गुरुवार, ८ जानेवारी, २०२६

सातारा- जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे संकेत — शोध मोहिमेला वेग देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईचे संकेत — शोध मोहिमेला वेग देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सातारा, दि. ८ : बोगस डॉक्टरांच्या उपचारांमुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असून अशा प्रकारांना मुळासकट आळा घालण्यासाठी जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेला गती देण्यात यावी. बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा. या मोहिमेत कोणत्याही प्रकारची हयगय झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राजेश गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. संयुक्त मोहिमेचे आदेश बोगस डॉक्टर शोध मोहिम शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश देत जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागात गुप्त तपासणी करून अशा डॉक्टरांवर कारवाई करावी. या मोहिमेच्या प्रगतीचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शालेय आरोग्य तपासणीवर भर अंगणवाडी, आश्रमशाळा व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची ठरावीक वेळापत्रकानुसार आरोग्य तपासणी करण्यात यावी. तपासणीदरम्यान गंभीर आजार आढळल्यास संबंधित बालकांना तात्काळ उपचाराखाली आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बालआरोग्य ही जिल्ह्याची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवेचा आढावा १०२ व १०८ रुग्णवाहिका सेवा अत्यंत महत्त्वाची असून रुग्णाचा कॉल आल्यानंतर रुग्णवाहिका किती वेळेत घटनास्थळी पोहोचते, आतापर्यंत किती रुग्णांचे प्राण वाचले, याचा सविस्तर आढावा पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आयुष्मान भारत योजनेत कातकरी समाजावर लक्ष प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेंतर्गत कातकरी समाजातील नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढून देण्यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिले. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या घटकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्षयरोग मुक्त भारत अभियानात सक्रीय सहभाग क्षयरोग मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सक्रीय योगदान द्यावे. वेळेवर निदान, उपचार व जनजागृती यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. कुष्ठरोग निवारण पंधरवड्याचे प्रभावी आयोजन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रभात फेरी, महिला मेळावे, शालेय स्तरावरील विविध स्पर्धा, तसेच बाजारपेठांमध्ये प्रदर्शन व आरोग्य मेळावे आयोजित करण्याच्या सूचना देत जिल्हाधिकारी पाटील यांनी हा पंधरवडा आरोग्य विभागाने यशस्वीपणे राबवावा, असे आवाहन केले. बोगस डॉक्टरांवर कडक कारवाई, शालेय आरोग्य तपासणी, आपत्कालीन सेवा, सामाजिक घटकांसाठी आरोग्य योजना आणि जनजागृती अभियान यांद्वारे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार या बैठकीतून स्पष्ट झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...