापसे, ग्रा. सदस्य बाळासाहेब कदम, पोलिस पाटील विजय लोहार, मा. चेअरमन दादासाहेब साळुंखे, मा. सरपंच सतिश कापसे, शिवमुद्रा संस्थापक शिवाजी यादव, मा. चेअरमन अविनाश साळुंखे, समीर साळुंखे, सदाशिव कदम महाराज, धनाजी भरुगडे, राजू देसाई, राजाभाऊ रोडे, सचिन लोहार, रमेश पाटील या प्रमुख कार्यकर्त्यांसह चेतना, दत्तगुरु, हनुमान, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

येरफळे येथे श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी.


पाटण, प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील येरफळे गावात श्री स्वामी समर्थ महाराज व संत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी युवक व ग्रामस्थांच्या संयुक्त पुढाकारातून अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात संतांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संतांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या अद्वैत, भक्ती व सेवाभावाच्या शिकवणीबरोबरच संत गोरा कुंभार यांच्या साधेपणा, श्रमसंस्कार आणि नामस्मरणाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात सद्भावना, एकात्मता आणि सेवा वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. संतांचे विचार हे आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक असून त्यांच्या शिकवणीतून जीवन जगण्याची दिशा मिळते, असे मतही व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे गावात एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली असून नव्या पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भविष्यातही अशा धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शंकर भिसे यांनी केले. यावेळी श्री. संतोष कदम सर, श्री. विकास पडवळ, श्री. रामचंद्र भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अरविंद पडवळ सर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महादेव कुंभार, बाळासाहेब भिसे, दादासो कुंभार, बाळासो कुंभार, बबन कोळी, विकास पडवळ, संतोष कदम सर, बबन पाटील, आत्माराम पाटील, संजय पडवळ, आनंदा पानस्कर, अरविंद पडवळ, पांडुरंग चव्हाण, रामचंद्र कदम, अंकुश माळी, निखिल पडवळ, गणेश भेलसे, रविंद्र पुजारी, तुकाराम मुगदुम आदींसह ग्रामस्थ व युवकांनी विशेष परिश्रम घेतले.

*कु. समर्थ बोरगे यांची उल्लेखनीय कामगिरी; नॅशनल हिंदी ऑलिम्पियाडमध्ये केंद्रात प्रथम.*



कुंभारगाव (ता. पाटण) येथील जि. प. प्राथमिक शाळा कुंभारगाव नं. २ मधील विद्यार्थी कु. समर्थ संतोष बोरगे याने Talent Olympiad आयोजित नॅशनल हिंदी ऑलिम्पियाड (इयत्ता ७ वी) स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. समर्थने या स्पर्धेत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत राज्यस्तरावर १७ वा क्रमांक मिळवला असून त्याला Excellence Award ने गौरविण्यात आले आहे.

 अत्यंत स्पर्धात्मक आणि दर्जेदार असलेल्या या परीक्षेत समर्थने मिळवलेले यश हे त्याच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित मानले जात आहे.त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा न.2 चाळकेवाडी एकूण 7 विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते सर्व विद्यार्थी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले आहेत.

शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद तसेच पालकांनी समर्थचे विशेष कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर विद्यार्थ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच, ग्रामपंचायत चाळकेवाडीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, शिक्षकवर्ग, विद्यार्थीवृंद आणि पालक यांनी समर्थ बोरगे याच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

कुंभारगावच्या शैक्षणिक प्रगतीचा हा एक अभिमानास्पद टप्पा मानला जात असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

मंगळवार, १४ एप्रिल, २०२६

*मत्रेवाडीतील — शेडला भीषण आग, दोन म्हशी होरपळल्या*


साप्ताहिक कुमजाई  पर्व न्यूज मत्रेवाडी (ता. पाटण) येथील एका कष्टकरी शेतकऱ्यावर अचानक ओढवलेल्या आगीच्या संकटामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यशवंत ज्ञानू मत्रे यांच्या जनावरांच्या शेडला लागलेल्या आगीत दोन म्हशी गंभीर भाजल्या असून शेड पूर्णतः जळून खाक झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत मत्रे हे काल सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या घराजवळील शेडमधील जनावरांना चारापाणी करून घरी झोपायला गेले होते. सर्व काही सुरळीत असताना रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास अचानक शेडमधून धूर निघताना दिसला. घरच्यांनी तत्काळ धाव घेतली असता शेडला भीषण आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

