तळमावले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठायी आपणाला हिंदू धर्मातील सहिष्णु वृत्तीचे दर्शन घडते - प्रा.अझरुद्दीन पटेल तळमावले दि. ६ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हिंदू धर्मात झाला आणि त्याचा त्यांना अभिमान देखील होता . राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारामुळे महाराज अतिशय धर्मपरायण बनले होते . रायरेश्वर येथील महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून ते अगदी राज्याभिषेक आणि कर्नाटक मोहिमेत त्यांनी केलेल्या देवदर्शनातून या गोष्टींची म्हणजे महाराजांच्या धर्म परायणतेची माहिती मिळते . शिवाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी होते . आणि म्हणूनच त्यांनी शुद्धिकरण चळवळ राबवली . म्हणजे जे हिंदू धर्मातून इतर धर्मात गेले होते त्यांना परत हिंदू धर्मात घेतले . पण मग याचा अर्थ असा नाही की, छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या धर्मांचे द्वेष्टे होते . असे प्रतिपादन प्रा. अझरुद्दीन पटेल यांनी केले . शिवस्वराज्य दिनाचे औचित्य साधून काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथील इतिहास विभागाच्यावतीने ' छत्रपती शिवाजी महाराजांची धर्म सहिष्णुता ' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित केले होते . त्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. अझरूद्दीन पटेल बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते . या ऑनलाईन व्याख्यानासाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते . प्रा. अझरुद्दीन पटेल पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वावर भक्तिसंप्रदाय आणि संत तुकारामांसारख्या वारकरी संतांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी इतर जाती, धर्माच्या लोकांना चांगली वागणूक दिली . हिंदू साधू संतांच्या बरोबरीनेच महाराजांनी मुस्लीम फकिरांना, मशिदींना अनेक सवलती दिल्या . पूर्वी ज्या सवलती त्यांना मिळत होत्या, त्या चालू ठेवल्या . केळशीचे बाबा याकुत याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांचा योगक्षेम चालावा यासाठी महाराजांनी त्यांना ६०० एकर जमीन दिल्याची नोंद आहे . मा. प्राचार्य डॉ. अरुण गाडे अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना म्हणाले, सर्व जातीधर्माचा आदर करणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे लोककल्याणकारी राजे होते . त्यांचे विचार अंगिकारणे लोकाभिमुख प्रशासनासाठी गरजेचे आहे . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
प्रास्ताविक प्रा. अजय पाटील यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. डॉ. गवराम पोटे (मराठी विभाग प्रमुख) यांनी केले . आभार प्रा. एम. बी. चव्हाण ( हिंदी विभाग प्रमुख ) यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा