मुंबई प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्य पणन महामंडळात झालेल्या खत घोटाळ्यातील महामंडळाचे सरव्यवस्थापक एन. बी. यादव यांचे निलंबन करण्याची घोषणा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानपरिषदेत केली. तसेच यादव यांना वाचविण्याचा प्रयत्न केला म्हणून महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे.पी. गुप्ता यांचीही चौकशी केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
शिवसेनेच्या डॉ. मनिषा कायंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. सातारा व उस्मानाबाद येथे पाच कोटी रूपयांचा खत घोटाळा झाला असून सरव्यवस्थापक दोषी आढळले असल्याने त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी केली. इतर सदस्यांनीही ही मागणी लावून धरली.
त्यानंतर पणनमंत्र्यांनी यादव यांच्या निलंबनाची घोषणा केली तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जे. पी. गुप्ता यांची चौकशी केली जाईल असे जाहीर केले.
दरम्यान, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी अनेक अधिकाऱ्यांचे निलंबन झाल्यानंतर ते पुन्हा त्याच विभागात जाऊन कामावर रूजू होतात, त्यामुळे ते त्या पुन्हा जागेवर येणार नाहीत, यासाठी काही खबरदारी घ्यावी अशी सूचना केली. त्यावर पणनमंत्र्यांनी निलंबित केलेले अधिकारी पुन्हा त्याच जागेवर येऊ नये यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना देण्यात येतील असे सांगितले. त्याआधी यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, सातारा व उस्मानाबाद येथील खते येणे बाकीच्या अनुषंगाने एन.बी.यादव यांची खातेनिहाय चौकशी झाली असून त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत. अहवालामध्ये त्यांच्यावर कडक कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही न्यायालयाने एन.बी.यादव यांच्या बाजूने निकाल दिलेला नसताना तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक जे.पी.गुप्ता यांनी न्यायालयाचे आदेश बाजूला सारून एकतर्फी यादव यांना कामावर रूजू करून घेतले आहे.सातारा व उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उधार खत विक्रीपोटी अद्यापही ५ कोटी येणे बाकी आहे, याला पणन महासंघाचे तत्कालीन सरव्यवस्थापक एन.बी.यादव जबाबदार असतांनाही इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ करून एन.बी.यादव यांना दोषमुक्त केले आहे. तसेच क्लार्क / लेखापाल यांची चौकशी सुरू केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्याचे श्री.दरेकर यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा