शनिवार, २४ जानेवारी, २०२६

पाटण तालुक्याच्या सत्तेची चावी ‘परगावच्या मतदानात’! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत निर्णायक ठरणार स्थलांतरित मतदार.



पाटण तालुक्याच्या सत्तेची चावी ‘परगावच्या मतदानात’! जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत निर्णायक ठरणार स्थलांतरित मतदार.

पाटण तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीने चांगलेच रणांगण पेटले असून, सध्या परगावचे मतदान निर्णायक ठरणार अशी जोरदार चर्चा गावोगावी रंगू लागली आहे. ही चर्चा केवळ अफवा नसून, त्यामागे ठोस वास्तव दडलेले आहे.

पाटण तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील जनता मुंबई, पुणे तसेच इतर औद्योगिक शहरांमध्ये कामधंद्यानिमित्त वास्तव्यास आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष गावात राहणाऱ्या मतदारांपेक्षा परगावी राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. काही गावांत तर “गावातील अर्ध्याहून अधिक मतदान परगावचे आहे” असे म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही.

यंदाची निवडणूक विशेषतः काट्याची टक्कर म्हणून ओळखली जात असून,
काळगाव – कुंभारगाव गण आणि मंदुळकोळे गणातील काही गावे सध्या मतदारांशिवाय ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बहुतांश कुटुंबे रोजगारासाठी स्थलांतरित झाल्याने गावात फक्त ज्येष्ठ नागरिक आणि काही कुटुंबे शिल्लक राहिली आहेत.

त्यातच निवडणुकीचा कळीचा मुद्दा म्हणजे —
मतदान गुरुवार, दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच चालू कामकाजाच्या दिवशी होणार आहे.

यामुळे परगावी नोकरी-धंद्यात असलेल्या मतदारांना मतदानासाठी गावी आणणे हे उमेदवारांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. सुट्टीच्या दिवशी मतदान असते, तेव्हा घरातील सर्व मतदार हमखास गावी येतात; मात्र यंदा तसे चित्र नाही.
कामाचा खडा करून, खर्च उचलून, नियोजन करून मतदारांना गावी आणणे — हेच यंदाच्या निवडणुकीतील ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.

राजकीय जाणकारांच्या मते,
जो उमेदवार किंवा पक्ष परगावच्या जास्तीत जास्त मतदारांना मतदानासाठी गावी आणण्यात यशस्वी ठरेल, त्याचीच ‘नैका पार’ होणार आहे.
कारण अनेक गावांतील स्थानिक राजकारण हे प्रत्यक्षात मुंबई–पुण्यात राहणाऱ्या गावकऱ्यांच्या हातात असल्याचे वास्तव आहे.

त्यामुळे सध्या उमेदवारांचे फोन कॉल, भेटीगाठी, संघटनात्मक हालचाली, वाहनांची व्यवस्था, आर्थिक गणिते — सगळे काही परगावच्या मतदारांभोवतीच फिरताना दिसत आहे.

एकूणच, पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही ‘गावात नव्हे, तर परगावात ठरणार’ अशीच चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
आता शेवटच्या क्षणी कोण किती मतदार गावी आणतो, यावरच तालुक्याचे सत्तासमीकरण ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

साताऱ्यात भाजपचा ‘कमळ’ धमाका; राजकीय समीकरणांना मोठा धक्का!विजय तळमावले येथे जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून तब्बल महिना उलटून गेला तरी जिल्ह्यात सत्ता कोणाची येणार, अध्यक्षपदी कोण विराजमान होण...