“मी तालुक्याचा मालक नाही, माझी मायबाप जनता मालक आहे!”अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”
विरोधकांना इशारा देत शंभूराज देसाईंचा ढेबेवाडीत तुफान हल्लाबोल.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा, नाहीतर जनतेकडून चोख उत्तर मिळेल!**
पाटण तालुका म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबावर संकट आलं, तर मी ढाल बनून समोर उभा राहीन—अशा ठाम आणि कडक शब्दांत राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
ढेबेवाडी येथील सांगता सभेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मी या तालुक्याचा मालक नाही. माझी मायबाप जनता खरी मालक आहे. देसाई कुटुंबापूर्वी पाटण तालुका माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबासाठी मी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे.”
विधानसभा निवडणुकीतील टीकेचा संदर्भ देताना ना. देसाई म्हणाले, “माझ्यावर आरोप झाले, टीका झाली, पण उत्तर मी दिलं नाही—जनतेनेच दिलं! आणि सत्यजित पाटणकरांचा तब्बल ३५ हजार मतांनी पराभव केला. अजूनही विरोधकांची हाऊस जिरली नसेल, तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आणखी मोठ्या फरकाने पराभव पाहायला मिळेल.”
विरोधकांना थेट आव्हान देताना त्यांनी स्पष्ट सांगितले, “निवडणूक टीकेवर नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर लढूया! तुम्ही किती साकव बांधले? किती शाळा खोल्या उभारल्या? किती गावांना पाणी दिलं? पुनर्वसनाचे प्रश्न सोडवले का? रस्ते केले का? आधी याची उत्तरं द्या. माझ्यावर टीका करताना लक्षात ठेवा—माझा एक कार्यकर्ता एकटाच तुम्हाला पुरून उरेल!”
उपमुख्यमंत्री यांच्या कार्यकाळातील लोककल्याणकारी योजनांचा उल्लेख करताना त्यांनी ‘लाडकी बहीण योजना’, महिलांसाठी एस.टी. प्रवास सवलत अशा योजनांमुळे महायुती सरकारने जनतेचा विश्वास जिंकला असल्याचे सांगितले.
मंद्रुळकोळे गटातील मतदारांना थेट आवाहन करताना ना. देसाई म्हणाले, “जिल्हा परिषदेसाठी मृणाल महेश पाटील, पंचायत समितीसाठी नितीन काळे आणि संपदा पवार यांना मतदान करा. या उमेदवारांना दिलेलं मत म्हणजे थेट शंभूराज देसाईंना दिलेलं मत आहे—हे लक्षात ठेवा!”
या सभेला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जि.प. उमेदवार मृणाल पाटील, पं.स. उमेदवार नितीन काळे, संपदा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे प्रदेश सचिव नरेश देसाई यांनीही शिवसेनेच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला.
एकूणच पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आता “विकास विरुद्ध टीका” या थेट मुद्द्यावर रंगली असून, शंभूराज देसाईंच्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वातावरण तापल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा