बी.कॉम. २००६ बॅचची मातृसंस्थेला कृतज्ञतेची अनोखी भेट; डॉ. बापूजी साळुंखे ग्रंथालयास ५० हजारांची ग्रंथसंपदा
तळमावले, दि. २३ डिसेंबर २०२५ |साप्ताहिक कुमजाई पर्व प्रतिनिधी.
येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले या महाविद्यालयाच्या बी.कॉम. भाग ३ (२००६ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणसंस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे ग्रंथालयास तब्बल ५० हजार रुपये किमतीच्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त ग्रंथांची अमूल्य भेट दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दर्जेदार संदर्भ साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही भव्य ग्रंथभेट देण्यात आली.
आपण ज्या महाविद्यालयात घडून आलो, त्या संस्थेप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत ही उल्लेखनीय पहल केली. या ग्रंथसंपदेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले संदर्भग्रंथ, मार्गदर्शक पुस्तके व चालू घडामोडींवरील साहित्याचा समावेश आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे यांनी माजी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले की, “त्याग आणि परोपकार हाच जीवनातील सर्वात मोठा ठेवा आहे. महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीत माजी विद्यार्थी–विद्यार्थिनींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे माजी विद्यार्थी सामाजिक बांधिलकीतून विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत. आपले कार्यकर्तृत्व हीच आपली खरी ओळख आहे. अशा दानशूर व होतकरू माजी विद्यार्थ्यांचा आम्हाला अभिमान आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर व काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले ही संस्था या ग्रंथदानाबद्दल सदैव कृतज्ञ राहील. “आपण दिलेले मौलिक ग्रंथ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असून, तळमावलेसारख्या ग्रामीण भागातून भविष्यात अनेक प्रशासकीय अधिकारी घडण्यास यामुळे हातभार लागेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वाचनाच्या महत्त्वावर भर देताना प्राचार्या साळुंखे म्हणाल्या, “वाचन हा उत्तम संस्कार आहे. वाचनाने जीवन समृद्ध, अर्थपूर्ण व सुसंस्कारित होते. वाचन माणसाला माणूसपणाकडे नेते आणि ज्ञानसंवर्धनातून चांगल्या विचारांची निर्मिती होते.”
या समारंभास मा. संतोष पाटील (माजी विद्यार्थी), महाविद्यालयातील विद्यार्थी–विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग व प्रशासकीय सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. जी. एन. पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सौ. बी. एस. सालवाडगी यांनी केले.
या ग्रंथदानामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वातावरणाला नवी ऊर्जा मिळाली असून, माजी विद्यार्थ्यांनी घालून दिलेला हा आदर्श निश्चितच अनुकरणीय ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा