शनिवार, ३ जानेवारी, २०२६

*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.*



*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.*

भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; दोन शेळ्या ठार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान**

कुंभारगाव (ता. पाटण) | प्रतिनिधी : साप्ताहिक कुमजाई पर्व

कुंभारगाव–गलमेवाडी ता. पाटण येथील भरवस्तीत बिबट्याने घुसखोरी केल्याची धक्कादायक घटना घडली असून, रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

गलमेवाडी येथील शेतकरी लिलाबाई काशिनाथ चोरगे यांच्या घरालगत असलेल्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही शेळ्या जागीच मृत्युमुखी पडल्या असून, चोरगे कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहाटे ही घटना उघडकीस येताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे. मात्र, भरवस्तीत बिबट्या येऊन हल्ला करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे हा परिसर मानवी वस्तीने दाट असून, लहान मुले, महिला व वृद्धांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार असल्याने कधी मोठी दुर्घटना घडेल याचा नेम नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरे लावावेत तसेच रात्री गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी केली आहे. यापूर्वीही या परिसरात वन्यप्राण्यांचा वावर आढळून आला असून, प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत तर भविष्यात मानवी जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.वन विभाग आता काय कारवाई करतो याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...