कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव यांचे वयोमानानुसार सोमवारी, दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुंभारगाव, चिखलेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
कै. रंगुबाई यादव या अत्यंत धार्मिक, प्रेमळ आणि साध्या स्वभावाच्या होत्या. वारकरी संप्रदायाची शिकवण त्यांनी आयुष्यभर आचरणात आणली. विठ्ठल-रुक्मिणी भक्ती, नामस्मरण, भजन-कीर्तन आणि समाजातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याने वागण्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले होते. गावातील अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये त्या नेहमी सहभागी होत असत. त्यांच्या शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभावामुळे सर्व स्तरातील लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती.
कुटुंबवत्सल असलेल्या कै. रंगुबाई यादव यांनी आपल्या कुटुंबावर उत्तम संस्कार केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कुटुंबातील सदस्यांनी शिक्षण, समाजकार्य आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय वाटचाल केली. त्यांच्या निधनाने यादव कुटुंबासह संपूर्ण परिसराने एक प्रेमळ, श्रद्धाळू आणि संस्कारक्षम ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा