पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त गरजू कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. समाजातील गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री, पाटण तालुक्याचे भाग्यविधाते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक आदरणीय बाळासाहेब देसाई साहेब यांच्या जयंतीनिमित्त कुंभारगाव विभागातील सुमारे ३०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये साखर, आटा, मीठ, डाळ, तेल, तिखट, गरम मसाला, तांदूळ, चहा पावडर, हळद, टूथपेस्ट, पार्ले बिस्कीट पुडा आदी दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचा समावेश करण्यात आला होता. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.
या कार्यक्रमास बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. डॉ. दिलीपराव चव्हाण, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन रामराव इनामदार, संचालक व दैनिक कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव चव्हाण, वसंत पतंगे, अनवर डांगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. दिलीपराव चव्हाण यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव करत समाजासाठी सेवा हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे मत व्यक्त केले. गरजू नागरिकांना मदत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा