पाटण तालुक्यातील तळमावळे मंडळ विभागात आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिरा’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आज शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी या शिबिराची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना महसूल व विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मा. जिल्हाधिकारी सातारा श्री. संतोष पाटील, मा. उपविभागीय अधिकारी श्री. सोपान टोम्पे, मा. तहसीलदार श्री. अनंत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती सदस्य श्री. सचिन यादव, श्री. पंजाबराव देसाई, बाजार समिती उपसभापती श्री. विलास गोडांबे, श्री.तानाजी चाळके,महिला आघाडी नेत्या सौ. कविता कचरे, भाजप तालुकाध्यक्ष श्री. गणेश यादव, निर्मलग्राम मान्याचीवाडीचे सरपंच श्री. रवींद्र माने,श्री,मारुती मोळावडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या समाधान शिबिरामध्ये महसूल व इतर शासकीय कामकाजाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी कलम १५५ अंतर्गत ७/१२ दुरुस्ती, लक्ष्मी मुक्ती योजना, प्रलंबित व नवीन वारस नोंदी, ‘अ.पा.क’ व ‘ए.कु.म्या.’ शेरा कमी करणे, राजपत्राद्वारे उताऱ्यावर नावात बदल, आग्रिस्टाक योजना, नोंदणीकृत व्यवहारांची नोंद, ७/१२ वरील धारणा प्रकारातील भोगवटदार वर्ग २ चे वर्ग १ मध्ये रूपांतर आदी महत्त्वाच्या बाबींची सोय शिबिरात करण्यात आली.
तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांअंतर्गत लाभार्थी प्रमाणपत्रांचे वितरण, शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वाटप, प्रलंबित फेरफार मंजूर करणे तसेच पानंद रस्त्यांच्या नोंद केलेल्या नकाशांचे वितरण अशी विविध कामेही या शिबिरात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची कार्यालयीन धावपळ कमी होऊन एकाच ठिकाणी अनेक कामे पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील म्हणाले की, राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान शिबिरे ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. सातारा जिल्ह्यातील तसेच पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, आपल्या प्रलंबित महसुली व शासकीय कामांचा निपटारा करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध होत असल्याने समाधान व्यक्त होत असून, प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा