तळमावले दि. ५ श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांचे वतीने ' घाबरू नका, आम्ही आपल्या पाठीशी आहोत ' हे ब्रीद घेऊन कोरोना काळात समाजाला मानसिक बळ देण्याचे अभिनव कार्य सुरू आहे . संस्थेच्या या कार्याला ' शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या ' माझं गाव कोरोनामुक्त गाव आभियानाची ' जोड लाभली आहे . या अभियानाच्या माध्यमातून विचारांचा व गरजूंना मदतीचा जागर सुरू आहे . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावलेचा भूगोलशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने प्रा. डॉ. भाऊराव दांगट ( विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग श्रीमती मिनलबेन महेता कॉलेज, पाचगणी ) यांचा ' पर्यावरण आणि आपण ' या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते . या कार्यक्रमासाठी वांग व्हँली पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गुरुदेव कार्यकर्ते, स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते . डॉ. भाऊराव दांगट पुढे म्हणाले, आपल्या मुलभूत गरजांची पूर्तता पर्यावरणातून होत असते . आपल्या अवतीभोवती अनेक पशु-पक्षी, कृमी कीटक यांचा अधिवास व रक्षण करणे हे मानवाचे कर्तव्य आहे . कोरोनासारख्या महामारीशी झुंज देताना पर्यावरणाचे महत्व पुन्हा एकदा प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे . पद्मश्री सन्मानप्राप्त बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे कार्य आदर्शवत आहे . अनेक टाकाऊ वस्तुंपासून कल्पकतेने अनेक नवनवीन गोष्टी बनविता येतात, असे सांगून साधी सोपी जीवनशैली आपले तंदुरुस्त आरोग्य व पर्यावरण रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल . त्यासाठी सायकल चा वापर वाढविणे आवश्यक आहे . मा. प्राचार्य डॉ. अरुण गाडे अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना म्हणाले, निसर्ग माणसाला भरभरून देत असतो . पूर्वीच्याकाळी निसर्गामधून मिळणाऱ्या रानभाज्या आवडीने खाऊन सुदृढ, निरोगी, आरोग्यसंपन्न पिढी निर्माण झाली . हा निसर्गाचा ठेवा जपायला हवा . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. अरूण गाडे ( सदस्य टास्क फोर्स समिती सातारा विभाग ) व प्रा. विक्रांत सुपुगडे ( सदस्य टास्क फोर्स समिती ) यांच्या नेतृत्वाखाली गुरुदेव कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संभाजी नाईक (भूगोलशास्त्र विभागप्रमुख व प्रकल्प अधिकारी रा.से.यो विभाग ) यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गवराम पोटे (मराठी विभाग प्रमुख) यांनी केले . आभार प्रा. डॉ.यु.ई.साळुंखे (वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी मानले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा