शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

तळमावले : जनसहकार निधी लिमिटेड संस्थेला खा. श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट

तळमावले : जनसहकार निधी लिमिटेड संस्थेला खा. श्रीनिवासजी पाटील यांची सदिच्छा भेट 
तळमावले : दि.31 रोजी सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्रीनिवासजी पाटील यांनी जनसहकार निधी लिमिटेड तळमावले ला सदिच्छ भेट दिली.यावेळी संस्थेच्या कामाची विस्तृत माहिती घेत संस्थेतील ठेवी व योजनांचा आढावा घेतला यावेळी संस्थेच्या सर्व संचालक,सल्लागार व सेवक वर्ग यांच्याशी चर्चा केली
आणि त्यांच्या कामाची सुस्ती केली. 

या भेटीदरम्यान विभागातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यापारी वर्ग व विभागातील इतर मान्यवर व उपस्थितांची आपल्या परिसरातील विकासकामाची निवेदने घेऊन ती पूर्ण करण्याचे आश्वासन खा.श्रीनिवास पाटील साहेबांनी दिले व सर्व कार्यकर्ते यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच मौजे काढणे गावचे विद्यमान सरपंच श्री.सुरज चक्के यांचा केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मौजे ग्रामपंचायत चिखलेवाडी(कुंभारगाव), करपेवाडी, मानेगाव, काढणे, तळमावले, मोरेवाडी(कुठरे), वाझोली येथील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्य सरकारची नवी नियमावली :लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा.

राज्य सरकारची नवी नियमावली :लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव  पुन्हा एकदा वाढतोय. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून  30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्बंधांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

काय आहेत नवे निर्बंध?

1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

गर्दी टाळा, आरोग्यमंत्र्यांचं आवाहन

31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारं वर्ष असावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. असं सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असं कुठलंही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केलं.

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

*सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देश*

सातारा : हॉटेल, रेस्टॉरंट  नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर पोलीस विभागाने कारवाई करावी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निर्देश

सातारा दि. 30  :  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जे नागरिक पालन करीत नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर  हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. जे हॉटेल, रेस्टॉरंट नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर पोलीस विभागाने  कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.

कोविड -19 प्रादुर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या  बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यातील खासगी आस्थापनांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

 

  पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह  व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा.  तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधन सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे, अशाही सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.  

धक्कादायक! ढेबेवाडी : 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून आरोपी गजाआड

ढेबेवाडी :धक्कादायक! 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, गळा दाबून केला खून आरोपी गजाआड
प्रतिनिधी :दीपक सुर्वे
ढेबेवाडी :ता. पाटण येथील सुतारवाडी ( रुवले) येथे काल, बुधवार दि.29 रोजी दुपारच्या सुमारास सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला.तिचा मृतदेह जवळच असलेल्या डोंगरातील ओढ्यात टाकून देण्यात आला होता. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. ढेबेवाडी पोलिसांनी आरोपीच्या  अटक केली आहे. संतोष थोरात (वय .48 रा. रुवले) असे आरोपीचे नाव आहे. ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थोरात याने काल, बुधवारी दुपारी अल्पवयीन मुलीस सोबत घेऊन रानात वैरण आणण्यासाठी नेले होते.हा नराधम तिच्या ओळखीचा असल्याने मुलगी त्याच्याबरोबर रानात गेली तेथे गेल्यावर आरोपीने तिच्यावर अत्याचार केला .आणि  नरड्यावर पाय देऊन त्याने तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह डोंगरातील ओढ्यात टाकून तो घरी आला. सायंकाळी घरातील लोकांनी मुलगी घरी आली नाही, म्हणून शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. ग्रामस्थांनी परिसरात शोध घेऊनही ती  सापडली नाही. म्हणून ढेबेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता पोलिसांना संतोष थोरात याच्या हालचाली संशयास्पद  वाटल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी गावातील नथुराम सुतार यांनी घरावर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता आरोपी त्या अल्पवयीन मुलीला घेवून गेल्याचे दिसून आल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला. त्यानंतर मुलीला ज्या ठिकाणी मारुन टाकले होते ते ठिकाण दाखवले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी कराड येथील रुग्णालयात पाठवला होता 
शवविच्छेदन झाल्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आज दुपारी 3 वाजता पार्थिवावर अंतिमसंस्कार  करण्यात आले . या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे.
घटनास्थळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई,जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपअधीक्षक रणजित पाटील यांनी भेट देवून तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या.

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

*सातारा : जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर*

*जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर*

कराड: प्रतिनिधी
 खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2021- 22 मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातील गावांसाठी 9 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती येणार आहे. 
    कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे अस्तित्वातील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारात्मक पुर्नजोडणी करण्याच्या कामासाठी 24 लाख 71 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच पध्दतीच्या कामानुसार अंबवडे ( संमत) कोरेगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी 44 लाख 8 हजार,
      सातारा तालुक्यातील  खोडद येथील योजनेसाठी 29 लाख 86 हजार, चिंचनेर (सं) निंब येथील योजनेसाठी 59 लाख 85 हजार, बोरगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 63 लाख 9 हजार,
     कराड तालुक्यातील वडोली भिकेश्वर येथील योजनेसाठी 1 कोटी 11 लाख 44 हजार, हेळगाव येथील योजनेसाठी 1 कोटी 21 लाख 15 हजार, कामथी येथील योजनेसाठी 40 लाख 67 हजार, शामगाव येथील योजनेसाठी 42 लाख 4 हजार, शेळकेवाडी (म्हासोली) येथील योजनेसाठी 24 लाख 98 हजार, शिंदेवाडी (विंग) योजनेसाठी 24 लाख 95 हजार, भवानवाडी येथील योजनेसाठी 23 लाख, पाचुंद येथील योजनेसाठी 23 लाख 65 हजार, 
    पाटण तालुक्यातील नुने येथील योजनेसाठी 1 कोटी 15 लाख 93 हजार, कुठरे येथील योजनेसाठी 24 लाख 66 हजार, बहुले येथील योजनेसाठी 24 लाख 21 हजार, चाळकेवाडी येथील योजनेसाठी 18 लाख 63 हजार, कळकेवाडी येथील योजनेसाठी 15 लाख 91 हजार, घोटील वरचे येथील योजनेसाठी 24 लाख 68 हजार, लुगडेवाडी येथील योजनेसाठी 23 लाख 73 हजार, आंबळे येथील योजनेसाठी 20 लाख 95 हजार असा भरीव निधी मंजूर झाल्याने  नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सातारा :बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करा-जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा :बोगस डॉक्टरांचे दवाखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करा-जिल्हाधिकारी शेखर सिंह 
सातारा दि. 29 : अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक प्रतिबंधक व कार्यवाही समितीची सभा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली.

या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

बोगस वैद्यकीय व्यवसायीकांनी औषधे दिल्यामुळे रुग्णांचे शारिरीक नुकसान होऊ शकते. काही रुग्णांना कायमचे दिव्यांगत्व येते. तर अनेकदा रुग्णांना प्राण गमवावा लागतो. तरी शहरी व ग्रामीण भागातील बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या यावेळी केल्या.

*सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार - जिल्हाधिकारी शेखर सिंह*

सातारा : 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सोमवार व शुक्रवार लसीकरण होणार

       - जिल्हाधिकारी शेखर सिंह 

 सातारा दि. 29 :   येत्या 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ही लस सर्व प्राथामिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,जिल्हा रुग्णालय या ठिकाणी  दर सोमवार व शुक्रवार या दोन्ही वारी लसीकरण होणार आहे. या लसीकरणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

 

  सातारा जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील युवक-युवतींना कोव्हॅक्सीन लस देण्यात येणार आहे. या लसीकरणापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी पालक, शाळा व महाविद्यालय व्यवस्थापकांनी जबाबदारी घ्यावी.

 

   ओमिक्रॉन या संसर्गाबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता शासनाने व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. घराच्या बाहेर पडताना प्रत्येक नागरिकांने मास्कचा वापर, सामाजिक अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. ज्या खासगी आस्थापना शासनाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे. भविष्यात कारवाईला गती देण्यात येणार आहे.

 ज्या नागरिकांनी अद्यापपर्यंत लसीचा एकही डोस घेतला नाही अशांनी प्राधान्याने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्यांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस घेतला नाही अशांनीही दुसरा डोस घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

राज्यातील जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य – गृह राज्यमंत्री शंभुराज देसाईविधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर

राज्यातील जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य – गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई

विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर

मुंबई, दि. 28 : जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राज्यातील जनतेचे रक्षण करण्यासाठी आपले पोलीस सक्षम आहेत, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानपरिषदेत उत्तर देताना सांगितले.

सातारा जिल्ह्यातील पायलट प्रोजेक्ट संपूर्ण राज्यात सुरु करण्याचा मानस

महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सातारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर पायलट प्रोजेक्ट चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सुरु करण्यात आला. यामुळे गुन्हेगारीला आळा बसला आहे. याच धर्तीवर संपूर्ण राज्यात हा प्रकल्प राबविणार असल्याचे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना सांगितले.

लॉकडाऊनच्या कालावधीनंतर बलात्काराच्या व विनयभंगाच्या घटनेमध्ये 2019-20  च्या तुलनेत मोठी घट झाली आहे. पोलीस महिला प्रशिक्षकांकडून महिलांना संरक्षण कसे करायचे याबाबतचे धडे देण्यात आले. यामुळे यासारख्या महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला. यामुळे कॉलेज आवार, कॅन्टीन, सार्वजनिक ठिकाणी गुन्ह्याला आळा बसला.

सन 2020-21 च्या दोन्ही अर्थसंकल्पात  पोलीसांसाठी भरीव निधीची  तरतूद करण्यात आली. तसेच जिल्हा नियोजन समितीमधूनही पोलीसांसाठी तरतूद करण्यात आली. पोलीसांना चांगली वाहने उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचबरोबर पोलीसांच्या घरांसाठी अर्थसंकल्पात 775 कोटींची तरतूद केली आहे.

श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाला. यात हल्लेखोर बाहेरचे होते. त्यांच्याकडे परवाने नव्हते. अशा हल्लेखोरावर भारतीय दंड विधानान्वये नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी.एन.ए. अहवाल तपासासाठी, या अहवालाला गती  मिळण्यासाठी नागपूर येथे नवीन लॅब सुरु करण्यात आली आहे.  त्याच धर्तीवर विभागीय स्तरावर अशा प्रकारच्या लॅब सुरु करण्याचा मानस आहे.

रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. वर्ग -1 आणि वर्ग -2 पदाची भरती सुरु करण्यासाठी एमपीएससीला कळविले आहे. नागपूरच्या कॉलेजमधील बोगस सर्टिफिकेटबाबत चौकशी प्रगतीपथावर आहे. यामध्ये 3 ते 4 सर्टिफिकेटस बोगस असल्याचे आढळून आले. कुठलाही बोगसपणा खपवून घेतला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

ॲट्रॉसिटी अंतर्गत नोंद होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याबाबत धोरण आणणार आहे.  देवस्थानच्या जमिनी हडपण्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करणार,   शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा आरखडा तयार असून निधीची कमतरता नाही, सर्टिफिकेट,  कोकणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाटण : ३१ डिसेंबर तळीरामाच्या पार्टीवर वनविभागाची करडी नजर


पाटण : ३१ डिसेंबर रोजी वनविभागाच्या क्षेत्रात पार्टी केल्यास होणार कारवाई 
पाटण : ३१ डिसेंबर रोजी वनविभागाच्या क्षेत्रात कोणी पार्टी करताना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा हेळवाक ता.पाटण वनक्षेत्रपाल (वन्यजीव) एस.ए.जोपळे यांनी एका पत्रकाद्वारे दिला.
या दिवशी विशेषता भैरवगड,केमसे,सासरी,
दलधाम,ढनकल,अंबामातामंदिर,बोपोली,कोंढवळे,धबधबा,रामघळ परिसरात दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी वन विभागाचा विरोध नाही. मात्र त्याचे निमित्त साधून वन क्षेत्रांमध्ये चुली पेटवणे, फटाक्यांची आतिषबाजी याला विरोध आहे. वन क्षेत्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना निर्बंध आहेत. त्यामुळे या दिवशी क्षेत्रांमध्ये पार्ट्या करू नयेत अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा श्री.एस.ए.जोपळे
यांनी दिला आहे.तसेच या दिवशी दिवस आणि रात्र वन विभागाचे कर्मचारी साध्या वेशात पेट्रोलिंग करणार असून अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्यांची गय केली जाणार नाही असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू

दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील  - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू

मुंबई, दि. 28 : पश्चिम महाराष्ट्रातील अवर्षण भाग व तसेच मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील  आहे अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला गती मिळाली नाही तरी या योजनेसंदर्भात शासन करीत असलेली कार्यवाही याबाबत लक्षवेधी मांडली.

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले,पावसाळ्यात कृष्णा खोऱ्यातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवून ते भीमा खोऱ्यात आणून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील दुष्काळी भागाला पुरविण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2004 मध्ये कृष्णा –भीमा स्थिरीकरण योजनेला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली.मात्र सन 2013 च्या कृष्णा पाणी तंटा लवाद 2 च्या निर्णयामध्ये कृष्णा खोऱ्यातील पाणी एका उपखोऱ्यातून दुसऱ्या उपखोऱ्यात वळविण्यास मनाई केलेली असून कृष्णा –भीमा स्थिरीकरणाचा प्रस्ताव नामंजूर केला आहे.कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा शासन स्तरावर फेरविचार व्हावा, असा अहवाल महामंडळ आणि शासनाकडे सादर करण्यात आला आहे.उजनी जलाशयातून गाळमिश्रीत रेती तसेच वाळू यांचे प्रमाण निश्चित करुन आणि निविदेचे निकष अद्यावत करुन गाळ काढण्याची प्रक्रिया करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

बेकायदा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार – वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 28 : वृक्षतोडीच्या घटना जर कुठे घडत असतील तर अशा वृक्षतोडीबाबत कडक कारवाई करणार असल्याची माहिती वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषद सदस्य अरूण लाड यांनी कडेगाव-पलूस वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड तसेच या परिसरात करण्यात येणारी लागवड याबाबत शासन करत असलेली कार्यवाहीसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, कडेगाव-पलूस वन परिक्षेत्राची निर्मिती सन २०१४ मध्ये झाली असून कडेगाव-पलुस वनपरिक्षेत्राचे एकूण क्षेत्र २६७५.१० हे. इतके आहे. कडेगाव वनपरिक्षेत्रात एकूण ३ वन परिमंडळ व ५ नियत क्षेत्राचा समावेश आहे. बेकायदा वृक्षतोडीस चाप बसावा, म्हणून कडेगाव-पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत.मागील ३ वर्षात अवैध वृक्षतोडीचा १ वनगुन्हा निदर्शनास आला आहे. यामध्ये फॉरेस्ट सर्वे क्रमांक ११६ मधील ग्लिरिसिडिया या प्रजातीच्या वृक्षाच्या ५ वृक्षांना क्षती पोहोचविणेबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच माहे नोव्हेंबर २०२१ मध्ये मालकी क्षेत्रात वृक्षतोडीच्या एका घटनेची नोंद करण्यात आली आहे.  ही घटना हिंगणगाव खुर्द येथील असून, यामध्ये १० आंबा या प्रजातीचे वृक्षतोड करणाऱ्या आरोपीस दंड करण्यात आला आहे. तथापि, दि. 8 नोव्हेंबर 2021 दरम्यान वन हद्दीत कोणताही अवैध वृक्षतोडीची बाब कडेगाव पलूस वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे निदर्शनास आली नाही. वनक्षेत्र तसेच वनक्षेत्राबाहेर अवैध वृक्षतोड रोखण्याच्या दृष्टीने गस्तीचे नियोजन असून त्यानुसार वनपरिक्षेत्र स्तरावर कार्यवाही करण्यात येते. तसेच वृक्षलागवडीसाठीदेखील वृक्षलागवड करण्यात येत आहे, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

*कराड : पोटनिवडणुकीबाबत सविस्तर माहिती न देता अंधारात ठेवल्याने चोरजवाडी ग्रामस्थांमध्ये संताप*

*पोटनिवडणुकीबाबत सविस्तर माहिती न देता अंधारात ठेवल्याने चोरजवाडी  ग्रामस्थांमध्ये संताप*
उंब्रज:- २८ डिसें - चोरजवाडी ता.कराड ग्रामपंचायतीमध्ये आरक्षित उमेदवाराअभावी रिक्त असलेल्या जागेची पोटनिवडणूक लागली;मात्र त्या निवडणुकीची सध्याची आरक्षण सोडत व इतर माहिती सार्वजनिक अथवा नोटीस न लावता अंधारात ठेवल्याने त्या जागा पुन्हा रिक्त राहिल्याने ग्रामस्थांमध्ये स्थानिक ग्रामसेवक व तलाठी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
     चोरजवाडी ग्रामपंचायतमध्ये एकूण सात सदस्य असून त्यामध्ये पाच जागा निवडून आल्या आहेत. दोन जागा ओ.बी.सी.आरक्षित उमेदवार न दिल्याने रिक्त होत्या,त्या जागेच्या आरक्षणात बदल होऊन २१ डिसेंबर रोजी जे मतदान झाले त्या साठी वार्ड क्रमांक १ मधील जागा सर्वसाधारण पुरुष यासाठी खुली झाली होती मात्र निवडणूक प्रक्रिया व आरक्षण सोडत या बाबाची अधिकृत माहिती  सार्वजनिक अथवा नोटीस न लावल्याने ती जागा रिक्त राहिली. याबाबत ग्रामसेवक दादासो केंगार यांच्याकडे विचारणा केली असता ते निवडणूक प्रक्रिया तलाठी पाहतात व तलाठी महापुरे यांच्याशी विचारणा केली असता मी ग्रामसेवक केंगारे व ग्रामपंचायत सदस्य याना माहिती दिली होती असे उत्तर देऊन जबाबदारी झटकली जात आहे.
     त्यामुळे काही ठराविक हेतूने ग्रामसेवक व सदस्यांनी नवीन सदस्य येऊ नये म्हणून कि काय ? ग्रामस्थांना आरक्षण व निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती व नोटीस लावली नाही कि काय ? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जात आहे.
 
कुमजाई पर्वशी बोलताना ग्रामस्थ अधिक मराठे यांनी सांगितले की 
 मी स्वतः अण्णासाहेब केंगार यांना फोन करून निवडणूक लागली तेव्हा आरक्षणविषयी विचारपूस केली तेव्हा त्यांनी अगोदर आहे तसे आरक्षण आहे असे बोलले एक जागा सर्वसाधारण साठी खुली आहे असे काही सांगितले नाही. नंतर काही दिवसांनी विचारपूस केली असता ते काम तलाठी यांचं आहे असं सांगून जबाबदारी झटकत होते मात्र मी याबाबत कायदेशीर तक्रार निवडणूक अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे करणार आहे .

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

*ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव*

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला शिफारस करण्याचा ठराव

मुंबई, दि. 27 : इतर मागास वर्गातील व्यक्तींना, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व मिळणे आवश्यक आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इतर मागास वर्गातील व्यक्तींना वगळून घेण्यात येऊ नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याचा ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. या ठरावास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन देऊन एकमताने हा ठराव पारित करण्यात आला. तसेच विधानपरिषदेत हा ठराव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडला, तोही सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने प्रक्रिया सुरु केली. मात्र राज्य शासनाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेवू नये अशी शिफारस राज्य निवडणूक आयोगाला करण्याबाबतचा ठराव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. तो सर्वपक्षीय सहमतीने एकमताने पारित करण्यात आला.

राज्यातील ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला ओबीसी आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी, त्या आयोगामार्फत ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि आयोगाच्या शिफारसीसह जमा झालेली माहिती सर्वोच्च न्यायालयात  सादर करावी असा तीन सूत्री कार्यक्रम दिला. याची पूर्तता करण्यासाठी राज्य शासनाने तीन महिन्यांचा कालावधी मागितला होता.

पाटण :रस्ते पुलाच्या कामासाठी ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर


पाटण :रस्ते पुलाच्या कामासाठी ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर

पाटण : जुलै महिन्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे दळण-वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे,साकव पूलांचे , प्रमुख जिल्हा मार्ग , राज्य मार्ग यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले होते . त्यामुळे या मार्गांवरुन दळण - वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या नुकसान झालेल्या विविध ‍ विकास कामांचे पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाच्या माहे डिसेंबरच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होण्यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिफारस केली होती . त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण रस्त्यांचे व साकव पूलांच्या कामांसाठी ५० कोटी तर प्रमुख जिल्हा मार्ग , राज्य मार्ग यांच्या भूसंपादनासह सुधारणा करण्याच्या कामांसाठी २२ कोटी ४ लाख असा एकूण ७२ कोटी ४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

---------------------------------------

ही आहेत मंजूर कामे

: पाटण - मणदुरे - जळव - तारळे - पाल रस्ता पाटण ते साखरी रुंदीकरणासह सुधारणा ३ कोटी २० लाख ,

- पाटण - मणदुरे - जळव - तारळे पाल - निवडे पुनर्वसन ते पाल रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी ३० लाख .

- वाखानवस्ती कराड - ढेबेवाडी सणबुर - महिंद - नाटोशी - मोरगिरी - चाफेर - महिंद ते गडगडा भुसंपादन व सुधारणा २ कोटी . - चरेगांव - चाफळ - दाढोली - महाबळवाडी - येरफळे - त्रिपुडी - चोपडी - बेलवडे - आंब्रुळे - कुसरुंड - नाटोशी रस्ता येरफळे ते त्रिपुडी भुसंपादन व सुधारणा १ कोटी .

- सातारा - गजवडी - चाळकेवाडी - घाणबी - केर - पाटण - घाणबी फाटा ते घेरादातेगड फाटा सुधारणा ९० लाख .

- नागठाणे - तारळे - पाटण रस्ता कोंजवडे फाटा ते वजरोशी रुंदीकरणासह सुधारणा २ कोटी .

- इजिमा 138 ते निगडे - कसणी - निवी - डाकेवाडी - धामणी - चव्हाणवाडी - मस्करवाडी - घराळवाडी रस्ता कसणी गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम २ कोटी .

- नाडे - सांगवड - मंद्रुळकोळे - ढेबेवाडी रस्ता वांग नदीवर मंद्रुळकोळे येथे मोठया पुलाचे बांधकाम ६ कोटी ५० लाख .

- त्रिपुडी - मुळगांव - कवंरवाडी - नेरळे - गुंजाळी - लेढोंरी - मणेरी - चिंरबे - काढोली - चाफेर - रिसवड - ढोकाळे कवरवाडी ते चेवलेवाडीचे बांधकाम २ कोटी ५० लाख या कामांचा समावेश आहे .

राज्य शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये मंजूर झालेल्या विकास कामांची लवकरच निविदा कार्यवाही करण्यात येऊन दळण - वळणाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यांची कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत .

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण !

विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण !

मुंबई दि.26 काँग्रेसमधील विधानसभा अध्यक्षपदाचा पेच अखेर सुटला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण,यांचं नाव नक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. उद्या चव्हाण विधानसभा अध्यक्षपदासाठीचा अर्जही भरणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्य सरकारने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार उद्या 27 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरायचा असून 28 डिसेंबर रोजी अध्यक्षांची निवड होणार आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपद कुणाकडे देणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. काँग्रेसमधून एकाचवेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, यात पृथ्वीराज चव्हाणांचं नाव या पदासाठी फिक्स झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं.

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर शासनाची भूमिका सकारात्मक - वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर शासनाची भूमिका सकारात्मक - वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई

 

मुंबई, दि. 24; सन २०२१-२२ च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी विभागाशी संबंधित अनेक विषय मांडले त्या सर्व मुद्यांची दखल घेतली असून चर्चेत उपस्थित मुद्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी  विधान परिषदेत सांगितले.

पुरवणी मागणीवर झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. श्री.देसाई म्हणाले, हिवाळी अधिवेशनात एकूण 31हजार 289 कोटी 26 लक्ष रकमेच्या मागण्या सादर केल्या आहेत. त्या पैकी 16 हजार 904 कोटी 37 लक्ष रुपये अनिवार्य खर्चासाठी आणि 548 कोटी 47 लक्ष एवढी रक्कम केंद्र पुरस्कृत योजनांसाठी प्रस्तावित आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निदर्शनास येते की, सध्या महसूली जमेमध्ये मोठ्याप्रमाणावर घट झालेली असून राज्य शासनावर पडणारा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी उपलब्ध साधन संपत्ती अपुरी असल्याने हा खर्च काटकसरीच्या उपाययोजना अंमलात आणून तसेच गरजेनुसार अधिकचे कर्ज काढून भागवावा लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनावरील कर्जाचा बोजा वाढून त्यावर द्याव्या लागणाऱ्या भविष्यातील व्याजाच्या रकमेत वाढ होणे अनिवार्य आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरवणी मागणीवरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सुधीर तांबे, भाई गिरकर, अंबादास दानवे, जयंत पाटील, रामदास कदम, रणजीत पाटील, किरण सारडा, किरण सरनाईक, अभिजीत वंजारी, प्रविण दटके, कपिल पाटील, नरेंद्र दराडे, निरंजन डावखरे, अवधूत तटकरे, नागो गाणार, प्रशांत परिचारक, रमेशदादा पाटील, राजेश राठोड, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गिरीश व्यास आणि डॉ. प्रज्ञा सातव,यांनी सहभाग घेतला.

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार - पशुसंवर्धन व दुग्धविकास विकास मंत्री सुनिल केदार

दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार - पशुसंवर्धन व दुग्धविकास विकास मंत्री सुनिल केदार

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला किमान आधारभूत किंमत (एफआरपी) देण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही केली याबाबत सदस्य सदाशिव खोत यांनी प्रश्न विचारला होता.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार म्हणाले, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचा रास्तभाव देण्याबाबत विविध संघटना तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. ऊसाप्रमाणेच दूधालाही किमान आधारभूत किंमत देण्याबाबत कायद्यातील तरतूदी तपासल्या जातील. तसेच किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत व्यवहार्यता तपासण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे लवकरच दूधाला किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती त्यांनी सादर केली.

कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

कोरोना कालावधीत कार्यरत डॉक्टरांना सेवेत कायम करण्यास शासन सकारात्मक - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

कोरोना कालावधीत ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्य केले त्यांना शासकीय सेवेत नियमित करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असून, त्यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत अमिन पटेल यांनी कोविड काळात काम केलेल्या डॅाक्टरांना नियमित करण्याचा औचित्याचा मुद्दा मांडला होता.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करणाऱ्या सर्व कोविड योद्ध्यांना न्याय मिळणे महत्त्वाचे असून, या डॉक्टरांना शासकीय सेवेत नियमित करण्यासाठी वैद्यकिय शिक्षण विभाग सकारात्मक आहे. अर्थ व नियोजन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेही या संदर्भात पाठपुरावा करण्यात येईल, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

राज्यातील अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम होणार बॅंक खात्यात जमा

राज्यातील अंगणवाडी सेविकांना साडी खरेदीसाठी रक्कम होणार बॅंक खात्यात जमा

मुंबई दि. 24 : पोषण अभियानअंतर्गत अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हातमाग साड्या विकत घेण्यासाठी ही रक्कम थेट कर्मचा-यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असून प्रति साडी रु. 400/- प्रमाणे दोन साड्यांकरीता रु.800/- प्रत्येक अंगणवाडी सेविकांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित (DBT)  करण्यात येणार आहे.  या संबंधिचा महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून हा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सातारा : ग्राहकांनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे गरजेचे: जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा : ग्राहकांनी लोकशिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे गरजेचे: जिल्हाधिकारी शेखर सिंह 
सातारा दि. 24  :  सध्या ऑनलाईन बाजार व्यवस्था विस्तारत असताना ग्राहकांनी लोक शिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, उपनियंत्रक वैद्यमापनशास्त्र ज्योती पाटील, सह जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश जाधव, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कै.सौ. अरुंधती अरविंद ढवळे,ज्युनिअर कॉलेज कन्याशाळा सातारा येथील विद्यार्थीनींमार्फत  जागो ग्राहक जागो  या विषयावर सादर करण्यात आलेल्या पथनाट्याचे कौतुक करुन   जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ग्राहकांना त्यांच्या हक्का विषयी जागृत करण्यासाठी लोककलेचा व अन्य स्तरावर माहिती प्रसार करुन ग्राहकांपर्यंत माहिती पोहचविल्या ग्राहक कायद्याचा उद्देश पूर्ण करण्यात येईल. विविध माध्यमातून ग्राहकांना हक्काबाबत जागृत करण्याचे प्रयत्न सर्वांनी करावेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडून पुरविल्या जाणाऱ्या ग्राहक सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली. उपनियंत्रक वैद्यमानपशास्त्र ज्योती पाटील यांनी वजने, मापे या संदर्भात ग्राहकांनी कशी जागृतता दाखविली पाहिजे याबाबत माहिती दिली.
माहे जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात बहुमुल्य मदत केलेल्या संघटनांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

*ग्राहक जागृती प्रदर्शनाचे आयोजन*
यावेळी घरगुती गॅस सुरक्षा व ग्राहकांनी दाखवावयाची जागरूकता याबाबत एक ध्वनी चित्रफीत दाखविणेत आली. ग्राहकांना पुरविणेत येणाऱ्या विविध सोयी- सुविधांचे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. पथनाट्याच्या माध्यमातून ग्राहकांना जागृतीचा संदेशही देण्यात आला.

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी*

*माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी* 
नवीन वर्षात हि आरोग्य केंद्रे उभारली जाऊन कार्यान्वित होतील. 

 *कराड:* कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला  त्यांची नोंद घेत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा शासकीय खर्चाने मिळण्यासाठी  आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज होती या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड, मलकापूर व सैदापूर येथे ७ नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड शहरातील शुक्रवार पेठ येथे २, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट येथे १, वाखाण रोड येथे १ याचबरोबर मलकापूरमधील लक्ष्मीनगर व आगाशिवनगर येथे प्रत्येकी १, आणि सैदापूर येथे १ असे एकूण ७ नागरी आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. 

कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना आरोग्य सुविधा देताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती. असलेली यंत्रणा अपुरी पडत होती. अश्या परिस्थितीत प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका  घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, वेळोवेळी बेड वाढविले गेले व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला. आरोग्य केंद्रे वाढविली पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करीत कराड दक्षिण मध्ये नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करून आणली. हि नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले. 

हे नागरी आरोग्य केंद्र सुरु करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती यांच्या समन्वयाने स्वतःच्या मालकीची जागा किंवा कमाल मासिक रु. १५,०००/- पर्यंत भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. सदर नागरी आरोग्य केंद्रासाठी १५०० ते २५०० sq ft इमारत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा, शौचालय, वीज याची उपलब्धता आहे तसेच या नागरी आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), औषध निर्माता, स्टाफ नर्स, शिपाई या पदांची नियुक्ती केली जाणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोग्य सुविधा वाढविण्यावर असलेल्या धोरणांमुळे कराड दक्षिण मधील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. 
--------------------------------------------

तळमावले : डॉ.संदीप डाकवेंकडून विद्यानृसिंह भारती यांना 11,111 वे पेंटींग प्रदान

तळमावले : डॉ.संदीप डाकवेंकडून विद्यानृसिंह भारती यांना 11,111 वे पेंटींग प्रदान
तळमावले/वार्ताहर
कोल्हापूर येथील करवीर पीठाचे मठाधिपती विद्यानृसिंह भारती यांना डॉ.संदीप डाकवे यांनी 11,111 वे पेंटींग प्रदान केले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डॉ.डाकवे यांनी कलाकृती भेटीचा छंद जोपासला आहे. नुकतेच त्यांनी मठाधिपती विद्यानृसिंह भारती यांना 11,111 वे पेंटींग प्रदान केले. मठाधिपती यांनी डॉ.डाकवे यांच्या कलात्मक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. नावीण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या डॉ.डाकवेंच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये तीनदा तर ‘हायरेंज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम राबवले आहेत. नुकतीच त्यांची दूरदर्शन वाहिनीवर प्रदीर्घ मुलाखत प्रसिध्द झाली आहे. डॉ.संदीप डाकवे यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आतापर्यंत चित्र भेटी दिलेल्या निवडक आठवणींचे ‘ग्रेट स्केच भेट’ या नावाचे पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. भविष्यामध्ये ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ यामध्ये नाव नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चौकटीत : आतापर्यंत कलाकृती दिलेल्या ग्रेट भेटी :
100 वे चित्र अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर, 500 वे पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे, 100 वे अभिनेते भरत जाधव, 2000 वे अभिनेते सुबोध भावे, 3000 वे अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वे पार्श्वगायिका कविता राम, 5000 वे एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वे पत्रकार हरीष पाटणे, 7000 वे एसपी अजयकुमार बन्सल, 8000 वे आरटीओ तेजस्विनी चोरगे, 9000 वे  ज्योतिष विशारद सतीश तवटे, 10000 वे अभिनेता रोहन गुजर यांना दिले आहे.

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

ग्रामपंचायत : संगणक चालकांचा वेतनाबाबत खुशखबर

ग्रामपंचायत : संगणक चालकांचा वेतनाबाबत खुशखबर

मुंबई, दि. 23 :मुंबई : महाराष्ट्रात जवळपास २२ हजार संगणक परिचालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) आहेत. आपल्या मागण्यांसाठी या संगणक परिचालकांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले होते.ग्रामपंचायतींमधील डिजिटलचं संपूर्ण काम संगणक परिचालक करत आहेत. ग्रामीण भागातील ६ कोटी जनतेला हे परिचालक घरपोच सुविधा उपलब्ध करून देत आहेत. मात्र, त्यांना अपुरे मानधन मिळत आहे. त्यामुळे IT महामंडळातून नियुक्ती मिळावी आणि त्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, तसेच किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या आंदोलकांनी केली होती.

"तुमच्याकडे डिजिटल तंत्रज्ञानाचं जे काही ज्ञान आहे ते संपूर्ण देशात महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे आहे. ती ताकद तुमच्यात आहे. माझ्या राज्यामध्ये तुमच्यावर अन्याय होणार असेल तर राज्याचे सरकार आणि राज्याचा उपयोग तरी काय? तुमच्या न्याय हक्कांच्या मागण्यांमध्ये शिवसेना तुमच्यासोबत आहे. तुमचे न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे वचन मी तुम्हाला देतो." असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांची भेट घेत दिले होते.

तर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी "संगणक परिचालकांच्या खोलीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला ४ लाख रुपये केंद्र सरकार देत आहे. त्याशिवाय भारत नेटचा मोठा कार्यक्रम आहे. म्हणून येणाऱ्या निधीतूनच संगणक परिचालकांना किमान वेतन द्यावे यासाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन यातून लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत." असे सांगितले होते.

यासंदर्भात, आमदार सुरेश धस यांनी विधानपरिषदेत राज्यातील संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

आमदार धस यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगणक परिचालकांसाठी पद निर्मिती करुन ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आकृतीबंधामध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन आहे. तसे संगणक परिचालक संघटनेला कळविले आहे, अशी माहिती दिली.

रुग्णांना रक्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

रुग्णांना रक्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई - सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 23 : राज्यातील रक्त पेढ्यांमार्फत दैनंदिन उपलब्ध रक्त साठा हा सातत्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर अपडेट करण्यात येतो. थॅलेसेमिया, सिकलसेल रुग्णांना रक्त देतांना टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

श्री.टोपे म्हणाले, शासकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या रुग्णालयातील रुग्णांना नि:शुल्क रक्त देण्यास सुरुवात केली आहे. जिथे रक्ताची आवश्यकता असेल तिथे रक्त पोहचविण्यासाठी इंटरलिंक्ड सुविधा उभारण्यात येत आहे. रक्तपेढ्यांच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी रक्तदान शिबीरे घेतली जात आहे. राज्यात रक्ताची आवश्यकता पडल्यास पुरेसा साठा उपलब्ध राहिल यासाठी काळजी घेतली जात आहे. असेही त्यांनी सांगितले.या विषयाच्या अनुषंगाने डॉ.रणजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

सातारा : ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा- जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा : ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवा- जिल्हाधिकारी शेखर सिंह

सातारा दि. 23 : ओमिक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सर्व यंत्रणा  प्रशासनाने सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी दिले.  कोविड -19 प्रादर्भाव नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतची जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या  बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिशन पवार यांच्यासह आरोग्य विभागातील व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, कारोना प्रतिबंधक पहिला डोस घेणाऱ्यांनी दुसरा डोसही प्राधान्याने घेण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत.  ओमिक्रॉनचा  धोका पाहता लसीकरणाला गती द्यावी. जिल्ह्यातील खासगी आस्थापंनामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. जे खासगी आस्थापना नियमांचे पालन करणार नाही अशांवर दंडात्मक कारवाई करावी.

पोलीस विभागाने ज्या ठिकाणी विवाह  व सार्वजनिक समारंभ होत आहे तेथे भेट देवून तपासणी करावी. नियमांचे पालन होत नसल्यास कारवाई करावी. शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश देण्यात यावा. नगर परिषद व नगर पंचायतींमधील कर्मचाऱ्यांचे 100 टक्के लसीकरण झाले आहे की नाही याची तपासणी करावी. ज्या शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लँट मंजुर केले आहेत त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट कार्यान्वीत आहेत त्याची काटेकोरपणे तपासणी करावी. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन घेण्याच्या सूचनाही  जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.

ऑक्सिजन सिलेंडर, व्हेटीलेटर्स, रेमडीसिव्हर, बालकांना लागणारी आय.व्ही. फ्ल्यूडसचा पुरेसा साठा आरोग्य विभागाने उपलब्ध ठेवावा. तसेच भविष्यात उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी आत्तापासून सर्व साधण सामुग्री व आवश्यक साधनांचे योग्य नियोजन करावे.  त्यासाठी आर्थिक तरतुद करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले.

*कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा*खा.श्रीनिवास पाटील यांची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचेकडे मागणी

*कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करा*
खा.श्रीनिवास पाटील  यांची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचेकडे मागणी 
कराड : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे अशी मागणी साता-याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे.
कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर खा.श्रीनिवास पाटील यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. यासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून ही आग्रही मागणी केली आहे.
    खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच कोल्हापूर येथे स्थापन करावे अशी मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने यासंदर्भात सर्किट बेंचच्या स्थापनेबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. हे सर्किट बेंच स्थापन झाल्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना याचा अधिक फायदा होणार आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई उच्च न्यायालयाशी संबंधित कामासाठी मुंबईला जावे लागते.  याकरिता सुमारे 350 ते 400 किलोमीटरहून अधिक प्रवास त्यांना करावा लागतो. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा अनावश्यक रित्या खर्च होत असतो. कोल्हापूर येथे सर्किट बेंच स्थापन झाल्यास शेजारील जिल्ह्यातील दोन कोटींहून अधिक लोकांना याचा फायदा होईल. त्यामुळे हे सर्किट बेंच स्थापन होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली. तसे निवेदन ना.किरेन रिजिजू यांना त्यांनी दिले आहे.

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत

विधानसभा अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत 
मुंबई दि.22 : हिवाळी अधिवेशनात विधीमंडळाच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. विधीमंडळ अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस होता. त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक झाली, तर दुसरीकडे विधानसभेच्या अध्यक्षाची निवड 26/27 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर ही माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय. 
नाना पटोले, नितीन राऊत,सुनिल केदार हे काल दिल्ली दौऱ्यावर होते.
विधानसभा अध्यक्षांबाबत हायकमांड जो काही निर्णय घेईल तो सर्वांना मान्य राहील, असं यावेळी नाना पटोलेंनी सांगितलंय. विधानसभा अध्यक्षपदासाठी
भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचं नाव आघाडीवर असलं, तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचे नेते होते. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची जागा रिक्त झालीय. काँग्रेसचे नेते वेणूगोपाल आणि एच. के. पाटील यांच्यासोबत काल एक भेट झाली असून बाळासाहेब थोरात,अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही पटोलेंनी सांगितलंय. त्यामुळं अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे.

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

जीएसटी विभागाची पुण्यात मोठी कारवाई; २३३ कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

पुणे, दि. 21 : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने (जीएसटी) 200 कोटीपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास अटक केली आहे. आफताफ मुमताज रेहमानी या व्यापाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राज्य कर अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही करण्यात येते. त्यानुसार आफताफ रेहमानी याच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मे. अर्श स्टील कॉर्पोरेशन या कंपनीने वस्तू व सेवाकर कायदा 2017 याअंतर्गत नोंदणी दाखला घेतला. या कंपनीच्या माध्यमातून आफताफ रेहमानी याने 200 कोटी रकमेची फक्त बिले देऊन 41 कोटी 95 लाखांचा आय. टी. सी. (इनपुट टॅक्स क्रेडिट) पुढील खरेदीदारांना पाठवला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी बोगस कंपनीकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकातून सुमारे 27 कोटी 7 लाख रकमेचा परतावा प्राप्त करून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य वस्तू व सेवाकर विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. अप्पर राज्यकर आयुक्त, पुणे श्री. धनंजय आखाडे, राज्यकर सहआयुक्त, श्रीम. रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर उपायुक्त दत्तात्रय आंबेराव व सहाय्यक राज्यकर आयुक्त सचिन सांगळे यांच्या प्रयत्नातून ही अटक कारवाई करण्यात आली. विभागातर्फे ॲड. महेश झंवर यांनी काम पहिले असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

काेविड - लस घेतली नसल्यास गावात नो एन्ट्री ग्रामपंचायतीकडून फर्मान,: गावकऱ्यांचा पाठिंबा

काेविड - लस घेतली नसल्यास गावात नो एन्ट्री ग्रामपंचायतीकडून फर्मान,: गावकऱ्यांचा पाठिंबा 
नांदेड  : काेविड १९ चे रुग्ण गावात वाढू नयेत यासाठी गतवर्षी राज्यातील गावा गावांत वेशीच्या बाहेर ग्रामस्थांना ठेवले जात हाेते.
त्यांची तपासणी केली जात हाेती. काेविड १९ चा  प्रादुर्भाव नसेल तरच संबंधितास गावात साेडले जात हाेते. आता पुन्हा तसाच प्रकार राज्यातील काही गावांमध्ये हाेत आहे. परंतु आता काेविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतली  नसल्यास संबंधितास गावात पाऊल ठेवले दिले जात नाही. याबराेबरच संबंधितांकडून ग्रामपंचायत २०० रुपयांचा दंड  आकारात आहे.

नांदेड  जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी  या गावात लसींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्यास संबंधितांना गावाच्या वेशी बाहेर थांबविले जात आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तीने गावात प्रवेश केल्यास स्थानिक ग्रामपंचायत २०० रुपयांचा दंड ठाेठावत आहे. या निर्णयाबाबत गावातील प्रवेशद्वारावर तसेच ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.

टेंभुर्णीच्या सरपंच यशोदाबाई पाटील म्हणाल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने किमान लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे. फेरीवाले, कामगार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा एक लसीचा डाेस पुर्ण झाला नसल्यास संबंधितांस गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आमच्या गावातील लसीकरणाचा पहिला डाेस १०० टक्के पुर्ण झाला आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी जवळपास ७५ टक्के ग्रामस्थांनी दुसरा डोस घेतला आहे. काेराेनाच्या या महामारीत ग्रामस्थांची काळजी घेणे आमचे कर्तव्य असल्याने पंचायतीने कठाेर निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे असेही पाटील यांनी नमूद केले.

या गावा नजीकच्या पवनमारी गावाने देखील लसीकरण न केलेल्या लोकांवर गावात येण्यासाठी बंदी घातली आहे. याबाबत माजी सरपंच प्रल्हाद पाटील म्हणाले ग्रामस्थांनी एकमताने बंदीला पाठिंबा दिला आहे. आपल्यापैकी अनेकांनी जवळच्या नातेवाईकांवर काेविड १९ मुळे काेण काेणत्या गाेष्टी सहन कराव्या लागल्या आहेत हे पाहिले आहे. त्यातून बरे झाल्यानंतरही काही व्यक्तींना वेगवेळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोविडशी लढताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. या सगळ्याचा परिणाम पाहता गावकऱ्यांनी लसीकरण न झालेल्या व्यक्तीस गाव बंदीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

कराड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कराड नगर परिषदेच्या विविध विकास कामांचा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ  

सातारा दि. 20 :  जिल्हा वार्षिक योजनेमधून कराड नगर परिषदेला विविध विकास कामांसाठी 11.26 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज सहकार, पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, नगरसेवक राजेंद्र यादव, सौरभ पाटील,  जयंत पाटील (काका), अनिता पवार, सुभाषराव पाटील यांच्यासह विविध प्रभागांचे नगरसेवक उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत 7.10 कोटी, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा 2.80 कोटी व नागरी दलितेतर योजनेंतर्गत 1.36 कोटी असे एकूण 11.26 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. या अनुदानातून कराड शहर व वाढीव भागातील एकूण 115 कामे हाती घेण्यात येणार आहे. 115 कामांपैकी 6 कामांचा प्रतिनिधीत्व स्वरुपात भूमीपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी श्री. पाटील म्हणाले, अनुदानातून हाती घेण्यात आलेली कामे ही संपूर्ण कराड शहर व वाढीव भाग परिसरातील असून यामध्ये रस्ते डांबरीकरण करणे, छोट्या रुंदीच्या रस्यांचे कॉक्रटीकरण करणे, गटर बाधणे आदी कामांचा समावेश आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या प्राथमिक सोई-सुविधांमध्ये भर पडणार आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

रविवार, १९ डिसेंबर, २०२१

पाटण : सांबर शिकार प्रकरण - शिकारीचा वाटा न मिळाल्याने दिली टीप वन्यजीव विभागाचा छापा,पाच जणांना अटक

पाटण : सांबर शिकार प्रकरण - शिकारीचा वाटा न मिळाल्याने दिली टीप वन्यजीव विभागाचा छापा,पाच जणांना अटक 
पाटण : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मधील नाव गावात  ( ता. पाटण ) येथे काही स्थानिकांनी संगनमत करून सांबर या वन्यप्राण्यांची शिकार करून त्याचे मांस शिजवत असताना वन विभागाने टाकण्यात आलेल्या छाप्यात पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.न्यायालयाने पाचही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुप्त माहितीवरुन वन्यजीव विभागाच्या हेळवाक कार्यालयाचे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा मारून नाव गावामधील सांबर प्राण्यांची शिकार उघडकीस आणली. सांबर प्राण्यांचे मांस ज्या एका घरात शिजवले जात होते. तेथील सीताराम शेंडे , विशाल पवार , अशोक विचारे, महेंद्र जगताप , आनंद विचारे ( सर्व रा .नाव ता. पाटण ) यांना अटक करून पाटण न्यायालयत हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वन कोठडी दिली आहे.

दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खासगी जागेत अभ्यासाकरिता लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये जंगलात कोअर भागात बंदूक व लाईट टॉर्च घेऊन जाणारे शिकारी हे कॅमेराबंद झाले आहेत. ह्या लोकांची नाव उघड झाल्याची चर्चा आहे, हेळवाक, नेचल परिसरातील हे लोक सर्रास शिकार करीत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नाव गावामधील सांबर शिकार प्रकरणात सामील असलेल्या एकाला त्याचा योग्य वाटा न मिळाल्याने त्याने ही खबर वन्यजीव विभागास दिली आणि हा गंभीर गुन्हा उघड झाला आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासकार्यात मा.उत्तम सावंत (उपसंचालक सहयाद्री व्याघ्र राखीव) मा.तुषार ढमढेरे (स.व.सं चांदोली) यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल श्री.संदीप जोपळे,वनक्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे,वनपाल /वनरक्षक हेळवाक सहभागी झाले होते

सातारा : केंद्र शासनाकडील योजनांसाठी आवश्यक तो निधी आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार -खासदार श्रीनिवास पाटील *जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न*

सातारा : केंद्र शासनाकडील योजनांसाठी आवश्यक तो निधी आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार -खासदार श्रीनिवास पाटील 

*जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न*

 सातारा दि. 18 : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाली.

 यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ शिक्षण व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई,  विविध विभागाचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.

 यावेळी खासदर श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे. केंद्र शासनाकडील योजनांसाठी आवश्यक तो निधी आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी स्वरुपात लवकरात लवकर निवेदन द्यावीत. विशेषत: रस्ते, वीज, पाणी याबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
 

यावेळी  जिल्ह्यात केंद्र शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न मांडले. 

शनिवार, १८ डिसेंबर, २०२१

ढेबेवाडी : वांगनदी पात्रात सापडला मृतदेह शिद्रुकवाडीतील युवकाचा

ढेबेवाडी : वांगनदी पात्रात सापडला मृतदेह शिद्रुकवाडीतील युवकाचा

ढेबेवाडी : सुमारे १० दिवसापूर्वी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या शिद्रुकवाडी(गुढे) ता.पाटण येथील नथुराम मोहन पाटील वय ३३ यांचा आज दि.१८ रोजी 9 वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी जवळील वांग नदीच्या पुलाजवळ मृतदेह पाण्यावरती तरंगत असलेला सापडला.या घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली असून ,ढेबेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिद्रुकवाडी(गुढे) ता पाटण येथील नथुराम पाटील वय 33 हे गेल्या 10 दिवसापूर्वी बेपत्ता झाले होते.याची तक्रार त्यांचे दाजी सचिन चव्हाण यांनी ढेबेवाडी पोलिसांना दिली होती,त्यावरून पोलीस तपास करत होते.आज शनिवार दि.१८/१२/२०२१ रोजी ढेबेवाडी पुलाजवळ अज्ञान व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगत असलेला अनेक लोकांनी पाहिले,तेथे लोकांनी गर्दी केली होती.या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले,त्यांनी 10 दिवस बेपत्ता असलेल्या नथुराम पाटील यांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले.यावेळी नथुराम पाटील यांचे दाजी सचिन चव्हाण यांनी सदर व्यक्तीचा मृतदेह पाहिला व सदर व्यक्ती नथुराम पाटील आहेत अशी माहिती दिली.घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिसात झाली असून तपास स.पो.नि. संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेळके,शेवाळे करत आहेत.

सातारा : कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम प्रशंसनीय – पालकमंत्री बाळासाहेब पाटील आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार वितरण सोहळा

सातारा : कोरोना काळात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम प्रशंसनीय – पालकमंत्री बाळासाहेब पाटील

आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार वितरण सोहळा

सातारा दि. 18 (जिमाका) : कोरोना काळात आपल्या सर्वांना  एकत्रित येता येत नव्हते. याकाळातच अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अतिशय चांगले काम केले त्यामुळे आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. तसेच कोरोना काळात जिल्हा कोरोनामुक्ती करण्यास अंगणवाडी सेविकांचे काम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा जिल्हा परिषद,  महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार वितरण सोहळा श्री. पाटील यांच्या  हस्ते  स्व. यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी खासदार  श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते,  महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. सोनाली पोळ,  अर्थ शिक्षण व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे,  मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय गौडा आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविकांना गावातील प्रत्येक कुटुंबाची इत्यंभूत माहिती असते गावातील बाळांना व गरोदर मातांना स्वच्छतेबाबत, बालकांच्या पोषण व आरोग्याविषयक सुधारणा घडवून आणण्यासाठी मदत करीत असतात. बालकांच्या योग्य शारिरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालण्याचे काम या सेविका करीत असतात.

कोरोना काळात व इतर काळातही सेविकांचे काम चांगले होते. म्हणून आज आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. ज्यांना आज पुरस्कार मिळाले त्यांचे अभिनंदन व ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत त्यांनी या सेविकांचे आदर्श घेऊन चांगले काम करावे. सातारा जिल्हा परिषद नेहमीच विविध अभियानात चांगले काम  करीत असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, अंगणवाडी सेविका या सावित्रीच्या लेकी असून कोरोना काळात यांनी खरी समाजसेवा केली आहे. पोषण आहारातही  जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. अंगणवाडी सेविकांनी चांगले काम करण्यासाठी  प्रोत्साहन देण्यासाठी  तुमचा गुणगौरव सोहळा करीत आहोत.

यावेळी श्री. विनय गौडा म्हणाले, अंगणवाडी सेविका गावातील महत्त्वाचा घटक आहे. गरोदर माता व बालक यांचे पोषण व आरोग्य विषयक काम करीत असतात. कोरोना काळातही या सेविकांनी उल्‌लेखनीय काम केले आहे.

यावेळी  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे,  अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि त्यांचे नातेवाईक आदि उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकूण 108 आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन 2019-20 व 2020-2021 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला तसेच कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या वारसांना विमा कवच सानुग्रह सहायय अनुदान रक्क्म रुपये 50 लक्ष धनादेशाचे वितरण करण्यात आले.

*कराड : कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे - पृथ्वीराज चव्हाण* *विराट चव्हाणच्या कुटुंबियांचे आ. चव्हाण यांच्याकडून सांत्वन*

*कराड : कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे - पृथ्वीराज चव्हाण* 

 *विराट चव्हाणच्या कुटुंबियांचे आ. चव्हाण यांच्याकडून सांत्वन* 
 *कराड :* बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली. विराट चव्हाण चा मृत्यू झाला त्यावेळी आ. चव्हाण बाहेरगावी होते, काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करीत सांत्वन केले. पालिकेच्या हलगर्जी पणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी बाबांच्या निदर्शनास आणले. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षात अश्या 11 घटना घडल्या असल्याच्या तक्रारी बाबांना उपस्थित नागरिकांनी केल्या, यावर आ. चव्हाण यांनी चिंता व्यक्त करीत मुख्याधिकारींना या गंभीर विषयाबाबत फोन करून जे ठेकेदार त्यांच्या कामात हलगर्जी करतात अश्याना ब्लॅकलिस्ट करावे अश्या सूचना दिल्या. नागरिकांच्या तक्रारीबाबत पालिकेने सतर्क असण्याची गरजही यावेळी आ. चव्हाण यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, रमेश वायदंडे, ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदिसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियान : पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल -सरपंच रवींद्र माने

 माझी वसुंधरा अभियान : पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल -सरपंच रवींद्र माने
 मान्याचीवाडी ता.पाटण येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी सायकल रॉली काढून जनजागृती केली. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी या रॉलीत सायकलसह सहभागी झाले होते. व्रक्षलागवड, व्रक्षसंवर्धन, पाण्याचा वापर, अपारंपारिक ऊर्जा वापर, घनकचरा व्यवस्थापन, हरीत अच्छादन, सांडपाणी व्यवस्थापन, जैवविविधता आदिंबाबत या सायकल रॉलीतून  ग्रामस्थांमध्ये प्रबोधन केले. 
यावेळी सरपंच रवींद्र माने, ग्रामसेवक प्रसाद यादव, दूध संस्थेचे चेअरमन सर्जेराव माने, मुख्याध्यापक किशोर बनसोडे, के.एस. खर्डे  आदिंची उपस्थिती होती. सरपंच माने यांनी पर्यावरणाचा र्हास होऊ नये यासाठी गावात विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्यावे असे सांंगून पर्यावरण वाचले तरच गाव वाचेल  म्हणूनच व्रक्षसंवर्धन गरजेचे असल्याचे सांगितले.  वसुंधरा अभियान अंतर्गत अग्नी, वायू, जल, प्रथ्वी आणि आकाश या पंचतत्वांबाबत विद्यार्थी आणि ग्रामस्थांना माहीती देऊन
 हे अभियान यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले.


शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१

MPSC : मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा,परीक्षेची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी

मुंबई दि17:  कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

या शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक, या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी देखील “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे. मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन करण्यात आलेले नाही, अशा प्रकरणी देखील दि. ०१ मार्च, २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन दि. २५.०४.२०१६ च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे. अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब” म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.

*सातारा : अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन*

अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता अर्ज करण्याचे आवाहन
सातारा, दि. 17 : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर दि.१४ डिसेंबर २०२१ पासून कार्यान्वीत झाले असून, https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरिता सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता विद्यार्थ्यांनी आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करुन हा अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करुन महाविद्यालयांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचेकडे मान्यतेस्तव सादर करावा.

तसेच सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अर्ज सादर करणे व नूतनीकरण करणेसाठी ३१ जानेवारी, २०२२ ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून या तारखेत कोणतीही वाढ करण्यात येणार नाही. याची नोंद घेण्यात यावी,असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, नितीन उबाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

*वाझोली ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा युवा नेते रविराज देसाई यांच्या हस्ते संपन्न*

वाझोली ग्रामपंचायत नूतन कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा युवा नेते रविराज देसाई यांच्या हस्ते संपन्न

कुमजाई पर्व प्रतिनिधी -मनोज सावंत
वाझोली .ता पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन तालुक्याचे विकास कामाचे महामेरू राज्याचे गृहराज्यमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांच्या  विशेष प्रयत्नातु मिळालेल्या 10 लाख रुपये मंजुरीचे काम हे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री रविराज देसाई (दादा)यांच्या शुभहस्ते व पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले .
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना वाझोली गावचे शिवसेना शाखा प्रमुख आनंदा मोरे यांनी 
मा.नामदार साहेबांच्या  माध्यमातून वाझोली,डाकेवाडी,व सलतेवाडी.या तीन्ही गावात कोट्यावधींची  विविध विकासकामे पुर्ण झाली आहे.येणाऱ्या काळातसुद्धा मा.नामदारसाहेबांच्या माध्यमातून  प्रलंबित असणारी विकास कामे पुर्ण करुन वाझोली हे गाव विकासाचे आदर्श गाव बनवु.मा.नामदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहु अशी ग्वाही त्यांनी दिली.
         आज भूमिपूजन झालेल्या वाझोली ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे काम दर्जेदार करावे,कारण गावची सर्व विकासकामे जेथुन केली जातात ,तो महत्त्वाचा केंद्रबिंदु असलेली ग्रामपंचायत ही इमारत चांगली होणे गरजेचे असून वाझोली गावामध्ये या पुढेही ना.शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून होतील असे रविराज देसाई यांनी संभोधले.
          वाझोली गावच्या एकजुटीची पहिल्यापासून काळगाव गणामध्ये वेगळी ओळख असून कायम व सतत वाझोली गावाने ना.गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ,विधानसभा निवडणुकीमध्ये वाझोली या गावाने चांगल्या प्रकारचे मताधिक्य दिले असल्याचे पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई  यांनी वक्तव्य केले 
           या वेळी पंचायत समिती काळगाव  गणाचे सदस्य श्री पंजाबराव देसाई (तात्या) शिवसेना तालुका प्रमुख राजेश चव्हाण ,शंभुराज देसाई साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते व मर्चंट सिंडिकेट संस्था तळमावले येथील चेअरमन श्री अनिल शिंदे साहेब,सागर नलवडे शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील गावचे सरपंच शितल लोहार,उपसरपंच सविता मोरे,गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अशोक मोरे,आनंदा मोरे तंटामुक्ती अध्यक्ष वसंत पाटील ,सदस्य सुशीला मोरे, रमेश लोहार सदाशिव शेलार,शिवाजी मोरे,जयवंत मोरे सूर्यकांत मोरे,धनाजी मोरे,ग्रामसेविका स्वाती माळी व पोलीस पाटील विजय सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. तरी कार्यक्रमाचे आभार आनंदा मोरे यांनी केले.

*नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदानस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका*

नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका

मुंबई, दि. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर 2021 ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

 

श्री. मदान यांनी सांगितले, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजितपणे सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार आता नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या  जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित केल्याने आता त्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्या आहेत. त्यामुळे या जागांपैकी सर्वसाधारण महिलांकरिता आरक्षित ठेवावयाच्या जागांसाठी संबंधित ठिकाणी सोडत काढण्यात येईल.

कराड : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे-सारंग पाटील

कराड : विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे-सारंग पाटील
कराड: प्रतिनिधी
उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष व श्रीनिवास पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील यांनी केले.
    कराड येथे श्रीनिवास पाटील फाउंडेशन व सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने 'कर हर मैदान फतेह' या व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन राजमाने, फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ.रचना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    सारंग पाटील म्हणाले, कॉलेजमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यातील स्वप्ने पाहत असतो. मात्र उत्तम करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यक्तिमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य अंगीकृत करता आले पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यार्थ्यांचे अंतिम शिक्षण नसून ते एका व्यावसायिक क्षेत्राच्या प्रारंभ असला पाहिजे. नोकरी व व्यवसाय करत असताना आपण इतरांसोबत कसा संवाद करतो यावर प्रामुख्याने अनन्यसाधारण महत्व दिले जाते. कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी आपण एक चांगली व्यक्ती होणे महत्वाचे आहे. आपण व्यवसायाकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहतो. श्रीमंत व्हावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, त्याद्वारेच आपण सुखी व आनंदी होतो असा ठाम विश्वास असतो. परंतु विद्यार्थ्यांची श्रीमंती पैशांपेक्षा त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी आपली कामे स्वतः करावीत, दिवसभर मेहनत करावी म्हणजे रात्री शांत झोप लागते, आपले कार्य एवढे उठावदार पाहिजे की, आपली अनुपस्थिती इतरांना जाणविली पाहिजे. समाजाने आपले कौतुक व गौरव केला पाहिजे, समाजाला आपल्या कर्तृत्वाबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आपले जीवन स्वतःच्या आनंदासाठी जगावे, आपल्या दुःखाबद्दल सहानुभूती न मागता इतरांचे दुःख हलके केले पाहिजे तोच व्यक्ती ख-या अर्थाने श्रीमंत असतो.
    दरम्यान सौ.रचना पाटील यांनी त्यांच्या व्यक्तिमत्व विकास, मानसोपचार, मनुष्यबळ विकास क्षेत्रातील गेल्या 25 वर्षाच्या अनुभवाच्या आधारे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी लागणारी संभाषण कौशल्ये, अभिव्यक्ती याबाबत त्यांनी अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या.
     कार्यशाळेस प्रा.नेताजी सुर्यवंशी, डॉ.रामचंद्र व्हनबट्टे, डॉ.कोमल कुंदप, डॉ.प्राजक्ता निकम, महाविद्यालयाचे अन्य प्राधापाक, कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...