घणसोली प्रभाग ९ ‘सेनेचा गड’ ठरणार!चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या – मंत्री शंभूराज देसाई**
नवी मुंबई | साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर घणसोली प्रभाग क्रमांक ९ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेनेच्या उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभागातील जनमत वेगाने शिवसेनेच्या बाजूने झुकत असून, विजयाची नांदी वाजल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.
सौ. वैशालीताई सुनील (दादा) मस्कर, श्री. प्रशांत धनाजी पाटील, सौ. दीपाली सुरेश सपकाळ आणि श्री. सैरभ ऋषीकांत शिंदे या चौघांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारत मतदारांशी थेट संवाद साधला असून, विकास, संघटन आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित प्रचारामुळे ही चौकडी विजयाच्या दिशेने भक्कम पावले टाकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या चौघांचा विजय आता जवळपास निश्चित मानला जात आहे.
काल दिनांक ०८ जानेवारी रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी घणसोली सेक्टर-१ येथील किट्टी हॉलमध्ये जाहीर प्रचार सभेला संबोधित करत उपस्थित मतदारांना थेट आणि आक्रमक शब्दांत आवाहन केले.
“घणसोली प्रभाग क्रमांक ९ मधील शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची ताकद दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे ठाम प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी खास करून सांगितले की, “हे सर्व उमेदवार सातारा जिल्ह्यातील असून मेहनती, तळागाळातील कार्यकर्ते आहेत. आपले लोक सत्तेत गेले, तर विकासाला वेग मिळतो. त्यामुळे मतदारांनी एकदिलाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात सभास्थळ दणाणून सोडले.
या प्रचार सभेस आ. शरद सोनवणे, ऋषीकांत शिंदे, संपर्क प्रमुख एकनाथ ओबाळे, उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत चाळके, अंकुश कदम, सुरेश सपकाळ, सुनील मस्कर, शाखा प्रमुख चंद्रकांत माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, घणसोली प्रभाग क्रमांक ९ मध्ये आता “चारही जागा शिवसेनेच्या” असा ठाम सूर उमटू लागला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेने घेतलेली ही आक्रमक आघाडी विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, प्रभाग ९ मध्ये विजयाची घडी शिवसेनेच्या बाजूने घट्ट बसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा