नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील टेंभुर्णी या गावात लसींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी ग्रामपंचायतीने कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतली नसल्यास संबंधितांना गावाच्या वेशी बाहेर थांबविले जात आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तीने गावात प्रवेश केल्यास स्थानिक ग्रामपंचायत २०० रुपयांचा दंड ठाेठावत आहे. या निर्णयाबाबत गावातील प्रवेशद्वारावर तसेच ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
टेंभुर्णीच्या सरपंच यशोदाबाई पाटील म्हणाल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने किमान लसीचा एक डोस घेणे आवश्यक आहे. फेरीवाले, कामगार किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचा एक लसीचा डाेस पुर्ण झाला नसल्यास संबंधितांस गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आमच्या गावातील लसीकरणाचा पहिला डाेस १०० टक्के पुर्ण झाला आहे. पात्र लाभार्थ्यांपैकी जवळपास ७५ टक्के ग्रामस्थांनी दुसरा डोस घेतला आहे. काेराेनाच्या या महामारीत ग्रामस्थांची काळजी घेणे आमचे कर्तव्य असल्याने पंचायतीने कठाेर निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे असेही पाटील यांनी नमूद केले.
या गावा नजीकच्या पवनमारी गावाने देखील लसीकरण न केलेल्या लोकांवर गावात येण्यासाठी बंदी घातली आहे. याबाबत माजी सरपंच प्रल्हाद पाटील म्हणाले ग्रामस्थांनी एकमताने बंदीला पाठिंबा दिला आहे. आपल्यापैकी अनेकांनी जवळच्या नातेवाईकांवर काेविड १९ मुळे काेण काेणत्या गाेष्टी सहन कराव्या लागल्या आहेत हे पाहिले आहे. त्यातून बरे झाल्यानंतरही काही व्यक्तींना वेगवेळ्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे. कोविडशी लढताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत. या सगळ्याचा परिणाम पाहता गावकऱ्यांनी लसीकरण न झालेल्या व्यक्तीस गाव बंदीला पूर्ण पाठिंबा दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा