पाटण : पाटण तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पालकमंत्री मा. नामदार शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ने दमदार विजय मिळवत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वांचे लक्ष पाटण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीकडे लागले असून उद्या दि.16 मार्च रोजी सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार आहे.
यावेळी पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला (खुला)’ असा आरक्षण प्रवर्ग जाहीर झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटातील महिला सदस्यांमध्ये सभापतीपदासाठी चुरस वाढली असून तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
सभापतीपदाच्या शर्यतीतील नावे
येराड पंचायत समिती गणातील विद्या शिंदे, मुरुड गणातील सविता पवार, मल्हारपेठ गणातील अर्चना पाटील, मारुल हवेली गणातील प्रियांका देसाई आणि सणबूर गणातून संपदा जाधव यांचा समावेश आहे.ढेबेवाडी विभागातून संपदा जाधव यांचे नाव सभापतिपदासाठी असल्याची चर्चा असून, उपसभापतीपदावर विजय पवार यांची वर्णी जवळपास निश्चित झाल्याची जोरदार चर्चा आहे.
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू आहे की, सभापतीपदाचा अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम क्षणी कोणाचे नाव पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यात राजकीय उत्सुकता शिगेला
सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांमध्येही मोठी उत्सुकता दिसून येत आहे. उद्या होणाऱ्या निवडीनंतर पाटण तालुक्याच्या स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, सभापतीपदासाठी कोणत्या महिला सदस्याची निवड होते आणि उपसभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा