विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार!- शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन
पाटणमध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदानाच्या रूपात देण्याचे शंभूराज देसाई यांचे आवाहन
मल्हारपेठ नाडे विभागाचा संवाद मेळावा संपन्न.
" साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज "
मल्हारपेठ बुधवार, दि. २४ ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत मल्हारपेठ विभागामध्ये बुधवारी शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी विरोधकांकडे विरोध करण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत, तसेच त्यांचे 'फेक नॅरेटिव्ह' खोडून काढण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले. तसेच विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असून पाटणमध्ये केलेल्या विकास कामांची पोचपावती मतदानाच्या रूपात देण्याचे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी मतदारांना केले.
पाटण विधानसभा मतदारसंघातील मल्हारपेठ व नाडे विभागातील कार्यकर्त्यांचा बुधवारी ना.शंभूराज देसाई यांचा जाहीर संवाद मेळावा मल्हारपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर.बी.पवार, विश्वनाथ पानस्कर, विजय पवार,किरण दशवंत, सुनील पानस्कर, विजय शिंदे, अशोक डिगे,पांडरंग नलवडे,शशिकांत निकम,राजकुमार कदम,सुनील पानस्कर,विजयराव देशमुख,पांडूरंग शिरवाडकर,उत्तमराव मोळावडे,प्रकाश पवार,नाथा जाधव,विजय सरगडे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत ना.शंभूराज देसाई यांच्या विक्रमी मतांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. तसेच यावेळी मल्हारपेठ विभागातील मातंग समाजातील कार्यकर्ते बंधू-भगिनींनी ना.शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे दाखले माझे कार्यकर्ते मतदारांना देतील. तसेच वाड्यामध्ये अडकलेली आमदारकी सर्वसामान्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न माझ्या रूपाने पाटणवासियांनी केला. गेल्या पाच वर्षांत ०२ हजार ९10 कोटी रुपयांची कामे पाटण विधानसभा मतदारसंघात केल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. पाटणवासियांच्या अडचणीच्या काळात विरोधक कुठेही फिरकले नाहीत आणि आता निवडणुकीच्या काळात ते सर्वांच्या दरवाज्यावर जाताहेत. ज्या ग्रामपंचायतीमधून माझ्यावर त्यांनी टिका केली, ती ग्रामपंचायतसुद्धा आता त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही,अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी पाटणकरांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.
तसेच आम्ही विकासकामांमध्ये कधीही
गटातटाचे राजकारण केले नाही. पाटणमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात
रूपांतर केले. पाटणमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्राची मंजुरी घेतली असून, लवकरच
त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी उपस्थितांना
दिली. पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक
लढवण्याचा निर्धार शंभूराज देसाई यांनी प्रसंगी बोलून दाखवला आणि विकासाला मतदान
करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.