भाजपमध्ये अंतर्गत खळबळ! कविताताई कचरे यांचा बंडखोरीचा सूर – अन्यायाविरोधात अपक्ष मैदानात, काळगाव-कुंभारगाव गणात राजकीय भूकंप!
तळमावले प्रतिनिधी कुमजाई पर्व प्रतिनिधी |
काळगाव-कुंभारगाव जिल्हा परिषद गणात राजकीय वातावरण तापले असून भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सौ. कविताताई कचरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत थेट बंडाचा झेंडा फडकावला आहे. पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या कविताताईंनी सोशल मीडियावर केलेली भावनिक पण ठाम पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
“आता मनात विचार आलाय, खरंच माझी समाजसेवा अजमावून पहायची… तुमची साथ असेल तर मी अपक्ष. पैसा नाही देऊ शकणार, पण तुमच्यासाठी वेळ आहे; तुमची जबाबदारी घेईन,” अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडत पक्षाकडून आपल्यावर अन्याय झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून कविताताई कचरे या परिसरात समाजसेवेचे भक्कम काम करत आहेत. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणे—या साऱ्या कामांमुळे त्या जनसामान्यांत लोकप्रिय आहेत. विशेषतः तळमावले येथील दारूबंदी आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात गाजले होते, हे त्यांच्या सामाजिक नेतृत्वाचे ठळक उदाहरण मानले जाते.
कविताताईंनी भारतीय जनता पार्टी उभारण्यासाठी मोठ्या संघर्षातून वाटचाल केली, अनेक अडचणी सोसल्या; मात्र आज पक्ष सत्तेत असताना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्या प्रचंड नाराज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. “काळगाव-कुंभारगाव जिल्हा परिषद गणात मीच प्रमुख दावेदार होते. पक्षाने तिकीट दिले नाही म्हणूनच मी अपक्ष अर्ज भरला आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे न घेता कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा त्यांचा ठाम विचार असल्याचे संकेत मिळत आहेत. परिसरातील कार्यकर्ते, महिला संघटना व समर्थक यांच्याशी त्या सातत्याने संपर्कात असून स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे चित्र आहे.
या घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टीत अस्वस्थता पसरली असून काळगाव-कुंभारगाव गणात समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कविताताई पुढे कोणता निर्णय घेतात, अपक्ष म्हणून कितपत ताकद दाखवतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
एकूणच, ही उमेदवारी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार की नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरणार—हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा