सोमवार, ५ जुलै, २०२१

सणबुर : उधवणेचा रवी साळुंखे रंगवतोय मुघलांचा ‘म्होरक्या’

सणबुर : उधवणेचा रवी साळुंखे रंगवतोय मुघलांचा ‘म्होरक्या’

तळमावले/संदीप डाकवे
पाटण तालुक्यातील सणबूर (उधवणे) येथील रवि साळुंखे ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत मुघलाच्या म्होरक्याची भूमिका साकारत आहे. आतापर्यंत दोन डझनहून अधिक मालिकेत भूमिका साकारलेल्या आहेत. या मालिकेचे प्रक्षेपण स्टार प्रवाह या वाहिनीवर 26 जुलै पासून रात्री 10 वाजता होणार आहे.
पाटण तालुक्यातील सणबूर (उधवणे) येथील रवि साळुंखे या युवकाने चंदेरी दुनियेत जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आता हळूहळू पूर्ण होत असल्याचं दिसत आहे. चित्रपट सृष्टीतील झगमगत्या वातावरणाचं आणि सेलिब्रिटींचं तसं सर्वानाच आकर्षण असते. आता याच सेलिब्रिटीमध्ये एक नवीन नाव जावू पाहत आहे ते म्हणजे रवि साळुंखे याचे.
सिनेसृष्टीतील चंदेरी दुनियेत येण्यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द, संयम इ.गोष्टी असाव्या लागतात. या गोष्टी आत्मसात करत अभिनयातील बारकावे शिकत आज रवि अभिनयाच्या क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करु पाहत आहे. हे विशेष आहे.
उधवणे सारख्या ग्रामीण भागातील या युवकाने आतापर्यंत सुमारे 24 पेक्षा जास्त मालिकांमध्ये आपल्या छोटेखानी भूमिकेतील अभिनयाची  चुणूक दाखवली आहे. रविचे कुटूंब शेतकरी असल्यामुळे त्याच्या घरामध्ये कोणताही कलेचा वारसा नाही. त्यामुळे रविचे हे वेगळया क्षेत्रातील जाणे सर्वांनाच भारावून जात आहे. रविला लहानपणापासूनच या क्षेत्राची ओढ होती. त्याचे बालपण आणि शालेय शिक्षण हे सणबूर या ठिकाणीच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी व पुढील वाटचालीसाठी त्याने मुंबई गाठली आणि सिनेसृष्टीत नशीब आजमावयला सुरुवात केली. अत्यंत खडतर परिस्थितीतून तो आज यश मिळवत आहे.
या क्षेत्रातील आवडीमुळे तो शाळेत असल्यापासूनच सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा मध्ये सहभाग घेत होता. त्याला भोई सर यांचे याकामी विशेष मार्गदर्शन लाभले. भाऊ श्रीकांत साळुंखे, आई सौ.नयना साळुंखे आणि वडील माजी सरपंच पांडूरंग साळुंखे यांचा नेहमी पाठिंबा मिळाला.
रविने आतापर्यंत लागीर झालं जी, भेटी लागी जीवा, फुलपाखरु, हे मन बावरे, वर्तुळ, सहकुटूंब सहपरिवार, देवमाणूस, अगं बाई सासू बाई, येवू कशी तशी मी नांदायला, साजना, स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता, विठू माऊली, श्री गुरुदेव दत्त, एक होती राजकन्या, मिसेस मुख्यमंत्री, मुलगी झाली हो, माझ्या नवÚयाची बायको, मोलकरीन बाई, या मालिकांसह अनेक नाटकांमध्ये कामे केली आहेत. याशिवाय एक नवीन हिंदी चित्रपट देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.
मालिकेतील अनेक दिग्गज कलाकारांसमवेत त्याने काम केले आहे. रविला व्यायामाची खूप आवड आहे. स्वतःला काही बनायचे असेल तर नियमित व्यायाम  करणे गरजेचे असल्याचे मत रवि साळुंखे यांनी व्यक्त केले आहे. तसेच रवी कोणत्याही कामाला कमी लेखत नाही. फावल्या वेळेत तो रिक्षादेखील चालवण्याचे काम करतो. हा आदर्श तरुणांनी घेणे गरजेचे आहे. भविष्यात रवि आपल्या अभिनयाचा ठसा उमटवेल यात शंकाच नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...