*शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत पालकमंत्र्यांची शेतातच दिवाळी साजरी!*
*पाच हजारांची अग्रिम मदत ही अंतिम नसून पंचनाम्यानंतर निकषांनुसार पूर्ण मदत देणार – पालकमंत्री शंभूराज देसाई*
सातारा दि ८ : दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण! मात्र निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदा या सणाचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. शेतात राबवलेले कष्ट, डोळ्यांत साठवलेली स्वप्ने आणि पिकांच्या रूपाने उभी केलेली आशा निसर्गाच्या संकटाने उद्ध्वस्त झाली. या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट शेताच्या बांधावरच दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत बोलताना पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, पाच हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, त्यांना सणाच्या काळात काहीसा दिलासा मिळावा, या उद्देशाने देण्यात येत आहे. ही अंतिम मदत नाही. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे अहवाल प्राप्त होतील. त्यानंतर शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना पूर्ण मदत देण्यात येईल.
माण तालुक्यातील पिंपरी गावात आज एक आगळेवेगळे आणि माणुसकीचा संदेश देणारे चित्र पाहायला मिळाले. कोणताही औपचारिक मंच नाही, मानपानाचा बडेजाव नाही, तर शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर पालकमंत्री शेतकऱ्यांसोबत बसले होते. सोबतीला गावातील शेतकरी, समोर दिवाळीचा फराळ आणि मनमोकळा संवाद! निमित्त होते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमाचे.आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकट कितीही मोठे असले तरी खचून जाऊ नका, धीर सोडू नका, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. आपणही यंदा साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली असून, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या सोबत उभे राहणे हीच खरी आपुलकी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,’ असा विश्वास देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या संकटामुळे खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांच्या घरात पुन्हा सुखाचे दीप उजळावेत, त्यांच्या कष्टांना दिलासा मिळावा आणि संकटाशी सामना करण्यासाठी त्यांना नवे बळ मिळावे, या भावनेतून झालेला हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी केवळ सणाचा सोहळा नव्हता, तर संकटाच्या काळात आपण एकटे नाही, आपल्या पाठीशी कोणीतरी उभे आहे, ही जाणीव करून देणारा क्षण होता.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, शेखर गोरे यांच्यासह पिंपरी गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळीच्या प्रकाशात आशेचा नवा किरण! संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्यासोबत फराळाचा घास घेणे, त्यांच्या व्यथा ऐकणे आणि मदतीचा विश्वास देणे, या कृतीतून यंदाच्या दिवाळीत माणुसकीच्या नात्याचा दिवा अधिक तेजाने उजळल्याचे चित्र पिंपरी गावात पाहायला मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा