मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

पाटण - बंडोबांना थंड करण्यासाठी मनधरणी, लाडीगोडी अन्‌ धाकदपटशाही – नेत्यांची दमछाक!

बंडोबांना थंड करण्यासाठी मनधरणी, लाडीगोडी अन्‌ धाकदपटशाही – नेत्यांची दमछाक!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम आता कळसावर पोहोचला आहे. छाननीत जिल्ह्यातील ८१ उमेदवार बाद झाले असले, तरी अजूनही मैदानात उमेदवारांची गर्दी कायम आहे. रविवार-सोमवार सुट्टी गेल्याने माघारीसाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला असून, त्यामुळे बंडखोरी थोपवण्यासाठी पक्षीय नेत्यांची अक्षरशः तारांबळ उडाली आहे.

मंगळवारीच माघार घेण्याची अंतिम संधी. सकाळी ११ ते दुपारी ३ या चार तासांतच उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. अशा स्थितीत “उमेदवार ऐनवेळी गायब झाला तर काय?” या भीतीने अनेक ठिकाणी उमेदवारांना अक्षरशः सांभाळून ठेवण्याची वेळ आली आहे. या काळात मनधरणी, लाडीगोडी, सौदेबाजी आणि प्रसंगी धाकदपटशाही सुरू असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

आकडे बोलके – तरीही बंडखोरी कायम

जिल्हा परिषदेच्या ६५ गणांसाठी ६३२, तर पंचायत समितीच्या १३० गणांसाठी १,०५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ८१ उमेदवार छाननीत बाद झाले. तरीही मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असल्याने माघारीनंतरच खरी लढत स्पष्ट होणार आहे. मात्र बंडखोरीमुळे किती जण माघार घेतात, हा खरा कळीचा प्रश्न ठरला आहे.

पक्षांतरांचे राजकारण, अपक्षांचा डोकेदुखी ठरणारा फॅक्टर

या निवडणुकीत उमेदवारांसमोर अनेक पक्षांचे पर्याय खुले असल्याने, एका पक्षाने नाकारले तरी दुसऱ्या सत्ताधारी पक्षाकडे वळण्याची तयारी दिसून येते. अनेक ठिकाणी मधील नाराजांनी चा एबी फॉर्म उचलला आहे. तर काहींनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षांना आव्हान दिले आहे.

हीच अपक्षांची गटबाजी प्रत्येक मतदारसंघात अधिकृत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. एकही मत वाया जाऊ नये म्हणून नेते मंडळी अपक्षांच्या माघारीसाठी जोरदार चाचपणी करत आहेत.

पैसा, पदे अन्‌ ‘नावीन्यपूर्ण’ क्लुप्त्या!

बंडखोर शांत करण्यासाठी आणि अपक्षांना माघार घ्यायला लावण्यासाठी पैसा, पदांचे आमिष, राजकीय आश्वासने यांसह नवीन-नवीन क्लुप्त्या वापरल्या जात असल्याची चर्चा उघडपणे रंगली आहे. मतपरिवर्तन होऊन अपक्ष ऐनवेळी गायब झाला तर? या भीतीने नेत्यांचे डोके पूर्णपणे फिरले आहे.

माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी सध्या जिल्ह्यात सर्वच मतदारसंघांत बंडखोरीचा भडका उडालेला आहे. अधिकृत उमेदवारांना सेफ ठेवण्यासाठी चार दिवस तुणतुणे वाजवणे, मनधरणी करणे, दबाव टाकणे – असे सर्व प्रकार सुरू आहेत.
बंडोबांना थंड करण्यात नेते कितपत यशस्वी होतात, की बंडखोरीच निकालाला कलाटणी देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...