बुधवार, २५ मार्च, २०२६

तळमावले परिसरात पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी; अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम.तेल पुरवठा सुरळीत ! अफवांवर विश्वास ठेवू नका पुरवठा विभागाचे आवाहन.

 

📍 तळमावले, ता. पाटण | दि. २५ मार्च २०२६

तळमावले व परिसरात आज सकाळपासून पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी घाईघाईने इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली.

स्थानिकांमध्ये अशी चर्चा सुरू होती की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेल टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर अनेकांनी खबरदारी म्हणून आपल्या वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्याचा प्रयत्न केला.

परिणामी, तळमावलेत विविध पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची परिस्थितीही निर्माण झाली होती. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंप कर्मचाऱ्यांनाही ताणाचा सामना करावा लागला.पेट्रोल पंप धारकांनाही याबाबत आगाऊ सूचना मिळाली नसून तेल पुरवठा व्यवस्थित सुरू आहे.पण अफवा पसरल्यामुळे नागरिक विनाकारण पंपावर तेल भरण्यासाठी गर्दी करत आहे,असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर स्पष्टीकरण देताना पुरवठा विभाग पाटणचे अधिकारी श्री. ज्ञानेश्वर खरोडे यांनी स्पष्ट केले की,
“तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोणतीही टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.”

तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केली की, अनावश्यक घाई किंवा साठेबाजी टाळावी आणि परिस्थिती शांत ठेवण्यास सहकार्य करावे.

सद्यस्थितीत कोणतीही इंधन टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. अफवांमुळे निर्माण होणारी घबराट टाळणे हीच खरी जबाबदारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शनिवार, २१ मार्च, २०२६

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.


सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होणार आणि कोणाचा ‘गेम’ वाजणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क रंगत असतानाच अखेर २० मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड पार पडली आणि जिल्ह्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.

सुरुवातीला सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता स्थापन होईल, असे स्पष्ट चित्र दिसत होते. मात्र शेवटच्या क्षणी घडलेल्या राजकीय घडामोडींनी सर्व गणिते कोलमडली आणि भाजपने अनपेक्षितरीत्या बाजी मारत जिल्हा परिषदेत ‘कमळ’ फुलवले.

या निवडीत भाजपच्या प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर राजू भोसले यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. या निकालामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांना जबर धक्का बसला आहे.

दरम्यान, या विजयाचा आनंद तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

या वेळी भारतीय जनता पार्टी पाटण तालुका अध्यक्ष मा. गणेशजी यादव, बनपुरी ग्रामपंचायत सदस्य सुरेश पाटील, तालुका उपाध्यक्ष बाबा मोकाशी, कामगार मोर्चा अध्यक्ष ओमकार माने, सरचिटणीस संतोष देसाई, दिव्यांग आघाडी अध्यक्ष गणेश पाटील, धनाजी मोहिते, दरबार हॉटेलचे मालक महेंद्र कांबळे, भगवान माने तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निकालामुळे सातारा जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर मोठा प्रभाव पडणार असून पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुक्रवार, २० मार्च, २०२६

ढेबेवाडी - श्री नाईकबा यात्रा २०२६ : प्रशासनाचा यात्रा तयारीचा आढावा पूर्ण.

 

ढेबेवाडी, ता. 20 : श्री क्षेत्र बनपुरी येथील श्री नाईकबा देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसह स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

आज प्रांताधिकारी सोपान टोंपे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली असून यात्रेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविताना हयगय अजिबात सहन केली जाणार नाही, असा कडक इशारा देण्यात आला.

येत्या २३ मार्च रोजी नैवेद्य तर २४ मार्च रोजी पालखी सोहळा होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


 बैठकीतील प्रमुख निर्णय व सूचना

  • धोकादायक वीजवाहिन्या व केबल्सचा तातडीने सर्व्हे करून दुरुस्ती
  • वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस व आरटीओ यांचा समन्वय
  • पुरेसा पोलिस बंदोबस्त व सीसीटीव्ही यंत्रणा
  • पार्किंगची सुयोग्य व्यवस्था
  • पिण्याच्या पाण्याची शुद्धता तपासणी
  • आरोग्य पथके व औषध साठा सज्ज ठेवणे
  • बेकायदा दारू विक्रीवर कठोर कारवाई
  • स्वयंसेवकांची विशेष टीम नियुक्त
  • मंदिर परिसरात कंट्रोल रूम उभारणे
  • गर्दीत बैलांना प्रवेश न देण्याचे निर्देश
  • अग्निशमन यंत्रणा व अँब्युलन्स सेवा तैनात
  • महिंद धरणातून योग्य वेळी पाणी सोडण्याचे नियोजन

या बैठकीस प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव, सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, उपअभियंता गिरीश सावंत, सरपंच मनोज पाटील, उपसरपंच सचिन जानुगडे, ट्रस्ट अध्यक्ष विलासराव जानुगडे, ॲड. अविनाश जानुगडे, तसेच ग्रामपंचायत, यात्रा समिती, ट्रस्ट पदाधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यात्रेकरूंना मदत व्हावी यासाठी अत्यावश्यक मोबाईल क्रमांकांसह विशेष माहितीपत्रक (डायरी) तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

यंदाची श्री नाईकबा यात्रा अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध होण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

गुरुवार, १९ मार्च, २०२६

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

कळंत्रेवाडी भैरवदरा येथे एस.टी. बस थांबा बोर्ड; प्रवाशांच्या अडचणींचा शेवट.

ठाणे – गलमेवाडी मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड घडली आहे. कुंभारगाव–मान्याचीवाडी दरम्यान असलेल्या कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अखेर एस.टी. बस थांब्याचा अधिकृत बोर्ड आज दिनांक १९ मार्च २०२६ रोजी बसविण्यात आला.

ठाणे ते गलमेवाडी व गलमेवाडी ते ठाणे अशी एस.टी. बस सेवा दररोज सुरू असली, तरी कळंत्रेवाडी भैरवदरा येथे अधिकृत थांबा दर्शवणारा बोर्ड नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रत्येक वेळी चालक व वाहक वेगळे असल्याने या ठिकाणी बस थांबवावी की नाही, याबाबत संभ्रम निर्माण होत असे. परिणामी, बस थांबवण्यावरून प्रवासी व एस.टी. कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार वाद होत होते.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत कळंत्रेवाडी भैरवदरा येथील ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, आज अधिकृत थांबा बोर्ड बसवण्यात आला आहे.

या बोर्डामुळे आता चालक व वाहकांना स्पष्ट मार्गदर्शन मिळणार असून, सर्व एस.टी. बसेस नियमानुसार येथे थांबतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून, “ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे ही समस्या सुटली,” अशी भावना व्यक्त केली आहे.

ही सुविधा सुरू झाल्याने कळंत्रेवाडी भैरवदरा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवार, १८ मार्च, २०२६

*'सेल्फी विथ गुढी' स्पर्धेत सहभागी होण्याचे 'स्पंदन' चे आवाहन*


तळमावले/वार्ताहर : 
गुढीपाडवा हा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुध्द
प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या
पहिल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा
केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. हिंदू नवीन वर्ष या दिवसापासून सुरु होते. साडेतीन मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. दारी
उभारलेली गुढी हे विजय आणि समृध्दीचे प्रतिक आहे असे मानले जाते. त्याचे औचित्य साधत
'चला संस्कृती जपूया' ही टॅगलाईन घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने 'सेल्फी विथ गुढी' ही
अनोखी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे हे सातवे पर्व आहे. सध्या अनेकजण सेल्फी काढून फेसबुक,  व्हॉटसअप, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड करीत असतात. सेल्फी काढण्याचा मोह तरुणांपासून ज्येष्ठापर्यंत कुणालाही आवरता आलेला नाही. याच क्रेझचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग कसा करता येईल याचा विचार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शेतीमित्र डॉ. संदीप डाकवे यांनी केला. आजही आपण आपली संस्कृती तितक्याच उत्साहाने जपत आहोत हे
दर्शवण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने 'सेल्फी विथ गुढी' ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली आहे. ट्रस्टने आतापर्यंत राबवलेल्या प्रत्येक सामाजिक, कलात्मक उपक्रमाला समाजाच्या सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आपण आपला सेल्फी
'व्हॉटसअप' करायचा आहे. सेल्फी काढताना आपण पारंपारिक पोशाख परिधान केलेला असावा.
सेल्फी मधून आपण आपली संस्कृती जपत असल्याचे दिसले पाहिजे. सदर सेल्फी गुढीपाडव्यादिवशी म्हणजेच गुरुवार दि. 19 मार्च, 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवायचा आहे. सदर सेल्फी पाठवताना त्यावर संपूर्ण नाव आणि पत्ता नमूद करणे आवश्यक आहे. सदर सेल्फी ९७६४०६१६३३ भ्रमणध्वनीवरती पाठवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अभिमानपत्र आणि पुस्तक देवून सन्मानित करण्यात येईल. तर सर्व सहभागी स्पर्धकांना ई-डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 'सेल्फी विथ गुढी' या स्पर्धेत आतापर्यंत 24 जणांना गौरवले आहे. नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट ने आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे. या कामाची दखल घेत स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला अनेक पुरस्कारानी गौरवण्यात आले आहे.

*“वाघजाई देवी यात्रोत्सव २०२६ : भक्ती, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा भव्य संगम*


मौजे अंबवडे खुर्द परिसरातील सिध्दार्थ नगर, मघले आवाड, पुढचे आवाड, महादेव नगर, शिंदेवाडी व चोरगेवाडी या गावांचे ग्रामदैवत असलेल्या जागृत देवस्थान श्री वाघजाई देवीच्या भव्य वार्षिक यात्रोत्सवाचे आयोजन गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. सकाळी ८.०० ते सायं. ६.३० या वेळेत होणाऱ्या या सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या यात्रोत्सवात धार्मिक विधींसह सामाजिक उपक्रमांचाही सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. सकाळी ८ वाजता श्री वाघजाई देवीला अभिषेक, पूजा, आरती व नैवेद्याने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री नवलाई देवीची पूजा पार पडेल.

विशेष म्हणजे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी, उपचार व भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून, समाजासाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. “रक्तदान करा, जीवनदान द्या” या संदेशासह नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारी २.३० वाजता सरपंच सौ. अनिताताई मोडे व मान्यवरांच्या शुभहस्ते देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर माहेरवाशिनींसाठी हळदी-कुंकू समारंभ रंगणार आहे. दुपारी ३.१५ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

दुपारी ३.३० वाजता श्री काळेश्वर देवाच्या पालखीचे आगमन होऊन, पालखी सोहळा आणि देवी दर्शनाचा भव्य कार्यक्रम पार पडेल. सायंकाळी ५ ते ६ दरम्यान गुलाल व खोबरे उधळत यात्रोत्सवाचा जल्लोषमय वातावरणात समारोपाकडे प्रवास होईल. सायं. ६.४५ वाजता यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

भाविकांच्या सोयीसाठी नवलाई देवी परिसरात पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. या यात्रोत्सवाचे आयोजन वाघजाई युवामंच शिंदेवाडी-चोरगेवाडी, ग्रामस्थ व श्री काळेश्वर देवस्थान समिती, अंबवडे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

तसेच शिवसमर्थ परिवार संचलित शिवआरोग्य सेवा हॉस्पिटल, तळमावले आणि महालक्ष्मी ब्लड सेंटर, कराड यांच्या सहकार्याने आरोग्य व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

“चला, रक्तदान करूया आणि एखाद्याच्या जीवनात आनंदाचा किरण निर्माण करूया!”

📞 संपर्क: 94212 09047 / 8169005578 / 70399 03639

👉 आयोजकांनी सर्व भाविकांना सहकुटुंब, मित्रपरिवारासह उपस्थित राहून श्री वाघजाई देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि यात्रोत्सवाची शोभा वाढवावी, असे कळकळीचे आवाहन केले आहे.

मंगळवार, १७ मार्च, २०२६

“कुंभारगाव - पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमास मान्याचीवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

“पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमास मान्याचीवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

पाटण तालुक्यात शासनाच्या योजना गावपातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब यांच्या संकल्पनेतून  राबविण्यात येत असलेल्या “पालकमंत्री कार्यालय आपले दारी” या उपक्रमास मान्याचीवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आज मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पाहायला मिळाले.

राज्याचे  मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांची माहिती घेतली तसेच आपल्या अडचणी मांडल्या.

मान्याचीवाडी येथील श्री कुमजाई देवी मंदिर येथे पार पडलेल्या या शिबिरात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध योजना, कागदपत्रे, दाखले, तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. अनेक नागरिकांची कामे तत्काळ मार्गी लागल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

या उपक्रमामुळे नागरिकांना तालुका कार्यालयात वारंवार जावे लागण्याची गरज कमी होत असून, शासन सेवा थेट गावपातळीवर उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी युवा नेते श्री. स्वप्नील भरत माने, शिवसेना शाखा प्रमुख श्री. पांडुरंग आबासो माने, उपशाखा प्रमुख श्री. कुणाल पोपट माने, कुमजाई देवी चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार श्री. संजय बापूराव माने, श्री. तानाजी खाशाबा कुसळे, श्री. रोहित नारायण माने श्री,उमेश बबन माने,श्री.दिलीप आनंदा माने,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक करण्यात येत असून, अशा प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

*HPV लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे शुभारंभ*

*HPV लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र हेळगाव येथे शुभारंभ* 

 : एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी सविस्तर मार्गदर्शक 

लॉन्च कार्यक्रमानंतर दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ पासून एचपीव्ही लसीकरण मोहिम पुढील सविस्तर मार्गदर्शक सूचनांनुसार सुरू करण्यात यावीः

 *लक्षित गट (Target Population):* 

वय वर्षे १४ पूर्ण झालेल्या मुली (ज्यांनी १४ वा वाढदिवस साजरा केला आहे, पण १५ वा वाढदिवस साजरा केलेला नाही).

 *१४ वर्षाच्या मुली एकूण* लोकसंख्येच्या अंदाजे १% असतील.

ज्या मुली लॉन्चनंतर पुढील ९० दिवसांत १५ वर्षांच्या होतील, त्यांनाही तीन महिन्यांच्या विशेष एचपीव्ही लसीकरण मोहिमेत लस देण्यात येईल.

 *अपात्रता निकष* (Exclusion Criteria):

मध्यम किंवा गंभीर आजार असलेल्या मुलींना पूर्ण बरे होईपर्यंत लस देऊ नये.

ज्यांना पूर्वीच्या लसीकरणामुळे ऍलर्जिक प्रतिक्रिया झाली आहे किंवा ज्यांना यीस्टची ऍलर्जी आहे.

गर्भवती मुली.

लसीकरण वयोगटाबाहेरील मुली.

ज्यांनी यापूर्वी एचपीव्ही लस (Gardasil / Gardasil-9/Cervarix/ Cervavac - एक किंवा अधिक डोस) घेतली आहे,

त्यांची नोंद U-WIN पोर्टलवर अ‌द्ययावत करावी.

 *लसीचे नाव व वैशिष्ट्ये* :

Gardasil 4 (Quadrivalent: 6, 11, 16, 18)

सिंगल डोस वायल (VVM 30 सह)

फ्रीझ सेन्सिटिव्ह

ILR मध्ये +2°C ते +8°C तापमानात साठवणूक करावी.

 *डोस व वेळापत्रक :* 

०.५ मि.ली. एकच डोस

डाव्या हाताच्या वरच्या भागात इंट्रामस्क्युलर (IM) पद्धतीने द्यावा.

 *सत्र स्थळेः* 

फक्त शासकीय आरोग्य संस्थाः

आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM)

प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHCs)

ग्रामीण रुग्णालये / उपजिल्हा रुग्णालये (SDHs)

जिल्हा रुग्णालये (DHS)

शासकीय वैद्यकीय महावि‌द्यालये व रुग्णालये (GMCHS)

 *अटः* 

EVIN नुसार कोल्ड चेन पॉइंट (CCP) असणे आवश्यक

AEFI व्यवस्थापनासाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी

इंटरनेट सुविधा, प्रिंटर व संगणक लॅपटॉप उपलब्ध असणे आवश्यक

 *सत्र वेळ:* 

सूक्ष्म आराखड्‌यानुसार लवधिक वेळेत सत्र आयोजित करता येतील.

 *सामान्यतः* सकाळी ९.०० ते दुपारी २.००, राज्य केंद्रशासित प्रदेश स्थानिक गरजेनुसार सुट्ट्या किंवा आठवड्याच्या शेवटी सत्र घेऊ शकतात.

AEFI प्रतिबंधासाठी घ्यावयाची सर्वसाधारण काळजी:

 *लसीकरणापूर्वी* :

लाभार्थी मुली उपाशी नसाव्यात.

पालकांना मुलीना नाश्ता/अन्न देऊन पाठवण्याचा सल्ला द्यावा. सत्रस्थळी नाश्ता न केलेल्या मुलींसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करावी

 *लसीकरणानंतर :* 

मुलीनी किमान ३० मिनिटे निरीक्षणाखाली थांबावे.

निरीक्षण कक्षात मनोरंजक उपक्रमांची व्यवस्था करावी, जेणेकरून वेदना किंवा भीती कमी होईल.

गर्दी टाळावी, जेणेकरून तणावामुळे होणाऱ्या प्रतिक्रिया कमी होतील.

AEFI व्यवस्थापन (लसीकरणानंतर होणाऱ्या प्रतिकूल घटना व्यवस्थापन):

HPV लस सर्वसाधारणपणे सुरक्षित आहे. मात्र काही लाभार्थीना लसीकरणानंतर सौम्य दुष्परिणाम जाणवू शकतात. बहुतेक दुष्परिणाम १-२ दिवसांत कमी होतात आणि हे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची नैसर्गिक प्रतिक्रिया असते.

 *सामान्य प्रतिक्रिया:* 

इंजेक्शनच्या जागी वेदना, लालसरपणा किंवा सूज, ताप, डोकेदुखी, थकवा, मळमळ, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे. (इंजेक्शनची भीती किंवा उपाशीपोटी लस घेतल्यामुळे चक्कर येऊ शकते, है HPV लशीशी संबंधित नसून किशोरवयीन मुलीमध्ये अधिक दिसते.)

इतर नियमित लसीप्रमाणे किरकोळ त्रास साध्या उपायांनी कमी करता येतो जसे की पॅरासिटामॉल देणे, जास्त द्रवपदार्थ पिणे, जास्त कपडे काढणे किंवा इंजेक्शनच्या जागी थंड प‌ट्टी ठेवणे

सर्व HPV लसीकरण सत्रस्थळे U-WIN वर जवळच्या 24x7 आरोग्य केंद्राशी जोडलेली असतील, जेणेकरून पालकांना सायंकाळी रात्री वै‌द्यकीय मदत मिळू शकेल. सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये HPV लसीकरणाबाबत माहिती व AEFI संदर्भासाठी 24x7 हेल्पलाईन उपलब्ध असेल.

सर्व लसीकरण सत्रस्थळांवर अनाफिलेक्सिस (तीव्र अलर्जिक प्रतिक्रिया) व्यवस्थापनासाठी AEFI किट उपलब्ध असेल. U-WIN पोर्टलवरून डाउनलोड केलेल्या लसीकरण प्रमाणपत्रावर जवळच्या 24x7 AEFI व्यवस्थापन केंद्राचा पत्ता व हेल्पलाईन क्रमांक दिलेला असेल.

HPV लसीकरण किंवा AEF संदर्भातील कोणत्याही शंका तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असेल.

 *संमती (Consent):* 

HPV लसीकरण हे स्वेच्छेने आहे. मुलीचे लसीकरण करण्यापूर्वी पालक पालकप्रतिनिधी यांची संमती घेणे बंधनकारक आहे.

U-WIN वर पालकांची डिजिटल संमती घेतली जाईल. इंटरनेट/मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसल्यास निर्धारित नमुन्यात लेखी संमती घेता येईल.

 *HPV लसीकरण कालावधी:* 

३ महिने (९० दिवस).

तीन महिन्यांच्या मोहिमेनंतर HPV लस नियमित लसीकरण सत्रांमध्ये उपलब्ध असेल.

 *लसीकरण पथकः* 

लसीकरणकर्ता (ANM / LHV / नर्स / CHO)
मोबिलायझर (ASHA / AWW / लिंक वर्कर)

पडताळणी अधिकारी (आरोग्य केंद्र कर्मचारी)

स्वयंसेवक (फिल्ड मॉनिटर / महिला आरोग्य समिती / जनआरोग्य समिती / आरोग्य कर्मचारी)

बोटावर चिन्ह (Finger Marking):

तीन महिन्यांच्या मोहिमेदरम्यान लसीकरणानंतर डाव्या हाताच्या तर्जनी (Index finger) वर चिन्ह केले जाईल.

 *नोंदणी प्रक्रिया:* 

लाभार्थी स्वतः U-WIN वर नोंदणी करू शकतात किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पूर्वनोंदणी करू शकतात व

अपॉइंटमेंट ठरवू शकतात.

ते थेट सत्रस्थळी जाऊन U-WIN डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑन-साइट नोंदणी करून लस घेऊ शकतात.

पालकांची संमती U-WIN वर घेतली जाईल, इंटरनेट नसल्यास लेखी संमती घेतली जाईल.

 *प्रमाणपत्र :* 

आवश्यक असल्यास लसीकरणानंतर लाभार्थी/पालक (आई/वडील) यांना प्रमाणपत्राची छापील प्रत दिली जाईल.

 *डिजिटल प्रणाली:* 

U-WIN डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर नोंदणी, नोंदवही व अहवालासाठी केला जाईल.

लसींचा साठा व लॉजिस्टिक व्यवस्थापन e-VIN प्रणाली‌द्वारे केले जाईल.

लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाव्यतिरिक्त इतर विविध संबंधित विभागांशी निकट समन्वय अत्यंत आवश्यक आहे. शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, आदिवासी व्यवहार विभाग, पंचायत राज, युवक व्यवहार व माहिती व प्रसारण विभाग यांचे वेळेवर संवेदनशीलता (sensitization) करणे महत्त्वाचे आहे. तसेच आपल्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील FOGSI, IMA, IAP, Lions Club/Rotary आणि कॅन्सर संस्था यांसारख्या व्यावसायिक संघटनांशी सक्रिय सहभाग आवश्यक आहे, जेणेकरून ते पालकांना त्यांच्या मुलीना HPV लस घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन देऊ शकतील. 

यावेळी  नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री लालासाहेब जगदाळे साहेब पंचायत समिती  सदस्या मा. सौ कोमल यादव मॅडम माजी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश लोखंडे, हेळगावचे विद्यमान सरपंच मा.मिलिंद पाटील बापू, उपसरपंच शिवाजी चोरमले, ग्रा प. सदस्य मा. वैभव इंगळे, तसेच ज्येष्ठ नागरिक श्री. किसन पाटील आबा, श्री. रविभाऊ सूर्यवंशी तसेच लाभार्थी व त्यांचे पालक, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आशा स्वयंसेविका उपस्थित होते

रविवार, १५ मार्च, २०२६

पाटण पंचायत समिती सभापती पदी ढेबेवाडी विभागातून संपदा जाधव यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा? उपसभापतीपदावर विजय पवार यांची वर्णी जवळपास निश्चित?

पाटण : पाटण तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पालकमंत्री मा. नामदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने दमदार विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष पाटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे लागले असून उद्या दि.16 मार्च रोजी सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार आहे.

यावेळी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला (खुला)’ असा आरक्षण प्रवर्ग जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील महिला सदस्यांमध्ये सभापतीपदासाठी चुरस वाढली असून तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सभापतीपदाच्या शर्यतीतील नावे 

 येराड पंचायत समिती गणातील विद्या शिंदे, मुरुड गणातील सविता पवार, मल्हारपेठ गणातील अर्चना पाटील, मारुल हवेली गणातील प्रियांका देसाई आणि सणबूर गणातून संपदा जाधव यांचा समावेश आहे.ढेबेवाडी विभागातून संपदा जाधव यांचे नाव सभापतिपदासाठी असल्याची चर्चा असून, उपसभापतीपदावर विजय पवार यांची वर्णी जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे.

पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, सभापतीपदाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचे नाव पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यात राजकीय उत्सुकता शिगेला

सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे. उद्या होणाऱ्या निवडीनंतर पाटण तालुक्याच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, सभापतीपदासाठी कोणत्या महिला सदस्याची निवड होते आणि उपसभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



शनिवार, १४ मार्च, २०२६

अंगणात भांडी घासत असताना समोरच उभा बिबट्या; युवती बेशुद्ध – शिद्रुकवाडीत भीतीचे सावट.


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज शिद्रुकवाडी (काढणे, ता. पाटण) :

रात्रीच्या शांततेत अंगणात भांडी घासत बसलेल्या एका युवतीसमोर अचानक बिबट्या उभा ठाकल्याने शिद्रुकवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समोरच काही फुटांवर उभा असलेला बिबट्या पाहताच युवती प्रचंड घाबरली व जागीच बेशुद्ध पडली. या थरारक घटनेने गावकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता म्होप्रेकर ही युवती रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घरासमोर अंगणात भांडी घासत बसली होती. त्याच वेळी एका मांजराचा पाठलाग करत आलेला बिबट्या अचानक तिच्या समोर येऊन उभा राहिला. काही फुटांवरच बिबट्याला पाहताच निकिता घाबरून किंचाळली आणि जागीच बेशुद्ध पडली.

तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय व शेजारी धावत बाहेर आले. लोकांची हालचाल पाहून बिबट्या जवळच्या झाडीत पळून गेला. जीवावर बेतलेल्या या प्रसंगातून निकिता सुदैवाने बचावली; मात्र ती प्रचंड घाबरल्याने तिला तळमावले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, काढणे परिसरातील डोंगराळ भागात वसलेल्या शिद्रुकवाडीत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या बिबट्याने आतापर्यंत अनेक श्वान, कोंबड्या आणि शेळ्यांवर हल्ले केल्याची माहितीही नागरिकांनी दिली आहे. भर लोकवस्तीत बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीनुसार आज वनविभागाने गावात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा बसवला आहे. आता या पिंजऱ्यात बिबट्या अडकतो का, याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे.

गावकऱ्यांनी वनविभागाला इशारा देत सांगितले की, लोकवस्तीत वाढलेला बिबट्यांचा वावर तातडीने रोखला नाही, तर कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे वनविभागाने तातडीने पथक तैनात करून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, शिद्रुकवाडीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिक रात्री बाहेर पडण्यासही घाबरत आहेत.


मानेगाव - गॅस टंचाईच्या भीतीने ग्रामीण भागात खळबळ; रखरखत्या उन्हात सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड, घरपोच पोहचवनारे गॅसचे वाहनच रस्त्यात अडवले.


तळमावले (प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होण्याची भीती ग्रामीण भागातही पसरू लागली असून त्याचे पडसाद पाटण तालुक्यातील तळमावले परिसरात उमटताना दिसत आहेत. घरगुती गॅस सध्या उपलब्ध असतानाही भविष्यात टंचाई निर्माण होईल या धास्तीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून सिलेंडर मिळवण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मानेगाव, तळमावले आणि कुंभारगाव विभागात घरपोच गॅस वितरणासाठी येणारे वाहन शनिवारी मानेगाव एसटी स्टँडच्या पाठीमागील रस्त्यावर आले असता, परिसरातील नागरिकांनी वाहनाला मधेच थांबवून गॅस वितरण करण्याची मागणी केली. रखरखत्या उन्हात अनेक नागरिकांनी सिलेंडरच्या टाक्या हातात घेऊन वाहनाभोवती गर्दी केली आणि तातडीने गॅस देण्याचा आग्रह धरला.

ही माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच कुंभारगाव व तळमावले विभागातील नागरिक सिलेंडरच्या टाक्या घेऊन मानेगावकडे धाव घेतली. काही वेळातच गॅस वितरणाच्या ठिकाणी मोठी गर्दी उसळली. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही गॅस मिळवण्यासाठी उन्हात उभे राहावे लागल्याने परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती.

ग्रामीण भागात घरपोच गॅस वितरणाची सेवा सुरू असली तरी अचानक वाढलेल्या मागणीमुळे वितरण व्यवस्थेवर ताण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. नागरिकांमध्ये टंचाईबाबत चर्चा सुरू असल्याने अनेकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आधीच सिलेंडर घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

शुक्रवार, १३ मार्च, २०२६

*'डाकेवाडी येथे 'पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी' उपक्रमांतर्गत 16 मार्चला शासकीय योजनांचे शिबीर*


तळमावले/वार्ताहर 
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. श्री. शंभूराज देसाईयांच्या संकल्पनेतून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आणि अंमलबजावणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवार, दिनांक 16 मार्च, 2026 रोजी सकाळी 10 वाजता श्री दत्त मंदीर डाकेवाडी (काळगाव) ता.पाटण, जि.सातारा येथे संपन्न होणार आहे.
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट जनतेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणे आणि प्रलंबित कामे मार्गी लावणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी येताना आपले आधार कार्ड आणि आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे, जेणेकरून अर्जांची प्रक्रिया त्वरित पूर्ण करता येईल.
अधिक माहितीसाठी नागरिकांनी मो.8446614283 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

*पालकमंत्री कार्यालय आपले दारी” उपक्रमांतर्गत मान्याचीवाडी व वायचळवाडी येथे शासकीय योजनांचे विशेष शिबीर.*


पाटण तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ थेट गावपातळीवर मिळावा आणि शासनाच्या सेवांसाठी होणारी धावपळ कमी व्हावी या उद्देशाने राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा. श्री. शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून “पालकमंत्री कार्यालय आपले दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक १७ मार्च २०२६ रोजी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी व वायचळवाडी येथे शासकीय योजनांसंदर्भात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १०.०० ते १.०० वाजेपर्यंत मान्याचीवाडी येथील श्री कुमजाई देवी मंदिर परिसरात हे शिबीर पार पडणार असून त्यानंतर दुपारी २.०० वाजता वायचळवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे दुसरे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देणार आहेत. तसेच आवश्यक कागदपत्रे, दाखले, अर्ज प्रक्रिया, लाभ योजनांबाबत मार्गदर्शन, तसेच नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष मदत केली जाणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना होणारी धावपळ टाळण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

शासनाच्या योजना प्रत्यक्ष गावपातळीवर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

टीप : शिबिरास येताना नागरिकांनी आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

बुधवार, ११ मार्च, २०२६

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 116 व्या जयंती निमित्ताने मंत्री शंभूराज देसाई यांचेकडून मतदारसंघामध्ये दहा हजार अन्न धान्याचे किटचे वाटप.पाटण विधानसभा मतदारसंघातील गरजू कुटुंबांना दिला मदतीचा आधार.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या 116 व्या जयंती निमित्ताने मंत्री शंभूराज देसाई यांचेकडून मतदारसंघामध्ये दहा हजार अन्न धान्याचे किटचे वाटप.

पाटण विधानसभा मतदारसंघातील गरजू कुटुंबांना दिला मदतीचा आधार.

दौलतनगर दि.10:- लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे 116 व्या जयंतीच्या निमित्ताने पाटण विधानसभा मतदारसंघातील गोर-गरीब कुटुंबांना मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून तब्बल दहा हजार अन्नधान्याच्या किटचे वितरण पाटण विधानसभा मतदार संघातील गावो-गावी  करण्यात येऊन या विभागातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.
   दरम्यान ना.शंभूराज देसाई यांनी केलेली मदत मोलाची  ठरली असून मदत मिळालेल्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
     लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा जयंती कार्यक्रम प्रतिवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन दौलतनगर ता.पाटण येथे साजरा करण्यात येतो. लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे यंदाचे 116 व्या जयंती कार्यक्रमाचे निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे पर्यटन,खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मतदारसंघातील गोर गरीब कुटुंबियांना मदत व्हावी या दृष्टीकोनातून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल दहा हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे गावा गावातील गरीब कुटुंबियांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मार्फत केले. या अन्नधान्य किटमध्ये तांदूळ, साखर,डाळ,तेल,मिठ,मिरची पावडर,हळद,चहा पावडर,गरम मसाला,आटा, बिस्किट,कोलगेट इ. वस्तूंचे चांगल्या दर्जाचे साहित्याचा समावेश असून ना.शंभूराज देसाई  यांचेवतीने तारळे, चाफळ, म्हावशी, शिरळ, नाटोशी, मारुलहवेली, ढेबेवाडी, काळगाव, कुंभारगाव व सुपने तांबवे या भागामध्ये डोंगर पठारावरील गावांमध्ये  त्या त्या भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सुमारे दहा हजार गोर गरीब कुटुंबियांना त्यांचे घरामध्ये जाऊन हे अन्न धान्याचे किटचे जागेवर जाऊन वितरण केले. 
    दरम्यान मंत्री देसाई हे संकट काळी नेहमी आपल्या मतदारसंघातील ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.  अतिवृष्टीमध्ये स्वत: पुराच्या पाण्यामध्ये उतरुन त्यांनी पूरग्रस्त जनतेची विचारपूस करुन त्यांना धीर देण्याचे काम केले. तसेच अतिवृष्टीमध्ये दरड कोसळल्याने मोठया प्रमाणांत नुकसान झालेल्या डोंगरी व दुर्गम भागातील गावांमध्ये दळण वळण पूर्ण असतानाही त्यांनी चिखलातून पूराच्या पाण्यातून चालत जाऊन या गावांतील नागरीकांना धीर दिला होता.
    मतदारसंघामध्ये अशा प्रकारच्या घटनांमुळे जर काही नुकसान झाले तर प्रथम मदत म्हणून नेहमी ना.शंभूराज देसाई हे मदतील धावून येतात.कोविड सारख्या काळामध्ये ना.शंभूराज देसाई यांनी हातावरचे पोट असलेल्या मोल मजूरी करणाऱ्या कुटुंबियांना,पानटपरी,वडाप चालक यांना त्याकाळात असेच अन्नधान्याचे किटचे वितरण करुन मोठया प्रमाणांत मदत केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे बेहाल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन मंत्री देसाई यांनी तब्बल पाच हजार अन्न धान्याचे किटचे वितरण हे आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत नुकतेच करण्यात आले. त्यामुळे गोर गरीब कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला. 

    ना.देसाई हे जरी कॅबिनेट मंत्री असले तरी त्यांचे संपूर्ण लक्ष हे आपल्या मतदारसंघावर केंद्रीत असते,आजही त्यांची नाळ ही सर्व सामान्य जनतेशी जोडली गेली आहे.सर्व सामान्य कार्यकर्त्याच्या सुख: दुखाबरोबर सार्वजनिक कार्यक्रमाव्दारे विविध गावांमध्ये आपली उपस्थिती लावून त्यांचा आजही मोठा जनसंपर्क असल्याचे पहायला मिळते.सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी  त्यांनी पालकमंत्री कार्यालय आपले दारी या नाविण्यपूर्ण अभियान सुरु केले असून या लाही मोठा प्रतिसाद नागरीकांकडून मिळत आहे.
    नुकतेच त्यांनी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे जयंतीचे औचित्य साधून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्य कुटुंबियांना धान्याची किटचे वितरण करुन मोठे सहकार्य केल्याने या किटचा लाभ मिळालेल्या कुटुंबियांनी ना.शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.
  
 लोकनेत्यांचे प्रतिबिंब....!

लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी सन 1967 साली पाटण तालुक्यामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये बाधित झालेल्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंसह निवाऱ्याच्या व्यवस्थेसाठी पत्र्याचे शेड उभारली होती.तसेच पडझड झालेल्या भागांमध्ये पत्र्यांचे वाटप केले होते.लोकनेते साहेबांचे ते ऋण आजही पाटण तालुक्यातील जुनी जाणती मंडळी मोठया मनाने सांगतात.तसेच पालकमंत्री ना.शंभूराज देसाई हे सुध्दा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रमाणे गरीब व गरजू कुटुंबांना अडचणीच्या काळात सढळ हाताने मदत करत असल्याने ना.शंभूराज देसाई हे त्यांच्या या कार्यातून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे प्रतिबिंब असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

मंगळवार, १० मार्च, २०२६

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप; कुंभारगाव विभागात स्तुत्य उपक्रम.


पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. समाजातील गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री, पाटण तालुक्याचे भाग्यविधाते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब देसाई साहेब यांच्या जयंतीनिमित्त कुंभारगाव विभागातील सुमारे ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

या किटमध्ये साखर, आटा, मीठ, डाळ, तेल, तिखट, गरम मसाला, तांदूळ, चहा पावडर, हळद, टूथपेस्ट, पार्ले बिस्कीट पुडा आदी दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.

या कार्यक्रमास बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. डॉ. दिलीपराव चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, संचालक व दैनिक कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव चव्हाण, वसंत पतंगे, अनवर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी   डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी सेवा हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे मत व्यक्त केले. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुंभारगाव–मान्याचीवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; पाळीव श्वान ठार – नागरिकांमध्ये भीतीचे सावट, वनविभागाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी.


साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज 

पाटण तालुक्यातील कुंभारगाव – मान्याचीवाडी परिसरात बिबट्याची दहशत वाढत असल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. मान्याचीवाडी येथील रहिवासी श्री. संतोष केशव माने यांच्या पाळीव श्वानावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास बिबट्याने माने यांच्या घराजवळ दबा धरून त्यांच्या पाळीव श्वानावर अचानक झडप घातली. त्यानंतर श्वानाला ओढत नेऊन घराच्या मागील बाजूस असलेल्या श्री. बाळकृष्ण आनंदा मोरे यांच्या शिवारात फरफटत नेले. काही वेळानंतर त्या ठिकाणी श्वानाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळून आला, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कुंभारगाव – गलमेवाडी रस्त्यावर दररोज पहाटे मॉर्निंग वॉकसाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. या घटनेमुळे या सर्व नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. बिबट्याची हालचाल मानवी वस्तीजवळ वाढत असल्याने कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी वनविभागाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.

सध्या या घटनेमुळे मान्याचीवाडी, कुंभारगाव व आसपासच्या परिसरात भीतीचे सावट पसरले असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहनही वन विभागाकडून करण्यात आले आहे.


रविवार, ८ मार्च, २०२६

*कलेक्टर संतोष पाटील यांनी केला संदीप डाकवे यांचा सन्मान*


तळमावले/वार्ताहर
सातारा जिल्हयाचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संदीप डाकवे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचा गौरव केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या प्रचार आणि प्रसिध्दीसाठी व्यंगचित्राच्या माध्यमातून जनजागृती केल्याबद्दल शाल, श्रीफळ, रोप देवून जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी हा सन्मान केला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी पाटील यांच्यासमवेत यावेळी प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसिलदार अनंत गुरव व अन्य मान्यवर उपस्थित होते. 
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी सुप्रसिध्द चित्रकार संदीप डाकवे यांनी व्यंगचित्रे रेखाटली होती. व्यंगचित्रातून जनजागृती हा संपूर्ण सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याने राबवलेला एकमेव प्रयोग असल्याचे गौरवोद्गार संतोष पाटील यांनी काढले. कार्यक्रमस्थळी संदीप डाकवे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे बॅनरदेखील लावले होते. 
दरम्यान, संदीप डाकवे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या नावात रेखाटलेला अक्षरगणेशा भेट दिला. या सरप्राईज भेटीमुळे कलेक्टर साहेब खुश झाले. त्यांनी अभियानाच्या प्रचार आणि प्रसिध्दी साठी रेखाटलेल्या व्यंगचित्रे आणि संदीप डाकवे यांच्या कला कौशल्याचेही कौतुक करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शनिवार, ७ मार्च, २०२६

महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.


महाराष्ट्र नगर, मानखुर्द (मुंबई) येथे शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिक, तरुण कार्यकर्ते व शिवप्रेमी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर आणि शिवभक्तांनी शिवरायांच्या पराक्रमाची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान शिवरायांच्या कार्याचा गौरव करणारे भाषण, शिवगर्जना आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.


परिसरातील नागरिक, युवक आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्टरीत्या पार पाडले. शिवरायांच्या विचारांची प्रेरणा समाजात रुजावी आणि युवकांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी हा या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, नागरिक आणि उपस्थित शिवभक्तांचे शिवछत्रपती प्रतिष्ठान तर्फे मनापासून आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा सामाजिक आणि ऐतिहासिक उपक्रमांचे आयोजन करून समाजात एकात्मता आणि शिवरायांप्रती अभिमानाची भावना जागृत ठेवण्याचा निर्धार प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

तळमावळे - ग्रामीण जनतेच्या अडचणींना दिलासा! तळमावळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.


पाटण तालुक्यातील तळमावळे मंडळ विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी या शिबिराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल व विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हाधिकारी सातारा श्री. संतोष पाटील, मा. उपविभागीय अधिकारी श्री. सोपान टोम्पे, मा. तहसीलदार श्री. अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती सदस्य श्री. सचिन यादव, श्री. पंजाबराव देसाई, बाजार समिती उपसभापती श्री. विलास गोडांबे, श्री.तानाजी चाळके,महिला आघाडी नेत्या सौ. कविता कचरे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. गणेश यादव, निर्मलग्राम मान्याचीवाडीचे सरपंच श्री. रवींद्र माने,श्री,मारुती मोळावडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या समाधान शिबिरामध्ये महसूल व इतर शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रलंबित व नवीन वारस नोंदी, ‘अ.पा.क’ व ‘ए.कु.म्या.’ शेरा कमी करणे, राजपत्राद्वारे उताऱ्यावर नावात बदल, आग्रिस्टाक योजना, नोंदणीकृत व्यवहारांची नोंद, ७/१२ वरील धारणा प्रकारातील भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर आदी महत्त्वाच्या बाबींची सोय शिबिरात करण्यात आली.

तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वाटप, प्रलंबित फेरफार मंजूर करणे तसेच पानंद रस्त्यांच्या नोंद केलेल्या नकाशांचे वितरण अशी विविध कामेही या शिबिरात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होऊन एकाच ठिकाणी अनेक कामे पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान शिबिरे ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. सातारा जिल्ह्यातील तसेच पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आपल्या प्रलंबित महसुली व शासकीय कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

गुरुवार, ५ मार्च, २०२६

अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी रेखाटले महाराजस्व अभियानाचे पोस्टर.

तळमावले/वार्ताहर शासनाच्या निर्णयानुसार मार्च ते मे 2026 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व सामाधान शिबीर अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात होत असून हे अभियान शनिवार दि.7 मार्च, 2026 रोजी ढेबेवाडी, कुठरे, तळमावले या ठिकाणी होत आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी व त्याचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाटणचे तहसिलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शन आणि संकल्पनेनुसार तालुक्यातील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्याकडून पोस्टर रेखाटून घेतले आहे. या पोस्टरमधील अक्षरे आणि छोटे लोगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या चित्राचे तहसिलदार अनंत गुरव यांनी कौतुक केले आहे. या समाधान शिबीरात प्रलंबित फेरफार काढणे, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क, लोकसेवा कायद्यानुसार सेवा, महसुल सुधारणाबाबत मार्गदर्शन, डिजिटल 7/12 जनजागृती, म.ज.न.संहिता 1966 मधील बदल इ.सेवा देण्यात येणार आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय पाटण, मंडळ अधिकारी, ग्राम महसुल अधिकरी व इतर सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेले अक्षरगणेशाकार संदीप डाकवे हे चांगले लिखाण ही करतात. त्यांनी शासनाच्या विविध योजनांवर विपुल लेखन केले आहे. यामध्ये महात्मा गांधी तंटाममुक्ती अभियान, बचत गट, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा, कृषी योजना, व्यसनमुक्ती इ.विविध अभियानावर लेखन केले आहे. केवळ लेखन न करता त्याला आपल्या कलात्मक संकल्पनेतून चांगली प्रसिध्दीही दिली आहे. यासाठी त्यांनी पोस्टर प्रकाशन, प्रसिध्द बातम्यांच्या कात्रणांचे प्रदर्शन, हस्तलिखित, व्यंगचित्रे इ.गोष्टींचा खुबीने वापर केला आहे. संदीप डाकवे यांनी जलयुक्त शिवार अभियानावर लिहलेल्या लेखांचे पुस्तक तत्कालिन मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, आ.शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व अन्य मान्यवर यांनी केले आहे. शासनाच्या विविध योजना सातत्याने लोकापंर्यंत प्रभावीपणे पोहवण्याचे काम करत असलेल्या अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांच्या या अभिनव पोस्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी मोठया संख्येने सहभागी होवून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी सोपान टोपे व तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानावर लिखाण : स्वच्छ सर्वेक्षण लीग 2026 या विषयावर पत्रकार संदीप डाकवे सध्या लेखन करीत आहेत. यंदा या अभियानाला व्यापक प्रसिध्दी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या लेखमालेचे आतापर्यंत 30 भाग प्रसिध्द झाले असून या लेखमालेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे निधन; “शब्दाला जागणारा नेता” हरपल्याने सर्वत्र हळहळ.

कुंभारगाव (ता. पाटण) येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, मरळीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक कै. डॉ. दिलीपराव बापुराव च...