गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

*राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून*टोल नाक्यावर थांबून गणेश भक्तांची विचारपूस*

*राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचेकडून*टोल नाक्यावर थांबून गणेश भक्तांची विचारपूस*

  सातारा दि. 9 : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड व पुणे येथून खाजगी वाहनाने येणाऱ्या गणेश भक्तांना विविध टोल नाक्यावर काही अडचण आली आहे का याविषयी प्रवाशांची विचारपूस आज राज्याचे गृह(ग्रामीण)राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. 
 गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज आनेवाडी टोलनाक व तासवडे टोलनाक्यावर प्रवाशांची विचारपूस करुन येणाऱ्या अडचणींबाबत जाणून घेतले.  यावेळी अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील  उपस्थित होते. 
 यावेळी श्री. देसाई यांनी  मुंबईहुन इथपर्यंत येण्यास आपणास   टोल नाक्यावर काही अडचण आली का? याबाबत प्रवाशांशी चर्चा करुन अडचणी जाणुन घेतल्या. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. तसेच गणपती सणासाठी येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी टोलनाक्यावरील व्यवस्थापकांना योग्य त्या सुचना केल्या. गणेश भक्तांनी व गणेश मंडळांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत शासनाने घालुन दिलेल्या निर्देशाचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करुन गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.  

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

*रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार* *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार.*

 *रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल होणार* 

 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती ; जुना पूल मे अखेरीस पूर्ववत होणार.* 


 *कराड, प्रतिनिधी :* रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा नदीवर ४५ कोटी रुपये खर्चाचा नवीन उभारला जाणार आहे. व जुन्या पुलाची दुरुस्तीही होणार आहे. या दोन्ही कामांना शासनाने प्राधान्य दिले आहे. दोन्ही पुलाच्या कामी एकूण 51 कोटी रुपये खर्च होणार आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. व त्यावरील वाहतूक पूर्ववत होईल. व नवीन पुलाचे दोन वर्षात काम पूर्ण होणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

आ. चव्हाण यांच्या प्रयत्नातून रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पुल बांधला जाणार व जुन्या पुलाची दुरुस्ती होणार आहे. नवीन पुलासाठी जमीन धर तपासणीचे काम नुकतेच सुरू झाले आहे. या कामाची आ. चव्हाण यांनी आज सकाळी पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एस. डी. जाधव, उपअभियंता ए. जे. हुद्दार, शाखा अभियंता डी. एन. जाधव, कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, नरेंद्र नांगरे - पाटील, शिवाजीराव मोहिते, जे. डी. मोहिते, मदनराव मोहिते, अमरसिंह मोहिते, कृष्णत चव्हाण - पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. शोभाताई सुतार, दिग्विजय उर्फ आबा सुर्यवंशी, बिपीन उर्फ सनी मोहिते, धनंजय मोहिते, शरद पाटील, राम मोहिते, धनाजी शिंदे, देवदास माने, विनोद पाटील, महेश कणसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरुवातीस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आ. चव्हाण यांनी कामाचा आढावा घेतला. नवीन पुलाचे 20 मीटरचे 15 गाळे तयार होवून तो सद्याच्या पुलापेक्षा 12 फूट उंच होणार आहे. त्याचा पाया भक्कम असेल. व तो तयार झाल्यानंतर त्याची भार क्षमता चाचणी केली जाणार आहे. येत्या मे अखेरीस जुना पूल दुरुस्त होईल. असे अधिकाऱ्यांनी आढाव्यात नमूद केले.

