ढेबेवाडी - सराफ दुकानात भरदिवसा १० तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलिसांकडून ४८ तासांत दोन आरोपी जेरबंद.
पाटण : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील सराफ दुकानात भरदिवसा ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा छडा लावत ढेबेवाडी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त केली आहे.
दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी (मंद्रुळकोळे), ता. पाटण येथील सणबुर रस्त्यालगत असलेल्या बाजारपेठेतील मगर बंधू ज्वेलर्स या दुकानात ही चोरी झाली.
दोन चोरट्यांनी दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकानमालकाला वेगवेगळ्या डिझाइनचे दागिने दाखवण्यास सांगितले. दुकानमालक दागिने दाखवत असताना, त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दागिने हातोहात लंपास केले. त्यानंतर दुकानातून बाहेर पडून ढेबेवाडी चौकात उभी असलेल्या मोटारसायकलवरून दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सराफ दुकानदार विनोद मगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढेबेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांच्या तपासाला यश
ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.. अमित भिमराव पाटील (वय ३१ वर्षे), रा. आणे, ता. कराड, जि. सातारा.. रोहित नामदेव घाडगे (वय ३७ वर्षे), रा. विश्वासनगर, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा.
या आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे १० लाख रुपये किमतीचे १० तोळे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास
या गुन्ह्याचा तपास सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार तसेच पाटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
या कारवाईत ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित चव्हाण, पोलीस हवालदार प्रशांत चव्हाण, पोलीस हवालदार नवनाथ कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माने, सौरभ कांबळे, माणिक पाटील, संकेत पाटील, गणेश किर्वे, उज्ज्वल कदम, माणिक थोरात, विकास पाटील तसेच सातारा येथील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने सहभाग घेतला.
भरदिवसा झालेल्या या चोरीचा अवघ्या ४८ तासांत छडा लावून आरोपींना जेरबंद केल्याने ढेबेवाडी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा