रविवार, ११ जुलै, २०२१

कुंभारगाव : महिलांसाठी राजगिरा लाडू बनलाय विघ्नहर्ता

कुंभारगाव : महिलांसाठी राजगिरा लाडू बनलाय विघ्नहर्ता

लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेक व्यवसाय, उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. अशातच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या माध्यमातून ‘संजीवनी’ देण्याचे काम पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) येथील 59 वयाच्या माऊली करत आहेत. त्यांच्या या कृतीला सलाम करावा लागेल. त्यांच्या या गृहउद्योगामुळे राजगिरा लाडू महिलांसाठी विघ्नहर्ता बनला आहे. शारदा चाळके या घरगुती पध्दतीने राजगिरा लाडू बनवतात. हा लाडू उपवासासाठी देखील चालतो. लाॅकडाऊनमुळे गरजू महिलांच्या हाताला काम देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्याकडे आज रोजी 8 ते 10 महिला काम करत आहेत. या महिलांना दिवसाची 100 ते 120 रुपयापर्यंत हजेरी दिली जाते. त्यांच्या कामाची वेळ सकाळी 9 ते 5 अशी आहे. या व्यतिरिक्त केलेल्या ज्यादा कामाचा रोजगार दिला जातो. दिवसभरात साधारणपणे 40 किलोचे लाडू बनवले जातात. कराड, पाटण, दहिवडी या बाजारपेठेमध्ये हा लाडू वितरित केला जातो. प्रत्येक वारीला पंढरपूरला एक छोटा टेम्पो भरुनच लाडू नेला जातो. लाॅकडाऊनमुळे व वाहतुकीच्या अडचणीमुळे पंढरपूरला जाणारा हा लाडू थांबला आहे. राजगिरा लाडू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे राजगिरा, गुळ, पॅकेट, स्टीकर या गोष्टी कराड येथून आणल्या जातात. या कामी शारदा ताईंचा मुलगा शरद चाळके हा त्यांना मदत करतो.
सध्या या विभागात भांगलणी, कोळपणीची कामे जोरदार सुरु आहेत. या काळात शेतातील कामाला महिला मिळणे अवघड असते. ही कामे हंगामी असतात परंतू शारदा ताईंनी त्यांच्या गृहउद्योगातून 12 महिने काम या महिलांना दिले आहे.
मंगलमुर्ती महिला गृहउद्योग या नावाने ही छोटेखानी कंपनी फुड अॅन्ड लायसन्सच्या माध्यमातून रजिस्टर्ड आहे. गोड, चविष्ट आणि आरोग्यदायी लाडूमुळे हे लाडू परिसरात प्रसिध्द आहेत. कोणत्याही शुभकार्याप्रसंगी किंवा वाटप करण्यासाठी येथील लाडू हमखास नेले जातात. शारदाताईंनी या माध्यमातून महिलांना रोजगार देवून लाॅकडाऊनमध्ये ‘माणुसकी’ जपली आहे असे म्हणायला हरकत नाही. त्यांच्या या छोटया उद्योगाचे मोठया समुहात रुपांतर होवो या शुभेच्छा..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च.

ढेबेवाडी पोलीस ठाणे हद्दीत निवडणूक पार्श्वभूमीवर रूट मार्च जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर तसेच कायदा व सुव्यवस...