ढेबेवाडी - जळाऊ लाकडाच्या अवैध वाहतुकीवर वनविभागाची कडक कारवाई – ट्रक जप्त, दोघांना अटक!
काढणे (ता. पाटण) येथील वनविभागाच्या हद्दीत विनापरवाना जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ढेबेवाडी वनविभागाने रात्रीच्या गस्तीदरम्यान धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रकसह २४ घनमीटरपेक्षा अधिक जळाऊ लाकूड जप्त करण्यात आले असून दोन संशयितांना ताब्यात घेऊन वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे दिपक शंकर पवार (रा. कुठरे) व दत्तात्रय उर्फ कैलास रामचंद्र लोहार (रा. साईकडे, ता. पाटण) अशी आहेत. दोघांनाही वनविभागाने ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
रात्रगस्तीत मिळालेल्या खबरीनंतर तात्काळ कारवाई
ढेबेवाडी वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वनपरिक्षेत्र–पाटण अंतर्गत खळे येथील वनहद्दीत रात्रगस्ती दरम्यान काढणे गावाच्या हद्दीतून लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून ट्रक अडवला. तपासणीअंती ट्रकमध्ये विनापरवाना तोड केलेले जळाऊ लाकूड आढळून आले.
ट्रक व लाकूड जप्त; कठोर शिक्षा संभवते
सदर वनगुन्ह्यात ट्रक व लाकूड जप्त करण्यात आले आहे. या प्रकारच्या गुन्ह्यासाठी कायद्यानुसार १ वर्षापर्यंत कारावास किंवा ५,००० रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा अशी तरतूद आहे. वनसंपदेची लूट करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पुढील कारवाई वेगाने होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई येथील उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहायक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष कारवाईत पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, भोसगावचे वनपाल शशिकांत नागरगोजे, खळेचे वनरक्षक अमृत पन्हाळे व कुंभारगावचे वनरक्षक अश्विनकुमार सहभागी होते.
वनसंपदेच्या संरक्षणासाठी शून्य सहनशीलता
वनविभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, विनापरवाना तोड व वाहतूक करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ वनविभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा