तळमावले : अनेक गावांत पथदिवे विजले ढेबेवाडी ,तळमावले परिसर अंधारात :जनतेत असंतोष
मनोज सावंत /तळमावले
महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतमधील असणाऱ्या पथदिवांचे बिल न भरले गेल्याने अशा बहुतांश ग्रामपंचायतीच्या पथदिवांची वीज जोडणी खंडित केली गेली आहे.
ढेबेवाडी ता.पाटण : पाटण तालुक्यातील कित्येक गावांतील पथदिवांची (street lights) बत्ती गुल करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरु झाल्याने जनतेमध्ये या कार्यवाहीविरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष असून लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष घालून संबंधित विषयावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात येत आहे. महावितरणकडून प्रत्येक ग्रामपंचायतमधील असणाऱ्या पथदिवांचे बिल न भरले गेल्याने अशा बहुतांश ग्रामपंचायतीच्या पथदिवांची वीज जोडणी खंडित केली गेली आहे.२३ जून २०२१ च्या ग्रामविकास विभागाकडून एक शासन निर्णय जारी करण्यात आला. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपापल्या १५ वा वित्त आयोगातील असणाऱ्या रकमेतून पथदिवांचे थकीत बिल भरावे, असे सूचित करण्यात आले आहे, त्यानुसार महावितरणने ग्रामपंचायतींना बिले भरण्यास सांगितले. ढेबेवाडी विभागात 1कोटी 66 लाख रुपयांची तर तळमावले विभागात 70 लाख रुपयांची बिले थकीत आहेत. परंतु, ग्रामपंचायतींनी बिल भरण्यास नकार दिल्याने पथदिवांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. कोरोना सारख्या रोगाशी प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामकृती दल तथा प्रत्येक नागरिक आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झगडतोय, पण अचानक ग्राम विकास विभागाकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महावितरणकडून गावातील पथदीपांची बत्ती गुल करण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष द्यावे
कोरोना बाधित मोठया प्रमाणात गावोगावी मिळताहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेतच, त्यामध्ये आता महावितरणकडून केलेल्या कारवाईमुळे ठेचा खात, वाट शोधत ग्रामस्थांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय उपचार करायला जावे लागत आहे. जनतेच्या या सर्व होणाऱ्या गैरसोयी बद्दल लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने या विषयात लक्ष देऊन गावागावांतील पथदीप तात्काळ कसे सुरु होतील, या साठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याची गरज आहे. जनतेच्या जीवनात आदीच कोरोनासारख्या महामारीमुळे अंधार पसरला आहे. निदान रस्त्यावरचा दिवा पेठवून रोजच्या जीवनात प्रकाश पडावा, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.
अतिशय तोकडा निधी; ग्रा. पं. चा बिल भरण्यास नकार
मुळात १५ वित्त आयोगातील असणारी रक्कम कश्या प्रकारे वितरित करायची, यातच मोठया प्रमाणात संभ्रम असतानाच पथदिवांचे थकीत बिल १५ वित्त आयोगामधून भरा, असे सांगितल्याने प्रत्येक ग्रामपंचायतींनी बिल भरण्यास नकार दिला आहे, तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीला अतिशय तोकडा निधी प्राप्त होतो आणि त्यामधूनच जर पथदिवांची थकीत देणी भागावायची झाली तर गावचा विकास करायचा कसा -
राजेंद्र चव्हाण (उपसरपंच -कुंभारगाव)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा