पाटण तालुक्यात सत्तासंग्राम! पाटणकर विरुद्ध देसाई—जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत कोणाची होणार सरशी?
साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज -
पाटण तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची लढाई राहिलेली नाही, तर ती थेट राजकीय प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची निर्णायक कसोटी बनली आहे. 2017 च्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत 7 पैकी 4 आणि पंचायत समितीत 14 पैकी 8 जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाटणकर गटाने सत्ता काबीज केली होती. त्या वेळी विरोधी शिवसेना ना. देसाई गटाला अनुक्रमे 3 आणि 6 जागांवर समाधान मानावे लागले होते.
मात्र, आता चित्र बदलले आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. सत्तेचा प्रभाव, प्रशासनावरील पकड आणि संघटनात्मक ताकद वापरली जाईल, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. परिणामी, ही निवडणूक अधिकच कडवी आणि आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
दुसरीकडे, ना. शंभूराज देसाई मंत्री झाल्यानंतर होणारी ही पहिलीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक असल्याने ती देसाई गटाच्या राजकीय प्रतिष्ठेची परीक्षा ठरणार आहे. तालुक्यात अपवाद वगळता बहुतांश काळ सत्ता पाटणकर गटाकडेच राहिलेली आहे. 2014 ते 2024 या कालखंडात विधानसभेतील चढ-उतार असूनही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील वर्चस्व पाटणकर गटाने टिकवून ठेवले, ही वस्तुस्थिती आहे.
आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. राज्यातील सत्तासंरचना, भाजपचे वाढते बळ, मंत्रीपदाचा प्रभाव आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी—या साऱ्यांचा थेट सामना पाटणकर गटाला करावा लागणार आहे. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली जाते, कोणत्या रणनिती आखल्या जातात आणि स्थानिक प्रश्नांवर कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचेच नव्हे तर राज्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
यंदा अनेक इच्छुकांनी मैदानात उडी घेतल्याने उमेदवारीवरूनही मोठी चुरस पाहायला मिळाली. गावागावात ध्रुवीकरण, विकास विरुद्ध वर्चस्व, सत्ता विरुद्ध संघटन असे मुद्दे रंगात येत आहेत.
पाटणकर गट पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करणार की देसाई गट सत्तेचा किल्ला सर करणार?
पाटण तालुक्यातील हा सत्तासंग्राम आता अंतिम टप्प्याकडे जात असून, “कोण बाजी मारणार?” याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा