पाटण पंचायत समिती रणधुमाळी!
काळगाव – कुंभारगाव गणात उमेदवारीसाठी महायुद्ध; अखेर कोण मारणार बाजी?
पाटण तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक जाहीर होताच संपूर्ण तालुका राजकीय रणांगणात परिवर्तित झाला असून, काळगाव व कुंभारगाव पंचायत समिती गण हे सध्या सर्वाधिक चर्चेचे केंद्र बनले आहेत. उमेदवारीसाठी भाजप आणि शिवसेना या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच, डावपेच आणि दबावाचे राजकारण पाहायला मिळाले. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना कमालीची गती आली असून, अखेर सर्व उमेदवारांनी आजच अर्ज दाखल करण्याची तयारी केली आहे.
काळगाव पंचायत समिती गण : भाजप विरुद्ध शिवसेना – थेट टक्कर!
काळगाव गणात भाजपकडून डाकेवाडीचे माजी सरपंच अनिल डाकवे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाली असून, भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आहे. संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील पकड यामुळे अनिल डाकवे हे भाजपचे मजबूत शिलेदार मानले जात आहेत.
दुसरीकडे शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठे महायुद्ध पाहायला मिळाले.
माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई आणि जनसहकार समूहाचे संस्थापक मारुतीराव मोळावडे ही दोन तगडी नावे अखेरपर्यंत चर्चेत होती. प्रत्येक उमेदवारामागे स्वतंत्र जनाधार, अनुभव आणि संघटनात्मक ताकद असल्याने शिवसेना नेतृत्वास मोठी कसरत करावी लागली.
अखेर सर्व समीकरणे, स्थानिक गणिते आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर
माजी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केले.
या निर्णयानंतर काळगाव गणात लढत आणखीच तीव्र आणि प्रतिष्ठेची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुंभारगाव पंचायत समिती गण : शिवसेनेचा शिक्का, भाजप सज्ज!
कुंभारगाव गणात चित्र काहीसे स्पष्ट होत असले तरी लढत कमी रंगतदार नाही.
येथे भाजपकडून पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे (बापू) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरपंच ते उपसभापती असा प्रशासकीय अनुभव, व्यापक जनसंपर्क आणि शांत पण प्रभावी नेतृत्व ही रमेश मोरे यांची मोठी जमेची बाजू मानली जाते.
दुसरीकडे शिवसेनेनेही जोरदार तयारी करत
शिवसेनेकडून श्री. सचिन यादव यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
युवा नेतृत्व, सामाजिक संपर्क आणि संघटनेतील सक्रिय भूमिका यामुळे सचिन यादव यांची उमेदवारी कुंभारगाव गणात लढतीला नवी धार देणारी ठरणार आहे.
अखेरचा निकाल कुणाच्या बाजूने?
काळगाव आणि कुंभारगाव या दोन्ही गणांमध्ये
- अनुभव विरुद्ध युवक नेतृत्व,
- भाजप विरुद्ध शिवसेना,
- संघटनात्मक ताकद विरुद्ध स्थानिक जनाधार
अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
आज अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सर्व चित्र स्पष्ट होत असले तरी खरी रणधुमाळी प्रचारात आणि मतदानातच पाहायला मिळणार, हे मात्र नक्की!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा