मानखुर्द वार्ड १४३ मध्ये आदित्य ठाकरेंची जोरदार एन्ट्री; नाराज कार्यकर्तेही उपस्थित, युतीची ताकद वाढल्याचे स्पष्ट.
मानखुर्द | साप्ताहिक कमजाई पर्व प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मानखुर्द वार्ड क्रमांक १४३ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आजच्या भेटीने प्रचाराला निर्णायक वळण मिळाले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, युतीच्या शक्तीचे प्रभावी प्रदर्शन पहायला मिळाले.
या प्रचारसभेत बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना युतीचे उमेदवार सौ. प्रांजल प्रशांत राणे यांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले.
“१५ जानेवारी रोजी रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून सौ. प्रांजल राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मानखुर्दच्या विकासासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
या वेळी विशेष बाब म्हणजे, यापूर्वी नाराज असलेले शिवसेना व मनसेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक नाराज कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत युतीच्या प्रचारात सहभागी झाल्याने, शिवसेना – मनसे युतीची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे प्रथमदर्शनी स्पष्टपणे दिसून आले. यामुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
यावेळी शिवसेना (UBT) आणि मनसेचे जुने-नवे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या घोषणांनी व कार्यकर्त्यांच्या जोशपूर्ण प्रतिसादाने परिसर दणाणून गेला. त्यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि एकजूट निर्माण झाली आहे.
मानखुर्द वार्ड १४३ हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाट्याला गेल्याने, मनसेकडून सौ. प्रांजल प्रशांत राणे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, महिलांचा वाढता पाठिंबा आणि युतीची संघटनात्मक ताकद पाहता सौ. राणे यांची उमेदवारी अधिक भक्कम होत चालल्याचे चित्र आहे.
एकूणच, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे मानखुर्द वार्ड १४३ मधील राजकीय समीकरणे बदलत असून, नाराज कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिवसेना (UBT) – मनसे युतीचा विजयाचा आत्मविश्वास अधिकच बळावला आहे. आता येत्या १५ जानेवारी रोजी मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा