शनिवार, ४ एप्रिल, २०२६

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*


साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात कदम जखमी झाले असून त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ मार्च रोजी रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास विनोद कदम हे जेवण करून घरी झोपले होते. अचानक त्यांच्या पाळीव कुत्र्याचा जोरात ओरडण्याचा आवाज आल्याने ते तात्काळ घराबाहेर आले. बाहेर येताच त्यांनी पाहिले की, एका बिबट्याने त्यांच्या कुत्र्याला पकडले होते.

धाडसाने त्यांनी कुत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बिबट्याने संतापून त्यांच्यावरच झडप घातली. झालेल्या झटापटीत कदम जखमी झाले. आरडाओरड आणि गोंधळामुळे बिबट्या घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विनोद कदम यांना तातडीने ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून पाहणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे पवारवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्री एकटे बाहेर न पडणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे व संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असेही सांगण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*मध्यरात्रीचा थरार! कुत्र्याला वाचवताना शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला; पवारवाडीत भीतीचे सावट*

साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - पवारवाडी कुठरे (ता. पाटण) येथे मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत शेतकरी विनोद भीमराव कदम या...