आ. चव्हाण म्हणाले, जुना पूल 6 कोटी रुपये खर्चून दुरुस्त होणार आहे. तो मे अखेरीस पूर्ववत होईल. नवीन पुलाचे मद्रास येथील आयटी तज्ञांनी डिझाईन केले आहे. तो पूल उंची होवून अद्ययावत होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर जुना व नवीन हे दोन्हीही पुल वाहतुकीस उपयुक्त ठरणार आहेत. त्यावर एकेरी वाहतूक होणार आहे.
------------------
 


मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

*सातारा ; एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ*

*सातारा ; एकरकमी कर्ज परतफेड योजनेस 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ*
सातारा दि. 7 : जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकाकरीता शासनाने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस  दि. 31 मार्च 2022 अखेर मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती मनोहर माळी अवसायक सातरा जिल्हा सहकारी कृषी गामीण बहुद्देशीय विकास बँक मर्या. सातारा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी दिली. 
 या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार संभासदांनी मुदतीत अर्ज द्यावेत. या योजनेचा लाभ घेतल्याने कर्जदार कमी रक्कम भरून कर्जमुक्त होणार असून, त्यांच्यातारण गटावरील बँकेच्या बोजाची नोंदही कमी होणार आहे. या योजने अंतर्गत व्याजाची आकारणी 6 टक्के दराने सरळव्याजाने करण्यात येणर आहे. तरी शासनाच्या या एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे. 

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

डाॅ.संदीप डाकवे यांची दुरदर्शन सहयाद्री वाहिनीवर मुलाखत

डाॅ.संदीप डाकवे यांची दुरदर्शन सहयाद्री वाहिनीवर मुलाखत
तळमावले/वार्ताहर
दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीवरील ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमात युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांची 
विशेष मुलाखत रविवार दि.12 सप्टेंबर, 2021 रोजी रात्री 7.30 वाजता व पुनःप्रक्षेपण रात्री 10 वाजता दाखवण्यात येणार आहे. सुप्रसिध्द अभिनेता व निवेदक रोहन गुजर यांनी ही मुलाखत घेतली आहे. डाॅ.संदीप डाकवे आणि शिल्पकार राजेंद्र कुंभार यांची दूरदर्शनवरील मुलाखत तमाम पाटण तालुका वासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या मुलाखतीसाठी त्यांना डाॅ.आलोक खोब्रागडे, हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर व इतर मान्यवर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
डाकेवाडीसारख्या ग्रामीण भागात राहून डाॅ.डाकवे यांनी विविध कलात्मक छंद जोपासले आहे. ही मुलाखत अर्ध्या तासाची असून ती जास्तीत जास्त रसिकांनी पहावी असे आवाहन डाॅ.संदीप डाकवे व ‘विचारांच्या पलीकडले’ या कार्यक्रमाचे निर्माते डाॅ.आलोक खोब्रागडे यांनी केले आहे.

रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज - ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.

कोरोना संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज -  ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत.

कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांचीच जबाबदारी!

मुंबई, दि.५ : कोविडपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून त्याच्याबरोबरच कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे, आजार होऊन उपचार करण्यापेक्षा हा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याची गरज आज ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत सहभागी तज्ज्ञांनी अधोरेखित केली.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या परिषदेत राज्य कोविड कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई, बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू, अमेरिकेतील डॉ. मेहुल मेहता या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन मार्गदर्शन केले आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

… तर कोविड पसरण्याची शक्यता – डॉ. मेहुल मेहता

अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठातील डॉ. मेहुल मेहता यांनी संभाव्य तिसरी लाट आणि त्यामागची कारणे शोधली पाहिजे असे सांगून आज कोरोना संपला असे आपल्याला वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत, सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करायला लागले त्यातून कोविड पसरण्याची शक्यता आहे. अजूनही लस घेतलेल्यांची संख्या कमी आहे. त्यातच विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे, डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आल्याचे सांगून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉ. मेहता यांनी केले.

प्रत्येकाने ‘जाणता मी, जबाबदार मी’ भूमिका घेण्याची गरज- डॉ. संजय ओक

संभाव्य लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासन, डॉक्टर्स, रुग्णालये यांनी तयारी सुरु केली आहे, मात्र या संपूर्ण प्रक्रियेत कोरोनाच्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्याची गरज कोविड राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली. कोविडची विविध लक्षणे आढळली, काही रुग्णांना चव आणि वास येत नाही, पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसले. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारणे आवश्यक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ नंतर ‘जाणता मी, जबाबदार मी’ ही भूमिका घेण्याची गरजही डॉ. ओक यांनी व्यक्त केली.

दुखणं अंगावर काढण्याची सवय महागात पडू शकते, यात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्त्वाची असून आपल्या रुग्णांची केवळ स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी सांगितले. कोविड हे तीन आठवड्याचे दुखणे आहे, त्यातील दुसऱ्या आठवड्यातील शेवटचे दिवस हे महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तीन आठवडे काळजीपूर्वक विलगीकरणात अथवा रुग्णालयात राहून काळजी घेण्याची गरज आहे. कोविड झाल्यानंतर उपचार, विलगीकरण आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे आवश्यक असून हा रोग लपविण्याची कोणतीही आवश्यकता नाही, शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.  दुसऱ्या लाटेत म्युकरमायकोसिसचा फटका बसला त्याच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे सांगतानाच सध्या तरी कोविडपासून संरक्षणासाठी मास्क हा उत्तम पर्याय असून मास्क घालणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, असेही डॉ. ओक यांनी सांगितले.

प्रत्येक स्ट्रेनवर मास्क प्रभावी- डॉ. शशांक जोशी

मास्क घालून कोविडला घराच्या उंबरठ्याच्याबाहेरच ठेवणे हे आपले सर्वाचे आद्यकर्तव्य असल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली.  राज्य शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे धारावीत परिस्थिती यशस्वीपणे हाताळता आली, दुसऱ्या लाटेत धारावीमध्ये रोजची रुग्णसंख्या २० पेक्षा अधिक आढळले नाहीत हे केवळ हर्ड इम्युनिटीमुळे झाल्याचेही डॉ. जोशी यांनी सांगितले. कोविडची लक्षणे आढळली तरी विलगीकरणात राहून संपर्क तोडा, चाचणी करा, ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा, ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांशी डॉक्टरांनी बोलण्याचे आवाहन करतानाच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही यावेळी डॉ. जोशी यांनी सांगितले.

लक्षणे दिसताच चाचणी करा- डॉ. राहुल पंडित

फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. राहुल पंडित म्हणाले की, कोविडने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या, शिस्त लावली. एखाद्या गुरुसारखे कोविडने आपल्याला शिकवले आहे. नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपण्याचे आवाहन त्यांनी केले. कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करतानाच रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका तो तात्काळ बदलण्याच्या सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन त्यांनी केले. ऑक्सिजन प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याचा सल्ला आम्ही देतो, त्याचे निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात.

कोविडपश्चात जीवनशैली चांगली ठेवा- डॉ. अजित देसाई

डॉ. अजित देसाई कोविड पश्चात लक्षणे ही मुख्यतः ४ ते १२ आठवडे असतात, ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा ही लक्षणे दिसतात. सहा महिन्यापर्यंत ही लक्षणे असली तरी ती दीर्घ काळची लक्षणे मानले जातात, थकवा, सांधेदुखी, श्वसनास त्रास, ताणतणाव, निद्रानाश, भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तणावात जाणे, डोकेदुखी, छातीत वेदना आदी त्रास होतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. ताण तणाव, चिंता असेल तेव्हा कुटुंबातील सदस्य, मित्रांबरोबर बोला त्यापेक्षाही अधिक गंभीर स्वरुपाचा तणाव असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोलण्याचा सल्ला देऊन कोविड पश्चात आपली जीवनशैली अधिकाधिक चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. देसाई यांनी केले.

पहिल्या दोन लाटांमध्ये मुलांमध्ये कमी संक्रमण- डॉ. सुहास प्रभू

बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणती काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि काही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पहिल्या दोन लाटेमध्ये मुलांमध्ये कोविडचे कमी संक्रमण झाले. मुलांनी देखील संभाव्य धोका लक्षात घेता मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो, रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर लक्षणे आढळल्यास मुलांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहेत, मुलाबरोबर पालकापैकी एकाला या मुलांसाठीच्या कोविडसेंटरमध्ये थांबण्याची व्यवस्था केलेली आहे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी फोनवरुन अथवा इतर माध्यमांद्वारे संवाद साधणे अधिक गरजेचे आहे. शाळा सुरू होण्याअगोदर पुरेशी दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रभू यांनी सांगितले. नवजात शिशु आणि आई यांची काळजी घेत असतानाच आईला जर कोविड असेल तर बाळाची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

*सावली प्रतिष्ठानचा शिक्षकदिनी ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ*

*सावली प्रतिष्ठानचा शिक्षकदिनी ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ*
प्रतिनिधी / कुणाल माने
पाटण : सावली प्रतिष्ठान कुंभारगाव या सामाजिक संस्थेतर्फे आज 5 सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी चिखलेवाडी येथे भव्य ग्रंथालय उभारणीचा शुभारंभ झाला.
सावली प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था असून अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. या संस्थेमार्फत अनेक शाळांना त्यांनी पुस्तके वाटप केलेले आहेत तसेच वेगवेगळ्या ऑनलाईन स्पर्धेचे नियोजन केलेले आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या संस्थेने ग्रंथालय उभारणीचा भव्य शुभारंभ घडवून आणला. याप्रसंगी पाटण पंचायत समितीचे उपसभापती मा. रमेश मोरे, सावली प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा. सुरेश यादव, अध्यक्ष श्री. विक्रम वरेकर, खजिनदार श्री. सुरेश चिखले, सदस्य प्रमोद मोरे, सागर मोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मा. रमेश मोरे यांच्याकडून प्रतिष्ठानला चाळीस पुस्तके, श्री. अरुण मोरे फौजी यांच्याकडून दहा पुस्तके, प्रा. शोभा चाळके - म्हमाणे यांच्याकडून वीस पुस्तके, प्रा.सुरेश यादव यांच्याकडून पाच पुस्तके, प्रा. दादासाहेब माटेकर, प्रा. वनिता माटेकर, श्री. सुरेश चिखले यांचेकडून पाच पुस्तके, श्री. उत्तम मोरे यांच्याकडून पाच पुस्तके भेट देण्यात आली. तसेच युवा उद्योजक श्री. जालींदर यादव यांच्याकडून ग्रंथालयासाठी कपाटे भेट देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान कडून शिक्षक दिनी प्रा. रमेश मोरे, प्रा. सुरेश यादव, प्रा.सुरेश चिखले सर यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी श्री रमेश मोरे म्हणाले, सावली प्रतिष्ठानचा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. प्रतिष्ठाने खूप चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करावे आणि आम्ही लागेल ते मदत करू. यावेळी त्यांनी प्रतिष्ठानला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक प्रा. सुरेश यादव म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एमपीएससी, यूपीएससी यासारख्या स्पर्धापरीक्षा पासून आज खेडेगावातील विद्यार्थी योग्य मार्गदर्शनवाचून वंचित आहे. त्यामुळे सावली प्रतिष्ठान कडून या गोष्टीचा विचार करून ग्रंथालय उभे करत आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. विक्रम वरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सदस्य श्री. प्रमोद मोरे यांनी केले आणि खजिनदार श्री. सुरेश चिखले सर यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

*काळगाव ; कुठरे येथील शिक्षकांच्या कलेचे होतंय कौतुक*

*काळगाव ; कुठरे येथील शिक्षकांच्या कलेचे होतंय कौतुक*
काळगाव / मनोज सावंत
कुठरे ता.पाटण, दि.4 लॉकडाऊन मध्ये अनेक लोक घरी बसून, असल्याने त्यांना विविध छंद जोपासले आहेत.त्यापैकीच एक म्हणजे सातारा  जिल्ह्यातील  पाटण  तालुक्यातील कुठरे  गावचे रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त कला शिक्षक दामोदर दीक्षित. दीक्षित सरांनी लॉक डाऊनमधील मोकळ्या वेळेत पिंपळाच्या  पानांवर व्यक्तिरेखांसह विविध प्रकारची आकर्षक आणि हुबेहूब चित्रे साकारली आहेत.
सध्या त्यांच्या या छंदाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आपली ही अनोखी कला केवळ आपल्या जवळच मर्यादित न राहता सर्वांना ती समजावी म्हणून लवकरच ते शाळा - महाविद्यालये सेवाभावी संस्था, व्यक्ती आणि मंडळांच्या माध्यमातून या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करत आहेत. विद्यार्थी  आणि नवोदित चित्रकारांना त्यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचा त्यांचा संकल्प आहे.

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...