*पाटण, चिखलेवाडी:*
मोरेवाडीच्या डोंगरात दिवसाढवल्या बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शनिवार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोरेवाडीतील शेतकरी श्री. अशोक बाळकृष्ण मोरे यांच्या म्हशीवर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र म्हशीने प्रसंगावधान राखून बिबट्याला जोरदार लाथ मारल्याने तिचा जीव वाचला. या झटापटीत मात्र मैशीची शेपटी तुटून ती गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की नेहमीप्रमाणे मोरे यांनी आपली जानावरे मोरेवाडीचा दारा परिसरातील नवाच्या डोंगरात चरण्यासाठी नेली होती. डोंगरातील एका वगळात बिबट्या आधीच दाबा धरून बसला होता. म्हशी जवळ येताच त्याने अचानक झडप मारली. यावेळी म्हशीने
जोरात मागचा पाय उगारून बिबट्याला लाथ मारली. त्यात बिबट्याने पलटवार करत मैशीची शेपटी तोंडात पकडली.
शेपटी तुटल्याने म्हश रक्तबंबाळ झाली आणि मोठ्या आवाजात ओरडू लागली. हा आवाज ऐकून आजूबाजूचे इतर शेतकरी धावून आले आणि बिबट्या जंगलात पळून गेला.
ही घटना घडलेल्या मोरेवाडीचा दारा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या दिवसाढवल्याच दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. पाळीव जनावरे दिसताच तो त्यांच्यावर हल्ला करत असल्याने शेतकरी आपली जनावरे डोंगरात नेण्यास घाबरत आहेत.
"जीवावर आलेलं पण शेपटावर गेलं असं म्हणावं लागेल. जर मैशीने लाथ मारली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती," अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांनी दिली.
या घटनेनंतर मोरेवाडी, चिखलेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाकडे या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा आणि परिसरात जनजागृती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी आपली शेती आणि जनावरे कशी सांभाळणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
जखमी म्हशीवर स्थानिक पशुवैद्यकाकडून उपचार सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा