तळमावले / वार्ताहार
पाटण तालुक्यातील तळमावले विभागात युरिया खताची तीव्र— टंचाई निर्माण झाली आहे. याचाच फायदा उचलत काही विक्रेते युरियाबरोबर इतर खत, औषधे घेण्याची सक्ती करीत शेतकर्यांची कोंडी करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
कृषी विभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा, तसेच संबंधित दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकर्यांमधून होत आहे. मका बरोबरच ऊस व इतर पिकांना युरियाची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कृषी केंद्रात जाऊन युरियाबाबत विचारणा करीत आहेत. परंतु, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.परिणामी नाईलाजास्तव चढ्या दराने किंवा इतर रासायनिक खत, औषधासह युरिया खरेदी करावा लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे.
अशी केली जातेय लूट
गेले काही दिवसांपासून युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकर्यांकडून एका गोणीमागे 30 ते 40 रुपये ज्यादा वसूल केले जात आहेत. तसेच, अनेक दुकानदार युरियासोबत इतर रासायनिक खते, औषधे घेण्याची सक्ती करीत आहेत. कोणी किमतीवरून वाद घातल्यास विक्रेते युरिया उपलब्ध नाही, आम्ही विकत नाही, असे सांगत आहेत.
खत विक्रेते म्हणतात...
खरीप हंगामात युरियाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने कंपन्यांकडूनही युरिया खरेदी करताना इतर रासायनिक खतांची लिंकिंग होत आहे. त्यामुळे युरिया खरेदी करून स्वतंत्र विक्री करणे परवडत नसल्याचे कृषी सेवा केंद्राकडून सांगितले जात आहे.
कृषी अधिकारी करणार कारवाई?
कृषी विभागाचा अंकुश नसल्याने शेतकर्यांची आर्थिक लूट होत असून, कृषी विभागाने युरिया टंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकर्यांना पुरेसा साठा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. याबाबत कृषी अधिकारी प्रशांत शिंदे यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधला असता संबंधित दुकानांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा