तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील आनंदा चिंचुलकर आणि परिवाराने लग्नसमारंभादिवशी जि.प.प्राथ.शाळेसाठी आर्थिक मदत देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावरील कोरोनाचे सावट तसेच लग्नातील अनावश्यक खर्च टाळून चिंचुलकर कुटूंबियांनी लग्न साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला.
‘एक हाक माझ्या शाळेसाठी’ असे आवाहन स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट डाकेवाडी यांच्यावीने डाॅ.संदीप डाकवे यांनी केले होते. त्यानुसार लोकसहभागातून जि.प.शाळा डाकेवाडीला रंगरंगोटी इतर भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या स्पर्धेत या शाळेला स्वच्छ, सुंदर आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून पाटण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. अजूनही या शाळेला भौतिक सुविधांची तसेच आर्थिक मदतीची गरज असल्याचे मत या शाळेचे मुख्याध्यापक महादेव गेजगे आणि उपशिक्षक रणजित शिंदे यांनी केले आहे.
आपण या शाळेत शिकलो, आपलाही यात काही सहभाग असावा या हेतूने आनंदा विठ्ठल चिंचुलकर आणि त्यांच्या परिवाराने त्यांचा मुलगा कृष्णा आणि आनंदा पांडूरंग चाळके यांची कन्या स्वाती यांच्या विवाहानिमित्त आर्थिक मदत देणगी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडे सुपुर्द केली.
या वेळी शिवछत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष अधिक डाकवे, विकास डाकवे, आनंद डाकवे, नवनाथ जाधव, शिवाजी डाकवे (शेठ), विकास जाधव, पंढरीनाथ दुधडे, रविंद्र डाकवे, अंकुश डाकवे, शंकर चिंचुलकर, दिलीप डाकवे, भिमा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या आनंदाच्या प्रसंगी गावातील मुलांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी यासाठी सहकार्य करणाऱ्या श्री.आनंदा चिंचुलकर आणि चिंचुलकर परिवाराच्या कृतीचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे. अशाच प्रकारे सामाजिक बांधिलकीची किनार लोकांनी जपावी तसेच शाळेसाठी लोकांनी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा