प्रतिनिधी - राजेंद्र पुजारी कुंभारगाव : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी महिला बचत गट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याच सामाजिक बांधिलकीतून कुंभारगाव (ता. पाटण) येथील चोरगेवाडी व पडवळवाडी परिसरातील श्री गणेश स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि श्री बेलजाई देवी स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकू समारंभ व दिवाळी साहित्य किट वाटपाचा कार्यक्रम रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री बेलजाई देवी मंदिराच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जय हिंद महिला प्रभाग संघ, काळगावच्या प्रभाग व्यवस्थापक सौ. प्रियंका प्रशांत डुबल, सीआरपी सौ. अश्विनी कोकाटे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील अमित शिंदे, शिवाजी घाडगे तसेच स्पंदन एक्सप्रेसचे प्रतिनिधी राजेंद्र पुजारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे पोलीस पाटील अमित शिंदे म्हणाले की, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा महिला बचत गट स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. महिलांमध्ये नियमित बचतीची सवय निर्माण करणे, गरजेच्या वेळी कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे आणि सावकारांच्या कर्जाच्या विळख्यातून महिलांची सुटका करणे यामध्ये बचत गटांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना लघुउद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे कुटुंबाच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. महिलांना आर्थिक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, कौशल्य विकास, व्यवसाय व्यवस्थापन तसेच तांत्रिक व व्यावहारिक प्रशिक्षण देणे हीदेखील बचत गटांची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
महिलांनी एकत्र येऊन नियमित बचत करणे, अंतर्गत कर्जवाटप करताना पारदर्शकता राखणे आणि आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक आहे. सामाजिक प्रश्न असोत किंवा आपत्कालीन परिस्थिती, अशा वेळी बचत गटातील महिलांनी एकमेकींच्या पाठीशी उभे राहून सामूहिक शक्ती वाढवावी. या माध्यमातून महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, श्री गणेश स्वयंसहाय्यता महिला बचत गट व श्री बेलजाई देवी स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा दिवाळी साहित्य किट वाटप व हळदी-कुंकू समारंभ महिलांसाठी आनंददायी ठरला. यावेळी बचत गटातील महिलांना दिवाळीनिमित्त साहित्य किटचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व महिलांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांच्या एकजुटीला प्रोत्साहन देणारा, आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देणारा आणि सणासुदीच्या काळात आनंदाची देवाणघेवाण घडवून आणणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात इतर महिला बचत गटांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास नागरी पतसंस्था, तळमावले शाखेचे व्यवस्थापक आनंदा चोरगे (साहेब), बाळासो चोरगे, अशोक विठ्ठल चोरगे, रामचंद्र गणपत वाघ, चंद्रकांत यशवंत चोरगे, खाशाबा विठ्ठल चोरगे, योगेश खाशाबा वाघ, महेश मारुती भातभके यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महेश दिलवाले यांनी केले.