क्षणातच परिस्थिती गंभीर बनली. त्यांनी तात्काळ आरडाओरडा केल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्न करून आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या आगीत शेड पूर्णपणे जळून खाक झाले असून अंदाजे ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेडमध्ये बांधलेल्या दोन म्हशी या आगीत गंभीर भाजल्या. त्यांच्या गळ्यातील दोऱ्या जळून तुटल्याने त्या कसाबसा जीव वाचवू शकल्या, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी रामचंद्र कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेमुळे मत्रे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून त्यांना तात्काळ शासकीय मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मत्रेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “कष्टाने उभं केलेलं सगळं काही क्षणात जळून खाक झालं,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

रविवार, १२ एप्रिल, २०२६

*सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे म. ज्योतिबा फुले:- सुरेश यादव*

 (कराड प्रतिनिधी) 11 एप्रिल 2026 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह व महात्मा फुले जयंती द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग यांचे वतीने महात्मा फुले: जीवन व कार्य या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. सुरेश यादव होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, सामाजिक विषमतेच्या अंधकारावर समतेचा प्रकाश टाकणारा क्रांतीसुर्य म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. हजारो वर्षाच्या सामाजिक गुलामगिरीत संपूर्ण बहुजन समाज देशात अडकलेला होता. अन्याय, अज्ञान, अस्पृश्यता, जातीभेद या समस्यांनी संपूर्ण समाज गुरफटलेला  होता. अशा परिस्थितीत महात्मा फुलेंनी सामाजिक समतेची चळवळ सुरू केली . स्वतःची पत्नी सावित्रीबाईंना शिक्षित करून इतर स्त्रियांना शिकवायला लावले. स्त्री शिक्षणास सुरुवात केली. अनेक शाळा सुरू केल्या. अन्याय अत्याचार झालेले स्त्रियांच्यासाठी पाळणाघरे सुरू केली. अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी स्वतःचा पानवठा उपलब्ध करून दिला. ब्रिटिश राजपुत्रा पुढे भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले हे गर्भ श्रीमंत होते. त्यांची स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी होती.  सुखांचा उपभोग घेण्यापेक्षा समाजसेवेचे व्रत त्यांनी ठेवले.
          कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, या देशात सामाजिक समता चळवळीचे मुख्य प्रेरणास्थान म्हणजे महात्मा फुले होत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसुर्य महात्मा फुले या पती-पत्नींनी दिनदलित व सर्व समाजातील स्त्रिया यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. या अन्याया मागचे मुख्य कारण अज्ञान आहे. हे त्यांनी ओळखले व शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शाळा सुरू केल्या व समाज घडविण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंचे कार्य भविष्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेले. आज जयंतीदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीने मी विनम्र अभिवादन करतो!
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रघुनाथ गवळी कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी केले. आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन प्रा. मनाली रानडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व सर्व प्राध्यापक गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

श्री क्षेत्र करपेवाडीची ५४ वर्षांची अखंड परंपरा; ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाने रंगली भक्तीमय यात्रा.


तळमावले/पाटण :
अध्यात्मिक वारसा आणि संत परंपरेची अखंड ज्योत जपत श्री क्षेत्र करपेवाडी (ता. पाटण) येथे यंदाही ५४ व्या वर्षी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला. तमाशा, कुस्ती, मनोरंजनाच्या कार्यक्रमांना पूर्णतः फाटा देत केवळ अध्यात्मिक आणि संस्कारमय परंपरा जपणारी ही यात्रा परिसरात आदर्श ठरत आहे.

यंदाचा सप्ताह ३ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडला. या दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, कीर्तन, हरिपाठ, काकडा आदी धार्मिक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन पारायण मंडळ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले. संपूर्ण आठवडाभर गाव परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला होता.

गुरुवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी श्री मसनाई माता मंदिरात ग्रामस्थांच्या हस्ते महाआरती पार पडली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल व खोबऱ्याच्या उधळणीत श्री मसनाई मातेची पालखी सासन काठ्यांसह भव्य मिरवणुकीतून मंदिरात दाखल झाली. रात्री ह.भ.प. रोहिदास महाराज मालुसरे (वाई) यांचे भावस्पर्शी कीर्तन झाले, ज्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेले.

शुक्रवार, १० एप्रिल हा यात्रेचा मुख्य दिवस ठरला. सकाळी देवीची आरती करून पालखी, मानकरी, सासन काठ्या, ग्रामस्थ, युवक वर्ग आणि भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबरे उधळीत व फटाक्यांच्या आतषबाजीत छबीना भवानी मातेच्या मंदिराकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाई विशेष भक्तीभावाने सहभागी झालेली दिसून आली.

पालखीचे गोल रिंगण हा सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. माहेरवाशिणी, महिला वर्ग, युवक आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर पारंपरिक मानाचे दंड स्थान विधी पार पडले. सकाळी ११ ते १२ या वेळेत ह.भ.प. बाबुराव महाराज मस्कर यांचे काल्याचे कीर्तन झाले.

या अध्यात्मिक उत्सवाची सांगता दहीहंडी फोडून व महाप्रसादाने करण्यात आली. संपूर्ण यात्रा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तीमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली.

ही परंपरा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी, पारायण मंडळ, ग्रामस्थ, युवक वर्ग यांनी मोठे परिश्रम घेतले. करपेवाडी ग्रामस्थांनी जपलेली ही ५४ वर्षांची अध्यात्मिक परंपरा आजच्या आधुनिक काळातही संस्कार आणि भक्तीची प्रेरणा देणारी ठरत आहे.

बुधवार, ८ एप्रिल, २०२६

तळमावले - “मैत्रीचाच झाला घात! आंबा घाटात मित्रानेच घेतला जीव; अपघाताचा बनाव अखेर उघड”


साप्ताहिक कुमजाई पर्व सविस्तर बातमी:
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे ३१ मार्च रोजी घडलेल्या घटनेने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

देवरुख पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर यादव आणि आशिष भावके हे दोघे जिवलग मित्र असून नातेवाईकही होते. ते दोघे रत्नागिरी येथे फिरण्यासाठी गेले होते. ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले आणि परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र ३१ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे दोघांमध्ये वाद झाला.

दारू पिण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद अचानक विकोपाला गेला. संतापलेल्या सुधीर यादव याने आशिषच्या गाडीच्या बोनेटवर चढून काच फोडली व वाहनाचे नुकसान केले. यामुळे संतप्त झालेल्या आशिषने गाडी भरधाव वेगाने चालवली. सुधीर खाली पडल्यास त्याचा जीव जाऊ शकतो, हे माहीत असूनही त्याने गाडी न थांबवता पुढेच नेली.

दरम्यान, सुधीर बोनेटवरून खाली पडला आणि काही अंतर फरपटत गेला. यात त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर अवस्थेत त्याला मदत करण्याऐवजी आशिष घटनास्थळावरून पसार झाला, ही बाब अधिकच धक्कादायक आहे.

दुसऱ्या दिवशी जखमी अवस्थेत सुधीर यादव याला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.

परंतु देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या सखोल तपासात हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांच्या फिर्यादीवरून आशिष भावके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

भावपूर्ण स्मरणातून भक्तीचा सोहळा – धामणी येथे कै. सौ.कोमल शंकर सावंत यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त जाहीर कीर्तन.




ता. पाटण येथील धामणी गाव आज संध्याकाळी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. गावातील कै.सौ. कोमल शंकर सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त एक भावपूर्ण आणि आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सायंकाळी ठीक ७ वाजता सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे जाहीर कीर्तन संपन्न होणार आहे.

कै. सौ. कोमल सावंत यांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा सन्मान राखण्यासाठी हा भक्तीमय उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, संस्कार आणि अध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम साधला जाणार आहे.

धामणी पंचक्रोशीतील सर्व भाविक, नागरिक व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कीर्तनाचा लाभ घ्यावा, तसेच पुण्यस्मरण सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवून दिवंगत आत्म्यास आदरांजली वाहावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामुळे गावात एकात्मता, श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असून, कै. सौ. कोमल सावंत यांच्या स्मृतींना हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरणार आहे.

शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*


साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विनोद कदम हे जेवण करून घरी झोपले होते. अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते तात्काळ घराबाहेर आले. बाहेर येताच त्यांनी पाहिले की, एका बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला पकडले होते.

धाडसाने त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बिबट्याने संतापून त्यांच्यावरच झडप घातली. झालेल्या झटापटीत कदम जखमी झाले. आरडाओरड आणि गोंधळामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विनोद कदम यांना तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

शुक्रवार, ३ एप्रिल, २०२६

रयत सहकारी पतपेढीचा रौप्यमहोत्सवी टप्पा; २५ कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल, सभासदांसाठी ११% व्याजदराची विशेष ठेव योजना.



मुंबई – रयत सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई-२ या संस्थेने आपल्या स्थापनेपासून सामाजिक बांधिलकी जपत आज २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेचे संस्थापक-संचालक श्री. शिवाजीराव बापूसाहेब माटेकर यांनी सन २००२ मध्ये गोरगरीब जनतेची आर्थिक अडचण दूर व्हावी आणि सावकारीच्या जाचक व्याजातून त्यांची मुक्तता व्हावी या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना केली.

स्थापनेपासूनच सर्वसामान्यांच्या विश्वासावर उभी राहिलेली ही संस्था आज भक्कम आर्थिक प्रगती करत असून सन २०२६ अखेर संस्थेचा व्यवसाय तब्बल १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे, रौप्यमहोत्सवी वर्षात संस्था २५ कोटींच्या व्यवसायाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

या विशेष वर्षानिमित्त संस्थेने आपल्या सभासदांसाठी आकर्षक मुदत ठेव (FD) योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत ३७ महिन्यांच्या कालावधीसाठी ११% इतका आकर्षक व्याजदर देण्यात येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीसह जास्त परतावा मिळवण्याची ही उत्तम संधी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग तसेच दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही प्रगती साध्य झाली असून, आगामी काळातही सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.

तरी सर्व सभासद व हितचिंतकांनी या रौप्यमहोत्सवी विशेष ठेव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.या योजनेबाबत अधिक माहिती, अटी व शर्ती जाणून घेण्यासाठी सभासदांनी जवळच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपर्कासाठी –

मुख्य कार्यालय (धोबीतलाव): ८३६९३४४८५८

पवई शाखा: ७०२१६९०९६१

सानपाडा शाखा: ९३७२४२७२३६

बुधवार, १ एप्रिल, २०२६

“गोवा मुक्ती संग्रामातील शिलेदार हरपला… कुंभारगावचे जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक गणपत गुरव यांचे निधन”


कुंभारगाव (ता. पाटण) येथील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक, गोवा मुक्ती संग्रामातील धाडसी शिलेदार श्री. गणपत विष्णू गुरव यांचे दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कुंभारगावसह संपूर्ण पाटण तालुक्यावर शोककळा पसरली असून, स्वातंत्र्यलढ्यातील एक जिवंत इतिहास आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

स्वातंत्र्य, न्याय आणि देशभक्ती यांसाठी आयुष्य झिजवणारे गणपत गुरव हे पाटण तालुक्यातील एकमेव जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात होते. विशेषतः गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य होते. त्यांच्या धाडस, त्याग आणि राष्ट्रप्रेमामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. अनंत गुरव, मंडळ अधिकारी श्री. मुल्ला, तलाठी श्री. गायकवाड तसेच कुंभारगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा श्री. संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), सून सौ. वैशाली गुरव (ग्रामपंचायत सदस्य), दोन मुली, तसेच नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता वैकुंठधाम, कुंभारगाव येथे होणार आहे.

गणपत गुरव यांचे आयुष्य म्हणजे देशसेवेचा दीपस्तंभच… त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहतील.

शेतात झाडाच्या फांद्या तोडताना लागला विजेचा धक्का; उमरकांचनच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

पाटण तालुक्यातील जिंती - उमरकांचन गावावर दुःखाचे सावट पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. शेतातील झाडाच्या फांद्या तोडत असताना विजेचा तीव्र धक्का बसून आनंदा विष्णू मोहिते (वय ५६) या कष्टकरी शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा मोहिते हे आपल्या पानंदिवली शिवारातील शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेले होते. शेतातील झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम ते करत होते.करंजीच्या झाडावर चढून फांद्या तोडत असताना अचानक एक फांदी तुटून जवळून गेलेल्या ३३ केव्ही वीजवाहक तारांमध्ये अडकली. क्षणार्धात जोरदार विद्युतप्रवाह त्या फांदीतून त्यांच्या शरीरात उतरला आणि त्यांना भीषण शॉक बसला.

घटना इतकी अचानक आणि भीषण होती की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. काही क्षणातच त्यांनी प्राण सोडले. कुटुंबासाठी आधारस्तंभ असलेला माणूस अशा दुर्दैवी घटनेत गमावल्याने मोहिते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती दादाराम मोहिते यांनी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, हवालदार प्रशांत चव्हाण, तसेच धीरज मुळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृतदेह पुढील तपासणीसाठी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. पी. दोडके पुढील तपास करत आहेत.

शेतात काम करताना विजेच्या तारांपासून सुरक्षित अंतर राखणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून देणारी ही दुर्दैवी घटना आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा उघड्या वीजवाहक तारांबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...