शनिवार, १७ जानेवारी, २०२६

कुंभारगाव - हळदीकुंकूच्या मंगल वातावरणात चिमुकल्यांचा बालबाजार फुलला कुंभारगाव जिल्हा परिषद शाळेत संस्कार, व्यवहारज्ञान आणि आनंदाचा संगम.


कुंभारगाव - हळदीकुंकूच्या मंगल वातावरणात चिमुकल्यांचा बालबाजार फुलला 

कुंभारगाव जिल्हा परिषद शाळेत संस्कार, व्यवहारज्ञान आणि आनंदाचा संगम.


कुंभारगाव, ता. पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा क्रमांक १ येथे महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तसेच शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा बालबाजार मोठ्या उत्साहात आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून पार पडला. या उपक्रमामुळे शाळा, पालक आणि ग्रामस्थ यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ झाले.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्ञानदेवता सरस्वती यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित पालक महिलावर्गासाठी हळदीकुंकू समारंभ साजरा करण्यात आला. यावेळी मुलींच्या शाळेच्या सौ.लीना पाटील  यांनी उपस्थित पालक महिला व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रशस्त पटांगणात पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भरवलेला चिमुकल्यांचा बालबाजार सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः भाजीपाला व इतर वस्तू विक्रीसाठी मांडल्या. शिक्षक, शिक्षिका, पालक व ग्रामस्थांनी या बाजारातून खरेदी करत चिमुकल्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या बालबाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाण-घेवाणीचे प्रत्यक्ष व्यवहारज्ञान मिळाले. नोटा, नाणी, रुपये-पैशांचा दैनंदिन व्यवहार, किलोग्रॅमने वजन करून वस्तू देणे, मोजमाप तसेच नफा-तोट्याची संकल्पना विद्यार्थ्यांना अनुभवातून समजली. विशेष म्हणजे या बालबाजारात तब्बल ५,५०० रुपयांची उलाढाल झाली, हे या उपक्रमाचे यश अधोरेखित करते.

या संपूर्ण उपक्रमाचे नीटनेटके आणि प्रभावी नियोजन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. उज्वला विकास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी शिक्षिका अनुराधा शिवाजी आवळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींच्या मुख्याध्यापिका सौ. लीना पाटील, शिक्षक सतीश सिरसे, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य करत परिश्रम घेतले.

हळदीकुंकू समारंभातून महिलांचा सन्मान आणि बालबाजारातून विद्यार्थ्यांचा व्यवहारज्ञानाचा विकास साधणारा हा उपक्रम ग्रामस्थांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला असून जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशीलतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

४ थी राष्ट्रीय मर्दानी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मुंबई शहर व नवी मुंबईच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; २२ सुवर्णांसह ५८ पदकांची घवघवीत कमाई.

४ थी राष्ट्रीय मर्दानी स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२६ मुंबई शहर व नवी मुंबईच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; २२ सुवर्णांसह ५८ पदकांची घवघवीत कमाई.
४ थी मर्दानी स्पोर्ट्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२६ ही स्पर्धा दि. ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशातील चौक स्टेडियम, लखनऊ येथे अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडली. ही राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित स्पर्धा मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया व मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा. श्री. ब्रजेश पाठक जी यांच्या शुभहस्ते झाले. तर समारोपप्रसंगी उत्तर प्रदेश ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव मा. श्री. अनादेश्वर पांडेय जी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत देशभरातील १६ राज्यांमधील सुमारे ३५० खेळाडूंनी सहभाग नोंदवून मर्दानी क्रीडाप्रकाराचे सामर्थ्य दाखवून दिले. ही स्पर्धा मर्दानी स्पोर्ट्स व पारंपरिक मर्दानी अशा दोन प्रकारांत पार पडली. संपूर्ण स्पर्धेचे तांत्रिक संचालन श्री. केतन आंधळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या झाले. मुंबई शहर – नवी मुंबईचे राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व या राष्ट्रीय स्पर्धेत मुंबई शहर व नवी मुंबईच्या खेळाडूंनी दमदार, शिस्तबद्ध व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत राष्ट्रीय पातळीवर आपले वर्चस्व सिद्ध केले. खेळाडूंनी एकूण — 🥇 २२ सुवर्ण पदके 🥈 १७ रौप्य पदके 🥉 १९ कांस्य पदके
अशी एकूण ५८ पदकांची घवघवीत कमाई करत महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचा अभिमान उंचावला. मर्दानी स्पोर्ट्स इव्हेंटमधील पदक विजेते सुवर्ण पदक विजेते : प्रिन्स गुप्ता, आर्या पांडे, अनन्या पवार, तृष्णा राऊत, श्रेया नायर, काब हजू रौप्य पदक विजेते : रिया सिंह, रुद्र राणे कांस्य पदक विजेती : अंजली दुबे पारंपरिक मर्दानी इव्हेंटमधील उल्लेखनीय कामगिरी. लाठी स्पर्धा – सुवर्ण : मनस्वी जगताप, अवन्या पाटील, सोनाली सावंत, श्रेयस पवार रौप्य : आर्या पांडेय, अनन्या पवार, श्रेया नायर, राज पाटील, अनुश्री नाईक, आरुषी काकडे कांस्य : प्रिन्स गुप्ता, रिया सिंह, अंजली दुबे, तृष्णा राऊत, काब हजू, रुद्र राणे, अन्वी सकपाळ, अंश गोडे भाला स्पर्धा – सुवर्ण: अद्विक बुरुंगले, आर्या पांचाळ, सलोनी कुबल, आरव वारे, गार्गी जवके, सोनाली सावंत कांस्य : विघ्नेश गोरड, स्वराज्य पवार, अजिंक्य साळुंखे, श्रेयस पवार, राज पाटील दुहेरी लाठी – अनया मगदूम (सुवर्ण), मनस्वी जगताप (रौप्य), गार्गी जवके (कांस्य) दांडपट्टा – धृती पाटील (सुवर्ण), अनया मगदूम व आरुषी काकडे (रौप्य), सानिध्य निकम (कांस्य) तलवार – सानिध्य निकम (कांस्य) सांघिक लाठी – सुवर्ण पदक अन्वी सकपाळ, अंश गोडे, अवन्या पाटील, अनुश्री नाईक मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे मोठे योगदान या यशस्वी संघाला टीम कोच श्री. संतोष संकपाळ सर व टीम मॅनेजर सौ. वैष्णवी कोकाटे-आंधळे मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. आरती संकपाळ व कु. श्रेयस खेडेकर यांनी राष्ट्रीय पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. खेळाडूंना ऋषिकेश देवकर सर, शिल्पा बाबर मॅडम व गणेश शिखरे सर यांचे दर्जेदार प्रशिक्षण लाभले आहे. संघाचे अभिनंदन मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री. संतोष खंदारे सर,खजिनदार श्री. विनोद कुंजिर सर व तांत्रिक संचालक श्री. केतन आंधळे सर यांनी सर्व विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ही ऐतिहासिक कामगिरी मर्दानी क्रीडाप्रकाराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

गुरुवार, १५ जानेवारी, २०२६

मानखुर्द वार्ड क्रमांक १४३ मध्ये ५१.३५ टक्के मतदान; महाराष्ट्र नगरमध्ये २२ बूथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.



मानखुर्द वार्ड क्रमांक १४३ मध्ये ५१.३५ टक्के मतदान; महाराष्ट्र नगरमध्ये २२ बूथवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.


मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीअंतर्गत मानखुर्द परिसरातील वार्ड क्रमांक १४३ मध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र नगर व चिताकॅम्प या भागांमध्ये सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाबाबत संमिश्र उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले.

महाराष्ट्र नगरमध्ये एकूण २२ मतदान बूथ असून एकूण २४,६९५ मतदारांपैकी १३,८०६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर चिताकॅम्प परिसरात एकूण १६,४०५ मतदारांपैकी ८,३०० मतदारांनी मतदान केले. एकूणच वार्ड क्रमांक १४३ मध्ये सुमारे ५१.३५ टक्के मतदान नोंदवले गेले.

बूथनिहाय मतदानाची आकडेवारी (महाराष्ट्र नगर)

बूथ क्रमांक १ वर ८८० मतदारांपैकी ५१६ मतदारांनी मतदान केले.
बूथ क्रमांक २ वर १,१३६ पैकी ६४८,
बूथ क्रमांक ३ वर १,१७७ पैकी ६८४,
बूथ क्रमांक ४ वर १,१९८ पैकी ७१३,
बूथ क्रमांक ५ वर १,००८ पैकी ४७८,
बूथ क्रमांक ६ वर १,२४१ पैकी ७०३,
बूथ क्रमांक ७ वर १,१८० पैकी ६८२,
बूथ क्रमांक ८ वर १,१७८ पैकी ७०६,
बूथ क्रमांक ९ वर १,१५० पैकी ७३४,
बूथ क्रमांक १० वर १,२०० पैकी ६८९,
बूथ क्रमांक ११ वर १,२४४ पैकी ६५३,
बूथ क्रमांक १२ वर १,२३५ पैकी ६९७,
बूथ क्रमांक १३ वर १,२५७ पैकी ६६१,
बूथ क्रमांक १४ वर ८८५ पैकी ५००,
बूथ क्रमांक १५ वर १,३७८ पैकी ७५९,
बूथ क्रमांक १६ वर १,२९१ पैकी ७२३,
बूथ क्रमांक १७ वर १,१६३ पैकी ६०३,
बूथ क्रमांक १८ वर १,१६१ पैकी ६३१,
बूथ क्रमांक १९ वर ७७६ पैकी ३५८,
बूथ क्रमांक २० वर ६७६ पैकी ३६३,
बूथ क्रमांक २१ वर १,१४९ पैकी ६५९,
तर बूथ क्रमांक २२ वर १,११२ पैकी ६१९ मतदारांनी मतदान केले.

प्रशासनाचा कडक बंदोबस्त

मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग मतदारांसाठी विशेष सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

या मतदानानंतर वार्ड क्रमांक १४३ मधील सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले असून  निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण बाजी मारणार, हे उद्या स्पष्ट होणार आहे.


बुधवार, १४ जानेवारी, २०२६

तळमावले - काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिका २०२६ चे थाटात प्रकाशन;

काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या दिनदर्शिका २०२६ चे थाटात प्रकाशन;
: तळमावले येथील काळंबादेवी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, तळमावले यांच्या मुख्य कार्यालयात दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन उत्साहात संपन्न झाले. सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व लाभलेल्या या कार्यक्रमास बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, दौलतनगर (मरळी) चे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मा. श्री. डॉ. दिलीपराव चव्हाण यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी पाटण बाजार समितीचे उपसभापती श्री. विलास गोडांबे, संस्थेचे संस्थापक व चेअरमन मा. श्री. रमेश घाडगे, व्यवस्थापक श्री. सुरज घाडगे, पाटण पंचायत समितीचे माजी सदस्य मा. श्री. महादेवराव पानवळ, मस्करवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. बबन मस्कर, कुंभारगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री. रामराव इनामदार, गलमेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. दत्तात्रय चोरगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर मा. श्री. सुशांत तुपे यांच्यासह श्री. सुरज पाटील, श्री. विक्रम यादव, श्री. प्रमोद शिद्रुक, श्री. संभाजीराव चव्हाण, श्री. अजित कुंभार, श्री. अनवर डांगे, श्री. दादासाहेब मोरे, श्री. प्रकाश कोतवडे तसेच दै. कृष्णाकाठ न्यूज नेटवर्क, कराडचे प्रतिनिधी श्री. राजेंद्र पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांनी सोसायटीच्या आजवरच्या कार्याचा गौरव करत आर्थिक शिस्त, पारदर्शक कारभार व सभासदाभिमुख धोरणांमुळे संस्थेने परिसरात विश्वासार्हतेचे स्थान निर्माण केल्याचे नमूद केले. दिनदर्शिकेत संस्थेची वाटचाल, सामाजिक उपक्रम, महत्त्वाच्या तारखा व उपयुक्त माहिती समाविष्ट असून ती सभासदांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी काळंबादेवी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, सहकाराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांना आर्थिक सक्षमतेकडे नेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आयोजन सुबक व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले असून उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कष्टकरी जननी... आमची सुमन नानी...

कष्टकरी जननी... आमची सुमन नानी... --------------------------------
स्व सुमन (नानी) भिवाजी पुंडे हे नाव आता काळाच्या पडद्याआड गेले आहे परंतु नानी च्या शेकडो आठवणी आजही ताज्यातवाण्या आहेत नानी चे माहेर अगदी हाकेच्या अंतरावर टाकळी गाव तिकांडे कुटुंबतील आणि सासर आमचे पुंडे कुटुंब पुंडे कुटुंब म्हणजे एकत्रित राबता असलेल कुटुंब कुटुंबात नानीचा वहीदा धाकली सून आणि धाकली सुन म्हणजेच सर्वाचांच मान मर्तब राखणे आणि वीणा तक्रार पडेल ते काम करणे कोरडवाहू शेती असल्याने पावसाळ्यात जे पिकेेल ते तेही तुटपुंजे मग वर्षभर नवरा भिवाजी पुंडे नाना यांच्या मागे सुमन नानी मोलमजुरी ला पहाडा सारखी उभी पाझर तलाव विहीर बारवा रस्ते पाईप लाईन घर येटाळण्या सोगंण्या असे अति कष्टाचे काम नानी ने नाना बरोबर केले नानी चे टाकळी चे भाऊ खूप चांगले जिरायती जमीन बागायती करायला भावांनी खूप सहकार्य केले जमीन बागायती झाली आणि नानी चे मोलमजुरी चे हातातील पेंडे एकदाचे सुटले सोन्यासारखी दोन मुले अनिल भाऊ आणि शरद भाऊ अतिशय सुसंस्कृत सांप्रदायिक आणि तितकेच कष्टाळू सुद्धा अनिल भाऊ आणि शरद भाऊ यांचे दोनाचे चार हात झाले मोठी सुनबाई संगिता वहिनी छोटी मनिषा वहिनी साक्षात लक्ष्मीच्या रूपाने त्या घरात आल्या आणि नानी चे घर नंदनवन झाले नाना नानी लेक सुना अशा सहा माणसांनी कष्टाच्या जोरावर आपली प्रापंचिक गाडी सुधरवली प्रगती केली गोकुळ भरावे असे कुटुंब भरले सहा नातवंडे अतिशय प्रेमळ आणि नानी ला मुलगी नसल्याने नानी ने आपल्या सुनामंध्येच मुली बघितल्या कधीही सासू पणाचा आव न आणता त्यांच्या वरच जिव ओवाळून टाकला आणि दोन्हीही सुनांनी नाना चा प्रत्येक शब्द मनापासून झेलला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही नातींचे लग्न कार्य नानी ने आपल्या डोळ्यात साठवून ठेवले होते मोठा नातु शुशांत त्याचे लग्नही आपल्या डोळ्यासमोर व्हावे अशी तिची खूप ईच्छा होती परंतु नियतीने ही संधी आमच्या कडून थोडक्यात हिसकावून घेतली नानी म्हणजे कोणाच्या दुखावर न सलणारी बाई तोंडभरून बोलणं मायेने डोक्यावरून हात फिरवून आस्थेने विचारपूस करण नानी ने आपल्या आजार पणाला निडरपणे झुंज दिली खऱ्या अर्थाने कौतुक करावे ते दोन्ही मुंलाचे वाटेल तिथे आणि वाटेल त्या डॉक्टरकडे नानी ला उपचारासाठी नेले आपल्या आईला खास उपचारासाठी ने आण करण्यासाठी चारचाकी गाडी घेतली जो सांगेल तिथे आपल्या आईला उपचारासाठी फिरवले नानी काही खूप दिवस अंथरुणाला खिळली नाही नानी चे कान डोळे दात हे ज्ञानेंद्रिये शेवटपर्यंत शाबीत होते आईच्या उपचारासाठी वाघीनीचे दुध आणि सुर्य चद्रांची आरती या दोन गोष्टी सोडता सर्व गोष्टींचा उपचार मुलांनी आपल्या आईसाठी केेला नानी ने शेवटपर्यंत माणसांना अगदी नावानिशी ओळखले येणाऱ्या जाणाऱ्यांची चहा पाण्यासाठी विचारणा केली नानी ची मानसिक स्थिती खूप मजबूत होती मला अनेकदा नानी ला भेटण्याचा योग आला आणि लहानपणी ही नानीचा सहवास लाभला आमचे थोरले बंधू कारभारी बाबुराव पुंडे काभुदादा व थोरली बहिण बबाबाई रामहारी शेटे बबाआक्का या बहिण भावंडांनी ही लेक लेकी सारखी नानी ची सेवा केली नानी च्या अंतिम संस्कारावेळी कुटुंब भावकी नातलग यांचे दुख:अश्रू मन हेलावून टाकत होते यातून नानी बद्दलचे अतुट प्रेम अधोरेखित होत होते " मरावे परी किर्ती रुपी उरावे " हे संत वचन नानी ला तंतोतंत जुळते माहेरच्या टाकळी तील तिकांडे परिवातील भाऊ भाव जया भाचे भाच्या यांनी ही आमच्या नानीवर जिवापाड प्रेम केले नानीची उंबऱ्या बाहेर ठेवलेली आधाराची काठी असेल चपला असेल किंवा नानाला मारलेली "अहो" म्हणून हाक असेल माझा अनिल शरद आजून आले नाही म्हणून केलेली काळजी असेल किंवा पोरांनो अरे आभ्यास करावा म्हणून केलेली विनवणी असेल या सर्व गोष्टी नानी अजूनही आमच्यात च आहे अशी साक्ष देतात पंरतु मृत्यू हे सत्य आम्हाला पचविण्याची अजूनही कठीण जात आहे नानी ने दिलेले संस्कार शिस्त शुद्ध नियत साफ नितिमत्ता आणि कपाळावरील घामाची धार आम्ही अशीच अबाधित ठेवू आणि कायम तीला आमच्या स्मरणात ठेेऊ हीच तिच्या मृत आत्मास श्रद्धांजली आदरांजली आणि तिच्या पवित्र स्मृतींना अभिवादन ठरेल....!! 🙏🌹 दुखा:कित -- पुंडे परिवार व समस्त ग्रामस्थ ढोकरी शब्दांकन -- कवीज्ञानेश पुंडे

मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा,

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा, पाहा महत्वाच्या तारखा


राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही घोषणा केली.

