बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात मानखुर्दमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य मोर्चा.
मुंबई, मानखुर्द | दि. २५ डिसेंबर
(साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज, मानखुर्द प्रतिनिधी)
बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी मानखुर्द येथे भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व हिंदू संघटना, सामाजिक संस्था तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेले अन्याय, हल्ले, जबरदस्तीचे धर्मांतर, मंदिरांची तोडफोड व मानवी हक्कांचे उल्लंघन या घटनांमुळे संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संतापाची भावना आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच पीडित हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात येत आहे.
हा निषेध मोर्चा टी जंक्शन, महाराष्ट्र नगर फ्लायओव्हरच्या खाली, मानखुर्द, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असून, शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाद्वारे केंद्र सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांनी बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये सहभागी होऊन हिंदू एकजूट दाखवावी, असे आवाहन आयोजक सकल हिंदू समाज, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा