ढेबेवाडी - राजकीय वारसा, जनतेचा कौल आणि शिवसेनेची ताकद!मंद्रुळकोळे जि. प. गणात कु.मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी,
पाटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले असून, मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात शिवसेनेने खेळीमेळीची पण तडाखेबंद खेळी करत कु. मृणाल महेश पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण गणात “विजय निश्चित” अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेचे राज्याचे पर्यटनमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.मा. श्री. शंभूराज देसाई यांचे विश्वासू, ढेबेवाडी विभागातील दबंग आणि जनसंपर्काचा भक्कम किल्ला असलेले उद्योजक श्री. महेश पाटील यांनी आपल्या कन्येसाठी ही उमेदवारी मिळवून दिली आहे. मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गण हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने, ही उमेदवारी राजकीयदृष्ट्या अचूक आणि ताकदवान मानली जात आहे.
महेश पाटील हे शांत, संयमी पण निर्णयक्षम नेतृत्व म्हणून संपूर्ण परिसरात ओळखले जातात. गावागावात असलेला त्यांचा मजबूत जनसंपर्क, सामाजिक कामांचा दांडगा अनुभव आणि लोकांमध्ये असलेली विश्वासार्हता हीच या उमेदवारीची सर्वात मोठी जमेची बाजू ठरत आहे.
त्यातच बनपुरी ग्रामपंचायतीमध्ये पाटील कुटुंबाची सत्ता असून, महेश पाटील यांचे बंधू मनोज पाटील लोकनियुक्त सरपंच आहेत. त्यामुळे संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे आणि स्थानिक सत्तेचा अनुभव हे घटक मृणाल पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत.
कु. मृणाल महेश पाटील या उच्चशिक्षित, अभ्यासू आणि तरुण नेतृत्वाचे प्रतीक मानल्या जात आहेत. वडील महेश पाटील यांचा राजकीय व सामाजिक वारसा लाभलेली ही उमेदवार तरुणाईसह महिला मतदारांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे. नव्या दमाच्या, स्वच्छ प्रतिमेच्या आणि शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर त्या या लढतीत प्रबळ दावेदार ठरत आहेत.
उमेदवारी जाहीर होताच विरोधकांमध्ये हालचालींना वेग आला असून, मंद्रुळकोळे गणात महेश पाटील कुटुंबाचे वर्चस्व सिद्ध होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
एकूणच, मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात ही लढत एकतर्फी होणार का, याकडे संपूर्ण पाटण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा