घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला आहे. हा अर्ज युवा नेते संजय आंबुळकर (बापू) व युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. “राजकारण नव्हे तर प्रामाणिक जनसेवा” हे ध्येय समोर ठेवून श्री. संजय किसन सावंत यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्धार व्यक्त केला.
घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला व युवकांच्या समस्या या सर्व मुद्द्यांवर ठोस आणि वेळेत उपाययोजना करण्याचा विश्वास संजय सावंत यांनी यावेळी नागरिकांना दिला. स्थानिक पातळीवर विकासकामांमध्ये पारदर्शकता, नागरिकांचा थेट सहभाग आणि प्रशासनावर जबाबदारीची पकड ठेवणे हे आपल्या कार्यपद्धतीचे मुख्य सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते संजय आंबुळकर (बापू) म्हणाले, “नवी मुंबईच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमा व जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. श्री. संजय सावंत हे प्रभागातील प्रत्येक घटकाचा आवाज बनतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
तर युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांनी, “समाजासाठी काम करण्याची तळमळ आणि विकासाची दृष्टी असलेले उमेदवार पुढे यावेत, यासाठीच आम्ही संजय सावंत पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे सांगितले.
अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग ९ ‘ड’ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असून, स्थानिक प्रश्नांवर थेट काम करणाऱ्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या श्री. संजय किसन सावंत यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे. आगामी प्रचारात विकास, पारदर्शकता व जनसेवा हेच केंद्रबिंदू असणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा