शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

मैत्री, मार्गदर्शन आणि प्रेरणेचा दीपस्तंभ – डॉ. संदीप डाकवे.



मैत्री, मार्गदर्शन आणि प्रेरणेचा दीपस्तंभ – डॉ. संदीप डाकवे

साधारण बारा एकवर्षांपूर्वीची गोष्ट असेल…
डॉ. संदीप डाकवे सर यांच्याशी ओळख झाली. तशी ती ओळख होती असे म्हणायला हरकत नाही. मी त्यांना ओळखत होतो, मात्र ते मला ओळखत नव्हते. आमचे चुलते, दैनिक लोकमतचे प्रतिनिधी पोपटराव माने यांच्या सोबत डॉ. डाकवे साहेबांची एखाद-दोन वेळा भेट झाली होती. त्या भेटीत केवळ ‘हाय-हॅलो’पुरतेच संभाषण झाले होते.

पण आयुष्य कधी, कुठे आणि कोणत्या वळणावर कोणाला जवळ आणेल, हे सांगता येत नाही…

पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर साप्ताहिक कुमजाई पर्व या माझ्या साप्ताहिकाचे टायटल पास झाले. त्या आनंदाच्या क्षणी, पहिली प्रत आदराने मी डॉ. संदीप डाकवे सरांना पाठवली. आणि तिथूनच खरी ओळख सुरू झाली… मैत्री सुरू झाली… आणि पुढे ती आयुष्यभराची नाती बनत गेली.

त्या काळात मी या क्षेत्रात अगदी नवखा होतो. पोपटराव माने यांचे मार्गदर्शन होतेच, पण डॉ. संदीप डाकवे यांनी दिलेले मार्गदर्शन हे एका शिक्षकाप्रमाणे होते.
बातमी कशी लिहावी,
बातमीचा गाभा काय असतो,
मथळा (हेडिंग) कसा असावा,
मजकूरात नेमकेपणा कसा हवा —

या सगळ्या गोष्टी त्यांनी संयमाने, आपुलकीने आणि मनापासून शिकवल्या.
“शिक्षकाप्रमाणे” असे म्हणणेही कमीच ठरेल, कारण ते माझे खरे शिक्षकच आहेत.

जसा काळ पुढे गेला, तशा भेटीगाठी वाढत गेल्या. विचार जुळले, नातं घट्ट होत गेलं आणि एक अतूट मैत्री तयार झाली — जी आजही तितक्याच मजबुतीने कायम आहे.

डॉ. संदीप डाकवे हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नाही, तर एक चालतं-बोलतं विद्यापीठ आहेत.
चित्रकला क्षेत्रातील ते एक मोठं, जागतिक पातळीवर ओळखलं जाणारं नाव आहे.
पत्रकारितेतही त्यांची ओळख तेवढीच भक्कम आणि प्रेरणादायी आहे.

याशिवाय स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी राबवलेले असंख्य समाजोपयोगी उपक्रम हे त्यांच्या समाजाप्रती असलेल्या आपुलकीचे, संवेदनशीलतेचे आणि कर्तव्यभावनेचे उत्तम उदाहरण आहेत. कला, पत्रकारिता आणि समाजसेवा — या तिन्ही क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे.

एक गोष्ट मात्र आवर्जून सांगावीशी वाटते —
कधीही एखादं काम अडले, एखादी अडचण उभी राहिली, की डॉ. संदीप डाकवे यांचा एक फोन… आणि “प्रॉब्लेम सॉल्व्ह”.
अशा माणसांना खरंच अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणतात.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणारे, बहुआयामी, संवेदनशील, अभ्यासू आणि तितकेच मनमोकळे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. संदीप डाकवे.

अशा या प्रेरणादायी, मार्गदर्शक, मित्रवत आणि समाजभान जपणाऱ्या अवलिया व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून, मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
त्यांचे आयुष्य असेच उजळत राहो, त्यांचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचो, हीच सदिच्छा.

—आपलाच-
श्री.प्रदीप जिजाबाई विष्णु माने
(संपादक – साप्ताहिक कुमजाई पर्व)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...