शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

पाटण - रास्त भाव दुकानांसाठी अर्ज करा – तहसीलदार अनंत गुरव यांचे आवाहन; ३१ जानेवारी अंतिम मुदत.



रास्त भाव दुकानांसाठी अर्ज करा – तहसीलदार अनंत गुरव यांचे आवाहन; ३१ जानेवारी अंतिम मुदत.

पाटण : साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी - 
पाटण तालुक्यातील शिधापत्रिका धारकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने सध्या सुरू असलेली रास्त भाव दुकाने कायम ठेवून, आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली तसेच लोकसंख्या वाढीमुळे नव्याने मंजूर करावयाची रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक संस्था व व्यक्तींनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.

या प्रक्रियेमध्ये पाटण तालुक्यातील एकूण २१ गावांचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये सुपुगडेवाडी, सुरुल, सलतेवाडी, साखरी, दुटाळवाडी, येराडवाडी, गाढवखोप, वाटोळे, कोदळ, हुंबरणे, आटोली, पाचगण, दिक्षी, धावडे, किल्ले मोरगिरी, वाडीकोतावडे, लोहारवाडी, ढेबेवाडी, मस्करवाडी–२, मस्करवाडी–काळगाव व बाचोली या गावांचा समावेश आहे.

नवीन रास्त भाव दुकानांच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिलांचे स्वयंसहाय्यता बचत गट तसेच महिलांच्या सहकारी संस्थांना प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

इच्छुक अर्जदारांनी तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी व विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ३१ जानेवारीपर्यंत तहसीलदार कार्यालयात सादर करावा.
मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही, असेही तहसीलदार अनंत गुरव यांनी स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...