'या' 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल.

यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

नामनिर्देशन पत्र 16 ते 21 जानेवारी 2026
छाननी, 22 जानेवारी
उमेदवारी माघीरीची अंतिम मुदत 27 जाने दुपारी 3 वाजे
अंतिम उमेदवारी यादी चिन्ह वाटप 27 जानेवारी
मतदान 5 फेब्रुवारी 2026 सकाळी साडेसात ते सायं साडेपाच
मतमोजणी – 7 फेब्रुवारी

रविवार, ११ जानेवारी, २०२६

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी संतोष तोडकरांना प्रभाग २४ मधून ; समाजसेवा, दिव्यांगांचा जाहीर पाठिंबा ठरतोय ताकद!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी संतोष तोडकरांना प्रभाग २४ मधून, समाजसेवा, दिव्यांगांचा जाहीर पाठिंबा ठरतोय ताकद!

ठाणे प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब तसेच पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी, कट्टर शिवसैनिक आणि समाजसेवक संतोष दादा तोडकर यांना ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ (ड) मधून शिवसेनेची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे.

विटावा–कळवा परिसरात सामाजिक, धार्मिक व सेवाभावी कार्यातून जनतेशी घट्ट नातं जोडलेले संतोष प्रभाकर तोडकर हे नाव आज प्रभागात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व प्रभागातील नागरिकांनी संतोष दादा तोडकर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

समाजसेवेचा भक्कम पाया

संतोष दादा तोडकर हे केवळ राजकीय कार्यकर्ते नसून खऱ्या अर्थाने जनतेचा माणूस म्हणून ओळखले जातात. गणेशोत्सव काळात दरवर्षी ५० ते ६० ट्रॅव्हल्सचे नियोजन करून पश्चिम महाराष्ट्र, कोकण व इतर भागातील भाविकांसाठी ते सेवाभाव जपत असतात.

कराड, सातारा, पाटण, सांगली, कोल्हापूर तसेच कोकण विभागातील नागरिकांना माफक दरात (मीनामूल्य) अॅम्ब्युलन्स सेवा, रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये तातडीने रक्तपुरवठ्याची व्यवस्था, तसेच गरजू कुटुंबांना संकटाच्या काळात थेट मदत — ही त्यांची ओळख आहे.

दिव्यांग बांधवांचा जाहीर पाठिंबा

शिवसेना पक्षाचे प्रभाग क्र. २४ (ड) चे उमेदवार संतोष प्रभाकर तोडकर यांना ठाण्यातील दिव्यांग बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
धर्मवीर दिव्यांग सेनेच्या वतीने अध्यक्ष गिरीश मेहरोल व सचिव शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात संतोष तोडकर यांनी दिव्यांग बांधव व त्यांच्या कुटुंबीयांची विशेष काळजी घेतली. अन्नधान्य, औषधे, उपचार व इतर आवश्यक मदत वेळेवर उपलब्ध करून दिल्याने दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी व विश्वास निर्माण झाला आहे.

प्रभागातील सर्व संघटनांचा पाठिंबा

विटावा, कळवा, गणपती पाडा, आनंदनगर, वाघोबा नगर, शिवाजीनगर परिसरातील
संकल्प मित्र मंडळ, मोरया प्रतिष्ठान, फ्रेंड्स ग्रुप, शिवतेज ग्रुप, शिवशंभो प्रतिष्ठान, स्वामी समर्थ चौक मंडळ यांसह विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनी संतोष दादा तोडकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

नागरिकांचा विश्वास, विजयाचा निर्धार

“प्रभागातील गरजू, गरीब, रुग्ण, दिव्यांग आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी नेहमी उभा राहणारा हा आपला हक्काचा माणूस आहे. त्यामुळे समाजसेवक संतोष तोडकर दादा यांच्या पाठीशी नागरिकांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

समाजसेवा, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर संतोष प्रभाकर तोडकर हे प्रभाग २४ मधील विजयाचे मजबूत दावेदार ठरत असल्याचे चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळत आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...