रविवार, २२ नोव्हेंबर, २०२६

शेंडेवाडीत बिबट्याचा थरार! घराशेजारील शेडमध्ये घुसून शेळी फस्त; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट.

 कुंभारगाव (ता. पाटण) : पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील शेंडेवाडीमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी संजय परशुराम मोरे यांच्या घरालगत असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना दि. २१ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
रविवारी सकाळी संजय मोरे हे नेहमीप्रमाणे जनावरांच्या शेडमध्ये गेले असता त्यांना शेळी मृतावस्थेत आढळून आली. पाहणी केली असता बिबट्याच्या हल्ल्याची चिन्हे स्पष्ट दिसून आली. यानंतर त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच भोजगावचे वनपाल रमेश कुंभार व वनरक्षक शरद टाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी शेंडेवाडीचे उपसरपंच संतोष मोरे, अशोक मोरे, किसन मोरे, दत्ता मोरे, छाया मोरे, संगीता मोरे, सिद्धी मोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेमुळे शेंडेवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडणे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे आणि लहान मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
ग्रामस्थांनी या परिसरात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने नियमित गस्त वाढवावी, पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यास तातडीने शासकीय भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

शेंडेवाडीत बिबट्याचा थरार! घराशेजारील शेडमध्ये घुसून शेळी फस्त; ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट.

  कुंभारगाव (ता. पाटण) : पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील शेंडेवाडीमध्ये बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वा...