कराड : टेंभू कालव्यावरील सुर्ली येथे साकव पूलासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाख रूपयांचा निधी मंजूर
टेंभू कालव्यावरील सुर्ली (ता.कराड) येथे साकव पूलासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून 25 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या साकव पूलाच्या मंजुरीमुळे अनेक दिवसांपासूनचा प्रश्न मार्गी लागला असून स्थानिक शेतकरीवर्गासह नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
सुर्ली येथील गावठाण ते चांभारकी रस्त्यावरील टेंभू कालव्यावरील गेट क्रमांक 18 शेजारी साकव पूल व्हावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. याठिकाणी साकवपूल नसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कॅनॉलच्या पूर्व व उत्तर बाजूच्या शेतीकडे जाण्यासाठी पूर्ण शिवारातील शेतक-यांची पूला अभावी फरफट होत आहे. शेतीच्या व अन्य कामासाठी जाण्यासाठी त्यांना सुमारे 1 ते 5 किमी अंतरापर्यंत वळसा घालून प्रवास करावा लागतो. तर कालव्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर नागरिकांना धोकादायकरित्या प्रवास करावा लागत आहे. याबाबतची माहिती स्थानिकांनी खा.श्रीनिवास पाटील यांना सांगून याठिकाणी साकव पूल मंजूर करावा अशी मागणी केली होती.
त्यानुसार खा.श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या विशेष प्रयत्नातून जलसंपदा विभागाने मौजे सुर्ली येथील गावठाण ते चांभारकी रस्त्यावरील कॅनॉलवर सातवा पूल बांधण्याकरिता 25 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच येथे साकव पूलाचे कामास गती प्राप्त होईल अशी माहिती खा.श्रीनिवास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा