पाटणचा पुढचा ‘सत्ता कर्णधार’ कोण? सभापती-उपसभापतीपदावरून जोरदार चर्चा!
पाटण - पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तालुक्यातील १४ गणांपैकी तब्बल १३ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने स्पष्ट बहुमत सिद्ध केले, तर केवळ १ सदस्य भाजपाकडून निवडून आला आहे. या भक्कम जनादेशानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांकडे.
🔶 सभापतीपदासाठी ‘सर्वसाधारण महिला खुला’ आरक्षण
यंदा पंचायत समिती सभापतीपदासाठी सर्वसाधारण महिला (खुला) प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील निवडून आलेल्या महिला सदस्यांमध्ये चुरस वाढली आहे.
सभापतीपदाच्या शर्यतीत पुढील नावे चर्चेत आहेत –
- विद्या शिंदे (येराड गण)
- सविता पवार (मुरूड गण)
- अर्चना पाटील (मल्हारपेठ गण)
- प्रियांका देसाई (मारूल हवेली गण)
या चारही सदस्यांनी आपल्या-आपल्या गणात भक्कम विजय मिळवत संघटन कौशल्य आणि जनसंपर्काची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार? याबाबत तालुक्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी आणि पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🔷 उपसभापतीपदासाठी सचिन यादव आघाडीवर?
दरम्यान, उपसभापती पदासाठी ढेबेवाडी विभागातील कुंभारगाव गणातून निवडून आलेले सचिन यादव यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. स्थानिक स्तरावर त्यांना व्यापक पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. संघटन बांधणी आणि कार्यकर्त्यांशी सलोखा यामुळे त्यांचे नाव पुढे येत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
तालुक्याचे लक्ष एका निर्णयाकडे
पाटण तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले असले तरी सभापती आणि उपसभापतीपदासाठी कोणाची वर्णी लागणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ही निवड केवळ पदाची नसून, पुढील पाच वर्षांच्या सत्तेच्या समीकरणांची दिशा ठरवणारी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि हालचाली वाढल्या आहेत.
अंतिम शिक्कामोर्तब कोणाच्या नावावर होते आणि पाटण पंचायत समितीच्या सत्तेचा कारभार कोणाच्या हाती जातो!हे थोड्या दिवसात स्पष्ट होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा