मंगळवार, ६ जानेवारी, २०२६

कराड बसस्थानकात गर्दीचा गैरफायदा; सणबूरच्या वृद्धेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ लंपास

कराड बसस्थानकात गर्दीचा गैरफायदा; सणबूरच्या वृद्धेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ लंपास.

कराड प्रतिनिधी :
कराड बसस्थानकात रविवारी सायंकाळी प्रवाशांच्या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभद्रा उत्तम मुगडे (वय अंदाजे ६५, रा. सणबूर, ढेबेवाडी) या माजी सैनिकाच्या पत्नी असून त्या रविवारी उपचारासाठी कराड येथे आल्या होत्या. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्या आपली मुलगी नीलम शंकर जाधव यांच्यासह सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी येथे परत जाण्यासाठी कराड बसस्थानकात गेल्या होत्या.

ढेबेवाडीची एसटी बस लागल्यानंतर बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीत जागा मिळवण्यासाठी मुलगी नीलम जाधव या पुढे गेल्या असताना मागे उभ्या असलेल्या सुभद्रा मुगडे यांच्या गळ्याजवळ दोन अज्ञात चोरटे घुटमळत होते. काही क्षणांतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ जोरात ओढून तोडली आणि क्षणार्धात घटनास्थळावरून पसार झाले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे सुभद्रा मुगडे या घाबरून गेल्या. त्यांनी आरडाओरडा केला असता काही प्रवाशांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र गर्दीचा फायदा घेत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने बसस्थानकात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कुंभारगाव (चिखलेवाडी) - कै. रंगुबाई यादव यांचे निधन.

कुंभारगाव , प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील कुंभारगाव (चिखलेवाडी) येथील प्रा. सुरेश यादव यांच्या मातोश्री कै. रंगुबाई रघुनाथ यादव य...